|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » वायरीला दोन दुचाकी जाळल्या

वायरीला दोन दुचाकी जाळल्या 

मालवण वायरी भूतनाथ येथील महाबळे कुटुंबियांच्या दोन दुचाकी सोमवारी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास अज्ञाताने जाळल्याची घटना घडली. याप्रकरणी अभिषेक महाबळे याने येथील पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, महाबळे कुटुंबियांनी व्यक्त केलेल्या संशयानुसार मालवण पोलिसांनी कट्टा-पेंडुर येथील एका युवकाला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे.

याप्रकरणी अभिषेक दत्ताराम महाबळे (20, रा. वायरी भूतनाथ) याने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, 1 ऑगस्टच्या मध्यरात्री दोन वाजता आपल्या मालकीची पॅशन प्रो मोटारसायकल (एमएच 07 झेड 4854) व यामाहा आर-15 (एमएच 07 झेड 7215) या दोन्ही गाडय़ा घराच्या बाजूच्या शेडमध्ये उभ्या करून ठेवल्या होत्या. रात्री जेवण आटोपल्यावर दहा वाजता घरातील सर्व माणसे झोपली. त्यानंतर दोनच्या सुमारास आईला जाग आली व तिने डोकावून पाहिले असता, बाहेर दोन्ही दुचाकींना आग लागल्याचे निदर्शनास आले. यावेळी आई, वडील, बहीण असे सर्व कुटुंब बाहेर आले. त्यावेळी ओसरीवर वाळत घातलेल्या कपडय़ाच्या सहाय्याने आग लावून दोन्ही दुचाकींचे नुकसान करण्यात आले. यावेळी घराच्या नळाचे कनेक्शनही तोडण्यात आले होते.

दोन महिन्यांपूर्वी महाबळेंची दुचाकी जाळली होती

यापूर्वीही 9 जुलै रोजी महाबळे यांचीच दुचाकी जाळल्याची घटना घडली होती.  याप्रकरणी महाबळे कुटुंबियांनी पोलीस निरीक्षक अरविंद बोडके यांची भेट घेऊन या प्रकाराची माहिती दिली होती. बोडके यांनी तातडीने युवकाला बोलावून घेत चौकशी करून समज दिली होती. त्यानंतर संबंधित युवकाने जळालेली दुचाकी दुरुस्तही करून दिली होती. त्यानंतर सोमवारी रात्री पुन्हा महाबळे कुटुंबियांच्या दोन दुचाकी जाळल्याची घटना घडली आहे.

कट्टा येथील युवक ताब्यात

अभिषेक महाबळेने दिलेल्या तक्रारीनुसार व महाबळे कुटुंबियांनी व्यक्त केलेल्या संशयानुसार मालवण पोलिसांनी कट्टा-पेंडुर येथील एका युवकाला ताब्यात घेतले असून त्याची चौकशीही सुरू केली आहे. घटनेनंतर पोलिसांनी ठसेतज्ञ व श्वानपथकाला पाचारण केले होते. सोमवारी रात्रीचे मालवण शहरातील सीसीटीव्ही फुटेजही तपासण्यात येणार आहेत. पोलीस निरीक्षक अरविंद बोडके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सुनील वेंगुर्लेकर हे अधिक तपास करीत आहेत.

दोषींवर कठोर कारवाई व्हावी

घटनेनंतर वायरी भूतनाथ ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी पोलीस निरीक्षक अरविंद बोडके यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. या निवेदनात म्हटले आहे,  31 जुलैच्या मध्यरात्री वायरी भूतनाथ येथील दत्तात्रय महाबळे यांच्या मालकीच्या दोन दुचाकी जाळण्यात आल्या. या कुटुंबाने ग्रामपंचायतीकडे तक्रार अर्ज सादर करून एका युवकाने हे कृत्य केले असावे, असा तक्रार अर्जात उल्लेख करून संशय व्यक्त केला आहे. तथापी, दोन महिन्यांपूर्वी याच कुटुंबाची एक दुचाकी जाळण्यात आली होती, असे तक्रार अर्जात नमूद आहे. वायरी भूतनाथ गावात असा प्रकार दोनवेळा घडल्याने तंटामुक्त गाव पुरस्कार प्राप्त गावच्या शांततेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. या घटनेचा योग्य तो तपास करून दोषी व्यक्तीवर कठोर कारवाई, अशी मागणी वायरी भूतनाथ ग्रामपंचायतीने निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी उपसरपंच ललित वराडकर, ग्रामपंचायत सदस्य श्याम झाड, प्रियंका रेवंडकर, साक्षी लुडबे, तंटामुक्त समिती अध्यक्ष प्रदीप मांजरेकर, पोलीस पाटील पांडुरंग चव्हाण, संदेश तळगावकर आदी उपस्थित होते.