|Thursday, April 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » चोरीतील 19 लाख रहस्यमयरित्या हस्तगत

चोरीतील 19 लाख रहस्यमयरित्या हस्तगत 

कोहिनूर हॉटेल चोरी प्रकरण;

हॉटेलमध्येच सापडली 80 टक्के रक्कम

चोरटा कोण हा प्रश्न अद्याप कायम

अडकण्याच्या भीतीने रक्कम आणून ठेवल्याची शक्यता

साडेचार लाखांची रक्कम उडवली?

प्रतिनिधी /रत्नागिरी

कोहिनूर हॉटेलच्या कार्यालयातील इलेक्ट्रॉनिक तिजोरीतून चोरीस गेलेल्या रकमेपैकी तब्बल 19 लाख 35 हजारांची रक्कम रहस्यमयरित्या हस्तगत करण्यात आली आहे. चोरटय़ाने कोणाच्याही नकळत ही रक्क्म हॉटेलमध्येच अन्य ठिकाणी आणून ठेवली आहे. चार दिवस शहरात हा विषय गाजत असल्याने भांबावलेल्या चोरटय़ाने हे पाउढल उचलल्याचे म्हटले जात आहे. मात्र, चोरटा कोण हा प्रश्न अद्याप कायम आहे.

कोहिनूर हॉटेलमधून तब्बल 23 लाख 90 हजारांची रोकड लंपास करण्यात आल्याची खळबळजनक घटना 4 दिवसापुर्वी उघडकीस आली. पोलीस निरीक्षक विनीत चौधरींच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांनी सहकाऱयांसह याचा वेगाने तपास सुरू केला. तातडीने सिसिटिव्ही तपासण्यात आले. मात्र, चोरटय़ाने 27 जुलैपासून सिसिटिव्हीचे कनेक्शनच तोडून टाकल्याचा धक्कदायक प्रकार समोर आला. त्यामुळे हा चोरटा कर्मचाऱयांमधील किंवा हॉटेलची खडान खडा माहिती असल्याचा संशय व्यक्त होत होता. मात्र चोरटय़ाला शोधणे आणि रक्कमही हस्तगत करणे पोलिसांसाठी आव्हानात्मक बनले होते. या पार्श्वभूमीवर कोहिनूरमधील 44 कर्मचाऱयांच्या कसून चौकशी सुरू केली. गेली तीन दिवस चौकशीच्या फेऱया सुरू होत्या. दरम्यान, या रकमेपैकी तब्बल 19 लाख 35 हजार इतकी रक्कम चोरटय़ाने हॉटेलमध्ये गुपचून आणून ठेवली.

रोकड हॉटेलमध्येच होती ?

चोरटय़ाने ही रक्कम गुपचून आणून ठेवल्याने या प्रकरणाचे गूढ वाढले आहे. त्याने ही रक्कम जिथून चोरी केली होती त्या तिजोरीत परत न ठेवता अन्य ठिकाणी ठेवली आहे. यामुळे चोरीपैकी सुमारे 80 टक्के इतकी रक्कम तर हस्तगत झाली आहे. चोरलेली ही रक्कम चोरटय़ाने हॉटेलच्या आवारातच ठेवली होती की ती बाहेरून आणून आता गुपचूप ती याठिकाणी ठेवली असाही प्रश्न उपस्थित होत आहे. हा विषय थंड होईपर्यंत चोरटय़ाने ही रक्कम हॉटेलमध्येच कुणाला नजरेस पडणार नाही अशा ठिकाणी ठेवली असवी अशीही शक्यता व्यक्त होत आहे.

तब्बल साडेचार लाखांची रोकड उडवली ?

गेले चार दिवस हा विषय गाजत असल्याने भांबावलेल्या चोरटय़ाने ही रक्कम परत आणून ठेवली असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, तसे असले तरी पूर्ण रक्कम चोरटय़ाने आणून ठेवलेली नसल्याने यातील तब्बल साडेचार लाख रूपये त्याने खर्च करून टाकल्याची शक्यता व्यक्त होत आहे.

चोरटा कोण हा प्रश्न अद्याप कायम

तब्बल 80 टक्के रक्कम हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले असले तरी चोरटा अजून समोर आलेला नाही. त्याला शोधून काढण्याचे पोलिसांसमोरील आव्हान कायम आहे.

24 लाखांच्या रकमेचेही गूढ…

ही रक्कम दैनंदिन वापरातील नव्हती व तिजोरी अनेक महिने बंद असल्याने ही रक्कम पडून होती अशी माहिती पुढ आल्याने या रकमेविषयीही गूढ वाढले आहे. ही रक्कम इतके दिवस याठिकाणी विनावापर ,विनागुंतवणूक कशासाठी ठेवली होती, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Related posts: