|Thursday, May 23, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » प्रोफेशनल्स काँग्रेसची स्थापना

प्रोफेशनल्स काँग्रेसची स्थापना 

राहुल गांधी यांनी दिली माहिती : राजकारणाशी जोडला जाणार व्यावसायिकांचा आवाज

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

काँग्रेसने व्यावसायिक नागरिकांना पक्षाशी जोडण्यासाठी प्रोफेशनल्स काँग्रेसची स्थापना केली आहे. आम्ही देशाच्या व्यावसायिकांना आमंत्रित करत आहोत, त्यांचा आवाज देखील राजकारण आणि धोरणनिर्मिती सामील व्हावा अशी आमची इच्छा असल्याचे काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी म्हणाले. प्रोप्रेशनल्स काँग्रेस आणि अनऑर्गनाइज्ड वर्कर्स काँग्रेस असे दोन संघटनात्मक विभाग काँग्रेसने निर्मिले आहेत.

पक्षात नवा जीव ओतण्याच्या दिशेने उचलण्यात आलेले हे पाऊल आहे. काँग्रेस एक पुढे जाणारा पक्ष आहे हे या पावलांच्या आधारावर आम्ही सांगू शकतो. स्वातंत्र्य, सामाजिक न्याय आणि भारताची विविधता यासारख्या मूल्यांमध्ये विश्वास बाळगणाऱया व्यक्तींना आम्ही पक्षाशी जोडू इच्छितो असे वक्तव्य प्रोफेशनल्स काँग्रेसचे अध्यक्ष तसेच खासदार शशी थरुर यांनी बुधवारी केले.

100 रुपये शुल्क

आमच्या या पावलाचा उद्देश प्रत्येक शहरात विकेंद्रीकृत आणि लोकशाहीवादी व्यासपीठ उपलब्ध करविणे आहे. यासाठी फेलोशिप शुल्क 100 रुपये असेल, भाजपचा मिस्ड कॉल किंवा बनावट नंबर सारखी ही योजना नसेल. व्यावसायिक एकमेकांशी व्हॉट्सऍप ग्रूपद्वारे जोडले जातील असा राजकीय समूह काँग्रेसमध्ये निर्माण करण्याची योजना आहे. या व्यावसायिकांना आठवडय़ात भेटण्याची संधी देखील मिळेल. यादरम्यान ते काँग्रेस नेत्यांना संबोधनासाठी बोलावू शकतात अशी माहिती थरूर यांनी दिली. अनेक व्यावसायिकांनी भाजपला भूलथापांना बळी पडून अखेरच्या क्षणी मत दिल्याचे सांगितले. वर्तमान मोदी सरकारकडून अपेक्षाभंग झाल्याने असे व्यावसायिक काँग्रेसशी जोडण्यास इच्छुक असल्याचा दावा त्यांनी केला.

3.2 कोटी करदाते

देशात 3.2 कोटी करदाते असून 4 लाख कंपनी व्यवहार करदाते आहेत. यातील बहुतेकांना त्यांच्या कररकमेचा विनियोग कसा होतोय हे जाणून घेण्यात स्वारस्य आहे. परंतु यासाठी त्यांच्याकडे व्यासपीठच नाही. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मिलिंद देवरा यांना उपाध्यक्ष नेमले असून ते पश्चिम विभागाचे समन्वय पाहतील. याशिवाय गीता रेड्डी दक्षिण विभाग, गौरव गोगोई आणि सलमान सोज हे पूर्व आणि ईशान्य विभागाचे समन्वय सांभाळतील असे थरूर म्हणाले.

 

Related posts: