|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » शिक्षक समायोजनावरून कणकवलीत वाद

शिक्षक समायोजनावरून कणकवलीत वाद 

कणकवली शिक्षकांच्या समायोजनप्रश्नी शिक्षण विभागाच्या कारभारावर नाराजी व्यक्त करीत बुधवारी तालुक्यातील शिक्षकांनी या प्रक्रियेस विरोध दर्शविला. समायोजनपात्र शिक्षकांची प्रसिद्ध केलेली सेवा ज्येष्ठता यादीच चुकीची असल्याची बाब शिक्षकांनीच निदर्शनास आणली.

समायोजन पात्र शिक्षकांना 5 ऑगस्टपर्यंत सेवा ज्येष्ठता यादीवर हरकती मांडण्यासाठी लेखी आदेश देण्यात आले होते. मात्र, अचानक मंगळवारी रात्री 10 वाजता व्हॉटसऍपवर 2 ऑगस्टपर्यंत हरकती देण्याच्या सूचना केल्या. हा गोंधळी कारभार खपवून घेणार नसल्याचा इशारा शिक्षकांसह सभापती व जि. प. माजी अध्यक्षांनी देत या प्रक्रियेवर आक्षेप घेतला. सकाळी 10 पासून याबाबत शिक्षकांनी ही प्रक्रिया रोखून धरली होती. त्यामुळे पं. स.च्या आवारात मोठी गर्दी झाली होती.

अतिरिक्त मुख्याध्यापकांना त्याच शाळांमध्ये ठेवून सिनिअर उपशिक्षकांच्या समायोजनेचे आदेश नुकतेच शिक्षण विभागाला प्राप्त झाले होते. त्यानुसार 31 जुलै रोजी या निकषानुसार समायोजनाला पात्र शिक्षकांची सेवा ज्येष्ठता यादी तालुका शिक्षण विभागाकडून निश्चित करून 5 ऑगस्टपर्यंत हरकती मांडण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, मंगळवारी रात्री संबंधित केंद्रप्रमुखांकडून शिक्षकांच्या व्हॉटस्ऍप ग्रुपवरून हरकती 2 ऑगस्टपर्यंतच घेण्याचे व समायोजन प्रक्रिया 3 रोजी करण्यात येणार असल्याचे आदेश दिले. त्यामुळे संतप्त झालेल्या शिक्षकांनी आज शिक्षण विभागात धाव घेत गटशिक्षणाधिकारी संदेश किंजवडेकर यांना जाब विचारला.

दरम्यान, मुख्य कार्यकारी अधिकाऱयांच्या सूचनेनुसार हे आदेश देण्यात आल्याचे किंजवडेकर यांनी स्पष्ट केले. मात्र, शिक्षकांनी तोंडी आदेशाद्वारे होणाऱया या प्रक्रियेलाच आक्षेप नोंदवित नियमानुसार हरकती नोंदविण्यासाठी 10 दिवसांचा अवधी देण्याची गरज असल्याकडे लक्ष वेधले. मुळात ही समायोजन प्रक्रिया राबविताना तयार केलेली सेवाज्येष्ठता यादीच चुकीची असल्याची बाब समोर आली. ज्या शिक्षकांना कोणताही आजार किंवा व्यंग नाही, अशी नावे अस्थिव्यंग किंवा अन्यप्रकारे आली आहेत. त्यामुळे शिक्षकांना हरकती नोंदविण्यासाठी कालावधी न देता अशा पद्धतीने कार्यवाही करण्यास शिक्षकांनी विरोध दर्शविला.

तालुक्यातील शून्य ते 10 पटसंख्येपर्यंत शाळांचा समायोजन प्रक्रियेत समावेश करण्यात आला नसल्याची बाब यावेळी निदर्शनास आणली. या पटसंख्येतील शाळेत एकच शिक्षक ठेवण्यात येणार आहे. मात्र, आरटीई ऍक्टनुसार अशा शाळांना दोन शिक्षक हवेत व असा प्रकार केल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. तालुक्यात 12 शाळा शून्य ते 10 पटसंख्येच्या असून मुख्य कार्यकारी अधिकाऱयांचा हा आदेशच नियमबाहय़ असल्याचे निदर्शनास आणण्यात आले. आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांचाही या सेवा ज्येष्ठता यादीत समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे आता समायोजन झाल्यानंतर हे शिक्षक आंतरजिल्हा बदली झाल्यानंतर त्या शाळांमधील जागा रिक्त होणार आहेत. त्यामुळे एकाच शिक्षकाच्या अजून किती वेळा बदल्या करणार, असा सवाल करण्यात आला.

