|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » क्रिडा » चिन्नाप्पा-पल्लिकल उपांत्यपूर्व फेरीत

चिन्नाप्पा-पल्लिकल उपांत्यपूर्व फेरीत 

 

वृत्तसंस्था/ मँचेस्टर

येथे सुरू असलेल्या डब्ल्यूएसएफ विश्व दुहेरी स्क्वॅश चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या जोश्ना चिन्नाप्पा व दीपिका पल्लिकल कार्तिक यांनी महिला विभागात उपांत्यपूर्व फेरी गाठली.

मंगळवारी सुरू झालेल्या या स्पर्धेत भारताच्या या द्वितीय मानांकित जोडीने तीन संघांचा समावेश असलेल्या गट ब मध्ये अव्वल स्थान मिळविताना वेल्सच्या इव्हान्स-सॅफरी या जोडीचा सहज पराभव केला. त्याआधी त्यांनी कोलंबियन जोडीवर विजय मिळविला होता. गुरुवारी होणाऱया उपांत्यपूर्व लढतीत जोश्ना-दीपिकाचा मुकाबला गट अ मध्ये दुसरे स्थान मिळविणाऱया कॅनडाच्या कॉर्नेट-टॉड या जोडीशी होईल.

मिश्र दुहेरीतही भारतीय जोडीने आश्वासक प्रदर्शन केले असून द्वितीय मानांकित सौरव घोषाल व दीपिका पल्लिकल यांनी गट ब मधील पहिल्या लढतीत मलेशियाच्या मोहम्मद शफिक कमाल व रॅशेल अर्नोल्ड यांच्यावर सरळ गेम्सनी विजय मिळविला. त्याचप्रमाणे सहावे मानांकन मिळालेल्या जोश्ना व विक्रम मल्होत्रा यांनी गट क मध्ये आघाडीचे स्थान मिळविले असून त्यांनी आपले दोन्हीही सामने जिंकले आहेत. पहिल्या लढतीत त्यांनी स्कॉटलंडच्या जोडीवर विजय मिळविला. त्यांनी न्यूझीलंडच्या झॅक मिलर-अमांदा लँडर्स मर्फी यांचा चुरशीच्या लढतीत पराभव केला.

पुरुष दुहेरीतील भारताची एकमेव जोडी विक्रम मल्होत्रा व महेश माणगावकर यांना पराभवाचा धक्का बसला. गट अ मधील दोन्ही साखळी सामन्यांत पराभव स्वीकारावा लागला. चार संघांचा समावेश असलेल्या या गटात ते तळाच्या स्थानावर असून त्यांची आणखी एक लढत बाकी आहे. पहिल्या सामन्यात स्कॉटलंडच्या क्लाईन-लोबान यांच्याकडून त्यांचा 1-11, 6-11, दुसऱया सामन्यात हॉलंडच्या बेनेट-श्वीर्टमन यांच्याकडून 6-11, 6-11 असा पराभव झाला.

निकाल : महिला दुहेरी : जोश्ना-दीपिका वि.वि. इव्हान्स-सॅफरी 11-8, 11-7, मिश्र दुहेरी : घोषाल-दीपिका वि.वि. शफीक-रॅशेल 11-7, 11-4, मल्होत्रा-जोश्ना वि.वि. मिलर-अमांदा लँडर्स मर्फी 11-9, 11-9.