|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » राखून ठेवलेले गुण

राखून ठेवलेले गुण 

कोणे एके काळी आटपाट नगरात भाषा विषयाचा पेपर शंभर मार्कांचा असे. पेपरमधील सर्व प्रश्नांच्या उत्तरांना मिळणाऱया गुणांची बेरीज असे अठ्ठय़ाण्णव. पेपरच्या सुरुवातीला टीप असे-

 एकूण गुण अठ्ठय़ाण्णव. उत्तम अक्षर, स्वच्छता आणि टापटीप यासाठी दोन गुण राखून ठेवले आहेत. म्हणजे प्रत्येक पेपर स्वच्छ आहे की नाही हे शिक्षक ठरवीत आणि मर्जीनुसार दोनपैकी गुण देत. मुले गमतीने म्हणायची-एकाही प्रश्नाचं उत्तर न देता नुसता कोरा पेपर दिला तर त्याला स्वच्छता आणि टापटीपचे दोन गुण मिळतील का? 

एका शाळेत या दोन गुणांवरून धुमश्चक्री झाली. वर्गात तीन गट होते. एक गट अभ्यासात हुशार होता पण त्यांचे हस्ताक्षर वाईट होते. नीट परिच्छेद पाडून मुद्देसूद लिहिण्याची कला त्यांना अवगत नव्हती. दुसरा गट माफक हुशार होता. पण हस्ताक्षर, स्वच्छता आणि टापटीप यात अग्रेसर. तिसरा गट मध्यममार्गी
होता. 

एका वषी शाळेत नवे शिक्षक आले. त्यांचे हस्ताक्षर अप्रतिम होते. विषयाचे ज्ञान आणि शिकवण्याची कलादेखील उत्तम. मग उत्तम हस्ताक्षर असलेल्या मुलांनी त्यांच्याकडे आग्रह धरला की या वषीपासून प्रश्नांच्या उत्तरांना शंभरपैकी दोन मार्क द्या.

 उत्तम हस्ताक्षर आणि स्वच्छता-टापटीप यासाठी अठ्ठय़ाण्णव मार्क राखून ठेवा. मुलं काय वाटेल ते म्हणाली तरी अशी मागणी वेडेपणाची आहे हे शिक्षक जाणून होते. पण सर्व मुलांना हस्ताक्षराचे महत्त्व पटवून द्यावे अशा हेतूने त्यांनी या मागणीवर संदिग्ध स्मित केले.

उत्तम हस्ताक्षर असलेल्या मुलांचा गैरसमज झाला की शिक्षक आपल्या बाजूने आहेत. मग त्यांनी ऑफ तासाला आरडाओरडा केला. आमच्या वर्गात रहायचे असेल तर उत्तम हस्ताक्षरात लिहिलेच पाहिजे.

मग बाकीची मुले म्हणाली की आमच्या गळय़ावर सुरी ठेवली तरी चांगले हस्ताक्षर काढणार नाही. तिसऱया गटातली मुले म्हणाली की उत्तम हस्ताक्षर हवेच, पण विषयाची जाण आणि अभ्यासदेखील हवा. उत्तम हस्ताक्षर हवे, पण म्हणून अभ्यासाकडे दुर्लक्ष करू नका.

शेवटी शिक्षक वर्गात आले, त्यांनी डोळे वटारल्यावर मुले शांत झाली. मुलांना विषयाचा अभ्यास, हस्ताक्षर-स्वच्छता-टापटीप यात कशाला किती महत्त्व द्यावे हा सारासार विवेक आला की नाही याची इतिहासात नोंद नाही.