साडेतीन कोटीच्या कथीत घोटाळ्याचा अहवाल जिल्हाधिकाऱयांकडे : पवार

प्रतिनिधी/ वडूज
खटाव तालुक्यात 2014 – 15 सालात खरीप हंगामासाठी आलेल्या पीक नुकसान भरपाई अनुदानात तत्कालीन अधिकाऱयांनी सुमारे साडे तीन कोटी रूपयांचा कथीत घोटाळा केल्याचा प्रकार उघडकीस येत आहे. या घोटाळ्य़ाच्या चौकशीकामी जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांना अहवाल पाठविण्यात आला आहे. सदरचा अहवाल जिल्हाधिकाऱयांकडून विभागीय आयुक्तांकडे जाणार आहे. त्यानंतर पुढील कार्यवाही होईल अशी माहिती तहसिलदार प्रियांका पवार (कर्डीले) यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती सांगताना पवार यांनी सांगितले की, खरीप हंगामातील पीक नुकसान भरपाई संदर्भात सन 2015 मध्ये खटाव तालुक्यासाठी 49 कोटी 78 लाख 82 हजारांचे अनुदान आले होते. गांव कामगार तलाठय़ांनी केलेल्या यादीनुसार 46 कोटी 42 लाख 56 हजार रुपये अनुदान शेतकऱयांना अदा करण्यात आले होते. यापैकी 43 कोटी 50 लाख 40 हजार 757 रुपयांचे अनुदान राष्ट्रीयकृत बँका, जिल्हा मध्यवर्ती बँकेमार्फत शेतकऱयांच्या खात्यात जमा झाले होते. तर 2 कोटी 93 लाख 858 रुपयांचे धनादेश परत करण्यात आले होते. तर 3 कोटी 36 लाख 25 हजार 997 रुपये अनुदानाचे वाटप जुलै महिन्यात केल्याचे निदर्शनास आले आहे. या अनुदानासंदर्भात राष्ट्रीयकृत अथवा जिल्हा मध्यवर्ती बँकेमार्फत व्यवहार न होता वडूजमधील काही सहकारी पतसंस्था मार्फत हे व्यवहार झाले आहे. हा मुद्दा शासकीय लेखापरिक्षणामध्ये आढळून आला आहे. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाने सूचना केल्यानंतर आपण स्वत: तसेच प्रांताधिकाऱयांनी संबंधित पतसंस्थेमध्ये जाऊन समक्ष चौकशी केली आहे. याबाबतचा अहवाल वरीष्ठ कार्यालयाकडे सादर करण्यात आला आहे.
दरम्यान या प्रकारास तत्कालीन तहसिलदार अमोल कांबळे हेच सर्वस्वी जबाबदार असल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासंदर्भात शिवसेनेच्या वतीने आंदोलन छेडण्यात आले. तर मानवाधिकार संघटना, जनता क्रांती दल या संघटनांच्या वतीने निषेध करण्यात आला आहे. कथीत घोटाळ्याचा आरोप झाल्यानंतर गेली दोन दिवस तहसिलदार कार्यालयात शुकशुकाट जाणवत होता. काहीतरी गडबड-घोटाळा झाला आहे. मात्र प्रशासनाकडून निश्चित माहिती दिली जात नव्हती. त्यामुळे शहरातील प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी तहसिलदार प्रियांका पवार यांना छेडल्यानंतर त्यांनी अहवाल वरिष्ठांकडे पाठवला आहे. एवढीच जुजबी माहिता यावेळी दिली.
या घोटाळ्यात तत्कालीन तहसिलदार कांबळे यांच्यासह एक-दोन नायब तहसिलदार, काही कारकून मंडळी सहभागी असल्याची चर्चा शहर परिसरात दबक्या आवाजात सुरु आहे. त्यामुळे या प्रकरणात नेमके कोण-कोण गुंतले आहे ? याबाबत औत्सुक्य आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाकडून विभागीय आयुक्तांच्याकडे अहवाल कधी जाणार ? व ते किती गतीने कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
चौकट : त्यांना क्षणीक दिलासा
एका पतसंस्थेत अनेक ठेवीदारांचे पैसे अडकले आहेत. तांत्रिक अडचणीमुळे सदरचे पैसे देण्यासंदर्भात संस्था चालकांकडून वायदाबाजार होत आहे. या वायदाबाजाराला कंटाळून काहींनी तक्रारी दाखल केल्या आहेत. आपल्या तक्रारींची दखल घेवूनच महसूल विभागाचे वरिष्ठ अधिकारी संस्थेत आले आहेत. असा समज काही ठेवीदारांचा झाला होता. मात्र सायंकाळी चौकशी कशाची सुरु आहे. याचा उलगडा झाल्यानंतर त्या ठेवीदारांचा दिलासा क्षणीकच ठरल्याची चर्चा आहे.