|Thursday, June 27, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » शासकीय अनुदान अपहारप्रकरणी दोषी अधिकार्यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करा

शासकीय अनुदान अपहारप्रकरणी दोषी अधिकार्यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करा 

वार्ताहर/ एकंबे

कायम निसर्गाच्या लहरीपणाशी संघर्ष करणार्या खटाव तालुक्यातील शेतकर्यांवर अन्यायाचा वरवंटा फिरवणार्या आणि शासकीय अनुदानाची कोटय़वधी रुपयांची  रक्कम हडप करणार्या दोषी अधिकार्यांवर शासनाने तात्काळ निलंबनाची कारवाई करावी, अशी आग्रही मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रतोद आ. शशिकांत शिंदे यांनी केली. 

विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये आज त्यांनी औचित्याच्या मुद्याखाली खटाव तहसील कार्यालयातील अधिकार्यांनी शासकीय अनुदानाची रक्कम अपहार केल्याप्रकरणी विषय उपस्थित केला. महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे त्यांनी अधिकार्यांना पाठीशी न घालता तात्काळ निलंबनाची कारवाई करण्याची जोरदार मागणी केली. 

खटाव तालुक्यातील शेतकरी गेल्या चार वर्षात प्रचंड प्रमाणात अडचणीत आले आहेत. दुष्काळ, गारपीठ, हमी भाव नाही तर प्रचंड अवकाळी पाऊस अशा निसर्गाच्या संकटांच्या फेर्यात शेतकरी सापडले असताना शासनाने दिलेल्या रकमेतून मोठय़ाप्रमाणावर अपहार होणे, ही शेतकर्यांसाठी खूप नुकसानीची बाब आहे. शेतकरी शेतात कष्ट करत असताना, त्याला अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे, त्यातच शासकीय अधिकार्यांकडून जर घोटाळे होत असतील तर शेतकरी शासनाकडून काय अपेक्षा ठेवणार, असा सवाल आ. शिंदे यांनी केला.