|Thursday, July 18, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » आटपाट विरुद्ध चीन

आटपाट विरुद्ध चीन 

फार फार वर्षांपूर्वी आटपाट आणि चीनच्या सीमा एकमेकींना लागून होत्या. चीन सतत आटपाटमध्ये घुसखोरी करायचा. तिथल्या प्रदेशावर आपला हक्क सांगायचा. एकदा तर त्यांनी जाहीर केले की आम्ही आटपाट देश जिंकून घेऊ. मग आटपाटचे सरकार खवळले. एकदाच काय तो सोक्षमोक्ष लावू म्हणून त्यांनी जनतेला आवाहन केले की या वषी कोणताही सण, उत्सव, डीजे नाही. सगळय़ांनी मिळून चीनला धडा शिकवू. आटपाटच्या लष्कराने चीनवर स्वारी केली. पूर्वी सैन्याबरोबर इतर कामे करण्यासाठी बाजारबुणगे असत. तसे आटपाटमधले लाखो तरुण तरुणी वगैरे लोक लष्कराबरोबर निघाले. लष्कर चीनमध्ये घुसले. तेव्हा सर्व बाजारबुणग्यांनी ट्विटर आणि फेसबुकवर पोस्ट लिहून जगाला बातमी कळवली. काही जणांनी समरगीते लिहिली. एका पुणेरी कवीने चारोळी रचली,

बारा ते चार झोपू, आत्ता नाही नंतर

चायनीज माल सगळा, लुटून आल्यानंतर

सुप्रसिद्ध चायना वॉलपर्यंत लष्कर पोचले. मग सर्व बाजारबुणगे भिंतीवर चढले. आधी सर्वांनी आपले चायनामेड मोबाईल सरसावून सेल्फी काढले आणि फेसबुकवर अपलोड केले. त्यांनी सर्वत्र आपल्या मित्रांची-मैत्रिणींची नावे चुन्याने लिहिली. कोणी बदामाचे चित्र आणि त्यातून आरपार गेलेला बाण चितारून खाली आय लव्ह यू म्हटले. काही शौकिन भिंत उतरून पलीकडे गेले आणि भिंतीच्या कडेला नैसर्गिक विधी केले. मग सगळे दिसेल त्या उपाहारगृहात घुसले आणि जेवणाची ऑर्डर दिली. आज आयुष्यात पहिल्यांदा ओरिजिनल चायनीज जेवण मिळणार होते. जेवण आल्यावर सर्वांनी फोटो काढून पुन्हा सर्वत्र अपलोड केले व जेवायला सुरुवात करणार तेव्हा लक्षात आले की इथे चमचे नाहीत, चॅपस्टिक्स आहेत. चॅपस्टिकने कसे जेवावे हे समजेना. तेव्हा एका दर्जेदार कवीने रुबाई रचली 

चायनीज जेवणात चॅपस्टिक

सापडली तर काय खरे

आपले आपण हात वापरून

जेवून घ्यावे हेच बरे.

जेवणे झाली तोवर दुपारचे बारा वाजले होते. आटपाटमधल्या एका विशिष्ट शहराच्या नागरिकांनी मागणी केली की आम्हाला चार वाजेपर्यंत वामकुक्षी हवी. मग सर्वजण पहुडले. चार वाजता परतीच्या प्रवासाला लागले. प्रवासात त्यांनी खूप गाणी वगैरे म्हटली, उदाहरणार्थ चिनू तुझा आटपाटवर भरोसा नाय का…

या घटनेनंतर चिन्यांनी आटपाटकडे कधीही वाकडय़ा नजरेने पाहण्याची हिंमत केली नाही