|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » कचऱयावरील प्रक्रियेतून कंपोस्ट खत करणार!

कचऱयावरील प्रक्रियेतून कंपोस्ट खत करणार! 

कणकवली कणकवली शहरात निर्माण होणाऱया कचऱयाची विल्हेवाट लावून त्यावर प्रक्रिया करण्यासाठी कणकवली नगरपंचायत पुढाकार घेणार आहे. प्रतीदिनी शहरात सुमारे 5 टन कचरा उपलब्ध होत असून त्यावर प्रक्रिया करून कंपोस्ट खत करण्याचा अभिनव प्रकल्प येत्या काळात हाती घेणार आहे. त्यामुळे कचरा डेपोमध्ये वर्षानुवर्षे साचलेला कचरा नष्ट होण्याबरोबर कंपोस्ट खताच्या विक्रीद्वारे न.पं.च्या उत्पादनात वाढ होणार असल्याची माहिती मुख्याधिकारी अवधूत तावडे यांनी दिली.

घनकचऱयावर प्रक्रिया करण्यासाठी शासनाकडून विविध उपक्रम राबविले जात असताना कणकवली न.पं.ही या उपक्रमात सहभाग घेणार आहे. घनकचरा व्यवस्थापनासाठी न. पं.तर्फे प्रत्येक घरात कचऱयाच्या वर्गीकरणासाठी बकेट देण्यात येत असताना एकत्र केलेला हा कचरा गार्बेज डेपोमध्येही वर्गीकरण करण्यात येणार आहे. त्यावर प्रक्रिया करून येत्या काळात कंपोस्ट खताचा यशस्वी प्रकल्प राबविण्यात येणार असल्याचे तावडे यांनी सांगितले.

शहरात प्रति दिनी सुमारे 5 टन कचरा एकत्र करून तो गार्बेज डेपोत टाकला जातो. येत्या काळात कचऱयाची समस्या गंभीर होण्याची शक्यता असताना त्या अनुषंगाने न.पं.ने हा प्रकल्प राबविण्याचे निश्चित केले आहे. शहरातील कचऱयासाठी मुडेश्वर मैदानाजवळ 5 एकर क्षेत्रात गार्बेज डेपो तयार करण्यात आला आहे. आतापर्यंत शहरातील सर्व कचरा एकत्र करून वर्गीकरण न करताच एकत्र गोळा केला जात असे. मात्र, आता घनकचरा विलगीकरण अंतर्गत कचऱयाचे सुका, ओला व घातक कचरा असे तीनस्तरात वर्गीकरण करण्यात येणार आहे.

सुमारे दिड कोटीचा निधी यासाठी अपेक्षित असून कंपोस्ट खत प्रकल्प तयार करताना तीनस्तरात विलगीकरण केलेल्या ओल्या व सुक्या कचऱयावर प्रक्रिया करण्यात येणार आहे. यासाठी विशिष्ट पद्धतीने शेड उभारून त्यात प्लास्टिकचे मोठे डोम तयार करण्यात येणार आहेत. या डोममध्ये कचरा टाकून त्यावर प्रक्रिया करण्यात येणार आहे. तीन प्रकारच्या कचऱयासाठी सध्या तीन खड्डे तयार करण्यात येणार असून त्यात हा कचरा टाकण्यात येणार आहे. मात्र, यासाठी न.पं.च्या सर्वसाधारण सभेत हा प्रस्ताव ठेवून याला सभेची मंजुरी घेण्यात येणार असल्याचे  तावडे यांनी सांगितले.

प्रकल्पात निर्माण झालेले कंपोस्ट खत विक्री करून न. पं.ला आर्थिक उत्पन्न प्राप्त होणार आहे. प्रकल्प यशस्वीतेसाठी तज्ञांचे मार्गदर्शन घेण्यात येणार आहे. येत्या काळात हा प्रकल्प राबविण्यासाठी न. पं. सभेच्या मंजुरीनंतर निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्यासाठी एजन्सी निश्चित करून त्याद्वारे हा प्रकल्प राबविण्यात येणार असल्याचे तावडे यांनी सांगितले.

शहरातील कचराकुंडय़ा कमी करीत असताना शहरातील नागरिकांना दिलेल्या बकेटमधील कचरा एकत्र करण्यासाठी बँकांच्या माध्यमातून वाहने देण्याचा पर्याय समोर आला आहे. बँकांनी या प्रकल्पाला सहकार्य करण्याची भूमिका घेतल्याने याबाबत येत्या काळात ठोस निर्णय होईल. घनकचरा विलगीकरणासाठी व त्याच्या ठोस अंमलबजावणीसाठी उपविधी तयार करण्यात आली आहे. न. पं.च्या सभेच्या मंजुरीनंतर त्याला जिल्हाधिकाऱयांची मंजुरी घेण्यात येणार असल्याची माहिती तावडे यांनी दिली.