|Sunday, August 25, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » नमो नम:

नमो नम: 

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी 2019 च्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पर्याय नसल्याचे स्पष्ट करीत त्यांच्यावर स्तुतिसुमनांचा वर्षाव केला आहे. लालूप्रसाद यादव यांची साथ सोडून एनडीएमध्ये पुन्हा डेरेदाखल झालेल्या नितीशकुमार यांच्या या वक्तव्याकडे केवळ मोदीस्तवन म्हणून पाहता येणार नाही. सध्याचा राजकीय क्षेत्राचा मूड पाहता त्यांनी वस्तुस्थितीच मांडली आहे, असे म्हणावे लागेल. भारतीय राजकारणाचा विचार करता पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी यांचा त्यावर दीर्घकाळ प्रभाव राहिलेला आहे. याशिवाय राजीव गांधी, पी. व्ही. नरसिंहराव, अटलबिहारी वाजपेयी, डॉ. मनमोहनसिंग यांच्यासह अन्यांनीही देशाला चांगले नेतृत्व दिले. किंबहुना, तटस्थ देशांचे नेतृत्व करणारे नेहरू आणि पाकिस्तानला धडा शिकवणाऱया इंदिराजी यांना सर्वाधिक लोकप्रियता मिळाली. त्यांच्या पश्चात कुणाला मोठी लोकप्रियता मिळत असेल, तर ती नरेंद्र मोदी यांनाच. कणखर व पोलादी नेतृत्व म्हणून पुढे आलेल्या मोदी यांनी केंदात भाजपाला स्पष्ट बहुमत मिळवून देण्याची किमया साधली. मोदी लाटेत भाजपाच्या खात्यात तब्बल 282 जागा जमा झाल्या. तेव्हापासून आजपर्यंत आपल्या नेतृत्वाचा प्रभाव वाढविण्याची एकही संधी मोदी यांनी सोडलेली नाही. विविध राज्यांच्या निवडणुकांमध्ये वातावरण ढवळून काढण्यापासून ती खेचून आणण्यापर्यंत सगळय़ाच गोष्टी त्यांनी नियोजनबद्धरीत्या पार पाडलेल्या दिसतात. मोदी यांच्या कारकिर्दीत जम्मू-काश्मीर, उत्तराखंड, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, आसाम, गोवा, मणिपूर, उत्तर प्रदेश, बिहारसह 70 ते 75 टक्क्यांवर देश भाजप व मित्रपक्षांनी व्यापल्याचे दिसून येते. काँग्रेस कमकुवत झाल्याने उत्तरोत्तर पक्षविस्तार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अर्थातच हा मोदी यांच्या नेतृत्वाचाही चमत्कार म्हटला पाहिजे. तीन वर्षांच्या काळात मोदींवर टीकाही झाली. मोदी केवळ परदेशात फिरत असतात, असा आक्षेप घेण्यात आला. तर नोटाबंदीने काय साधले, जीएसटीतून महागाईच वाढली, अशा शंकाकुशंकाही घेतल्या गेल्या. मात्र, सगळय़ाच गोष्टींना राष्ट्रप्रेमाचे कोंदण देण्यात मोदी यशस्वी झाल्याचे पहायला मिळते. मोदी यांच्या नेतृत्वाचा बोलबोला होण्यात त्यांच्या मार्केटिंग, जाहिरातबाजी व लोकांना पटवून देण्याच्या कौशल्याचा जसा हात आहे, तसाच त्यांच्या चाणक्यनीतीचाही वाटा आहे. हे लक्षात घेतले पाहिजे. त्यांनी  केवळ सत्तेवर येण्यात धन्यता न मानता विरोधकांना आपल्याकडे कसे वळविता येईल अथवा संपविता येईल, याकडे प्रामुख्याने लक्ष दिल्याचे पहायला मिळते. नितीशकुमार यांच्यासारख्या लोकनेत्याला स्वत:कडे वळविण्यात यश मिळविल्याने मोदी यांना टक्कर देणारा कोणताही सक्षम विरोधक सध्या राजकारणात राहिलेला दिसत नाही. बिहार विधानसभा निवडणुकीत नितीश यांनी मोदींना धक्का दिला होता. तेव्हापासून 2019 मध्ये मोदींचा अश्वमेध हे बिहारीबाबूच रोखणार, असे मानले जात होते. प्रत्यक्षात भाजपाच्या पाठिंब्यावर पुन्हा मुख्यमंत्री झालेल्या नितीशबाबूंनीच मोदींशिवाय पर्याय नसल्याचे सांगून सगळय़ा शक्याशक्यतांना पूर्णविराम दिला आहे. अर्थातच 2019 मध्ये मोदींविरोधात कोण, हा प्रश्न कायम असेल. काँग्रेसचा जनाधार मोठय़ा प्रमाणात घटला असून, दिवसेंदिवस पक्षाची पीछेहाटच होत आहे. काँग्रेसच्या सत्ताकाळात कोणत्याही जबाबदारीपासून दूर राहण्याचीच भूमिका घेतलेल्या राहुल गांधी यांना अजूनही आपले प्रभावक्षेत्र वाढविता आलेले नाही. त्यामुळे ते मोदींपुढे कितपत तग धरतील, ही शंकाच आहे. प्रियांका गांधी यांना काँग्रेस पुढे करणार काय, हा प्रश्न उरतोच. सध्या एकूणच काँग्रेस पक्ष गोंधळलेल्या अवस्थेत आहे. त्यामुळे त्यांच्याकडून इतक्यात काही पावले उचलली जातील, अशी शक्यता वाटत नाही. दोन वर्षांवर आलेल्या लोकसभा निवडणुका डोळय़ासमोर ठेऊन त्यांनी आत्तापासून तयारी करणे अपेक्षित आहे. नेतृत्वाबाबतचा निर्णय आत्ताच घेतला, तर थोडीफार लढत देता येऊ शकेल. मात्र, आत्मविश्वास गमावून बसलेला हा पक्ष जुन्याच पद्धतीचे राजकारण करण्यात मश्गुल आहे. अर्थात पक्षाच्या या गलितगात्र अवस्थेमुळे मोदी यांचे आव्हान अधिकच सोपे होईल, असे दिसते. राष्ट्रीय राजकारणातून नितीशकुमार यांचा पत्ता कट झाल्याने आता विरोधक म्हणून ममता बॅनर्जीच काय त्या उरल्या आहेत. ममता यांनी सातत्याने मोदींविरोधात भूमिका घेतली आहे. हे पाहता तिसरा पर्याय म्हणून त्यांचे नेतृत्व पुढे येऊ शकते. मात्र, त्यांच्या नेतृत्वाला असलेल्या मर्यादा बघता त्या किती आव्हान उभे करू शकतील, याबाबतदेखील मतमतांतरे पाहायला मिळतात. तसे पाहिल्यास सध्या देश वेगळय़ाच अवस्थेत जात आहे. सीमेवर मोठा तणाव दिसत असून, पाक, चीनसोबतचे संबंध अधिकच बिघडले आहेत. पाकच्या कारवाया वाढल्या असून, चीनकडून दर्पोक्ती केली जात आहे. नेपाळसारख्या देशांशी पूर्वीसारखा सलोखा राहिलेला नाही. त्यामुळे परराष्ट्र नीतीच्या पातळीवर सारे आलबेल आहे, असे म्हणण्यासारखी स्थिती नाही. नोटाबंदीचे फलित दृष्टीपथात नाही. काळय़ा पैशाचे काय झाले, हे कुणालाच सांगता आलेले नाही. शेतकऱयांना हमीभाव देण्याची हमी प्रत्यक्षात आलेली नाही. महागाईचा आलेख चढताच राहिलेला आहे. इतक्या साऱया उण्या बाजू असतानादेखील मोदी आपले वर्चस्व राखून आहेत. अर्थात भ्रष्टाचाराला पायबंद घालण्यात आलेले यश ही त्यांची सर्वांत मोठी जमेची बाजू मानावी लागेल. कोणत्याही राज्याचा, देशाचा कारभार हा भ्रष्टाचारमुक्त असावा, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा असते. त्या आघाडीवर उत्तीर्ण झालेल्या मोदी यांची कणखर पंतप्रधान म्हणूनही एक प्रतिमा तयार झाली आहे. ते करतील ते योग्य, बरोबर, राष्ट्रहितकारक, असा विश्वास जनमानसात निर्माण झालेला आहे. त्यामुळे नितीशकुमार म्हणतात त्याप्रमाणे 2019 च्या लोकसभा निवडणुकीत आजतरी त्यांना कोणता तगडा प्रतिस्पर्धी दिसत नाही. नमो नम: हेच खरे.