शिक्षक बदल्याप्रकरणी शासन निर्णय असताना तोंडी आदेशानुसार कार्यवाही का? असा सवाल शिक्षक संघटनेच्या गिल्बर्ट फर्नांडिस यांनी केला. दरम्यान, सर्व शिक्षकांनी सभापती भाग्यलक्ष्मी साटम व जि. प. माजी अध्यक्ष संदेश सावंत यांची या प्रश्नी भेट घेऊन चर्चा केली.

त्यावेळी सावंत व सौ. साटम यांनी आमच्या तालुक्यातील शिक्षक कमी होत असतील, तर ते आम्ही खपवून घेणार नसल्याचा इशारा देऊन याबाबत सीईओंशी तुम्ही चर्चा करा, असे गटविकास अधिकारी एम. आर. भोसले यांना सांगितले. 8 उपशिक्षक पदे व 43 आंतरजिल्हा बदल्यांनी जागा रिक्त होत असताना सीईओंचे आदेश कसे मान्य करायचे, असा सवाल सावंत यांनी केला. शिक्षण विभागाच्या प्रश्नांचा डोंगर अद्याप कमी होत नसून सर्वांत जास्त या विभागाचे प्रश्न आहेत, असे सांगत शिक्षण विभागाच्या कामगिरीबाबत नाराजी व्यक्त केली.

यावेळी बीडीओंनी हरकती घेण्यासाठी 7 तासांचा अवधी द्यायचा असतो, असे सांगितले. याबाबत शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱयांनी नियमाचा आधार सांगत आमचा या कार्यपद्धतीला विरोध नाही मात्र शिक्षकांना संधी द्या, अशी मागणी केली. तालुक्यातील 51 जागा रिक्त न राहता समायोजन प्रक्रिया राबविली जात असेल, तर आमचा या प्रक्रियेला विरोध नसल्याचे साटम व सावंत यांनी सांगितले.

या महिन्यात तालुक्यातील 10 शिक्षक सेवानिवृत्त होत असून पुन्हा या जागा रिक्त राहणार, त्याला जबाबदार कोण, असा सवाल अखिल शिक्षक संघाचे माजी राज्याध्यक्ष प्रकाश दळवी यांनी केला. 30 जूननंतर बदल्यांना मुदतवाढ देण्यात आलेली नसताना आताच एवढी घाई का? नियमानुसार तालुक्यातील 200 शिक्षक बदलीला पात्र असतानाही त्यांची नावेच यादीत नसल्याचा मुद्दा गिल्बर्ट फर्नांडिस यांनी मांडला. चुकीची प्रक्रिया राबविलीत व यात शिक्षकांचा बळी दिलात, तर पं. स. समोर उपोषण करण्याचा इशारा दळवी यांनी दिला. बराचवेळ चाललेल्या चर्चेत 5 ऑगस्टपर्यंत हरकती मांडण्यासाठी मुदत देण्याची मागणी शिक्षकांनी लावून धरली होती. अवघड व सर्वसाधारण क्षेत्राची बनविण्यात आलेली यादी चुकीची असल्याचा आरोप सभापतींनी केला. व्हीडिओ कॉन्फरन्सचे आदेश पाळता तर शासन निर्णय कशासाठी, असाही सवाल करण्यात आला. यावेळी पं. स. सदस्य मिलिंद मेस्त्राr, मंगेश सावंत, शिक्षक संघटनेचे अनंत राणे, दत्तात्रय सावंत, लक्ष्मण वळवी, किशोर कदम, अमित ठाकुर, विनायक हरकुळकर, प्रदीप मांजरेकर, शिवाजी पवार, श्रीकृष्ण कांबळी, प्रवीण पाताडे, विजय भोगले, पूजा शंकरदास, नीलांगी परब आदी उपस्थित होते.

वयापेक्षा सेवा जास्त!

चर्चेदरम्यान तालुक्यातील एका शिक्षकाच्या वयापेक्षा सेवा जास्त वर्षे दाखविल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. शिक्षक विभागातील अंदाधुंदी कारभाराचा बुरखा शिक्षकांनीच सर्वांसमोर उघड केला. संबंधित शिक्षकाच्या सेवापुस्तिकेत त्याची सेवा 47 वर्षे दाखविण्यात आली. मात्र, त्या शिक्षकाचे तेवढे अजून वय नसल्याची बाब निदर्शनास आल्याने शिक्षण विभागाच्या कारभाराबाबत साशंकता उपस्थित करण्यात आली.