|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » आनंद शिरोडकर पणजीतून ‘गोसुमं’ उमेदवार जाहीर

आनंद शिरोडकर पणजीतून ‘गोसुमं’ उमेदवार जाहीर 

प्रतिनिधी/ पणजी

 गोवा सुरक्षा मंचतर्फे पणजीतून आनंद शिरोडकर यांना उमेदवार जाहीर करण्यात आली असून पणजीतून ते पर्रीकरांविरोधात लढणार आहे. काल पक्षाचे वरिष्ठ उपाध्यक्ष किरण नाईक यांनी त्यांच्या नावावर शिकामोर्तक करण्यात आले. आज किंवा उद्या ते उमेदवारी अर्ज भरणार आहेत.   

आनंद शिरोडकर पणजीसाठी एक चांगले उमेदवार असून ते तळागाळातील कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. त्यांना पणजीतील अनेक लोक ओळखत असून त्यांनी गोवा सुरक्षा मंचचे अध्यक्षपदाची जबाबदारीही योग्यरित्या पार पाडली आहे. त्यांच्या मागे मोठय़ा प्रमाणात युवा शक्ती असून यावेळी त्यांचा विजय निश्चित  आहे, असे यावेळी पक्षाचे उपाध्यक्ष किरण नाईक यांनी सांगितले.

मनोहर पर्रीकरांनी पणजीसाठी काही केले नसून ते फक्त हुकुमशाही करत आहेत. त्यामुळे त्यांना धडा शिकविण्यासाठी यावेळी आम्ही चांगला उमेदवार पणजीसाठी दिला आहे. वाळपईसाठी लगेच उमेदवाराची घोषणा केली जाणार आहे, असे किरण नाईक यांनी सांगितले.

पर्रीकर सर्वच स्तरांवर अपयशी

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे गेली 20 वर्षे पणजीतून निवडून येत आहेत. तरी त्यांनी पणजीतील समस्या सोडविलेल्या नाहीत. पणजीत कचरा समस्या मोठी आहे. या कचऱयामुळे लोकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच पणजीत कॅसिनोची समस्या मोठी आहे. पणजीतील सांत इनेज नाल्याची दुर्गंधी हे अनेक विषय आज पणजीसाठी डोकेदुखी ठरत आहेत. पर्रीकर हे मुख्यमंत्री म्हणून तसेच पणजीचे आमदार म्हणून अपयशी ठरले आहे. तसेच ते भाजपचे नेते म्हणूनही अपयशी ठरले आहेत. त्यांच्या अधिकारशाहीमुळे अनेक भाजपचे कार्यकर्ते दूर झाले आहेत. पर्रीकरांनी पक्षामध्ये हुकुमशाही आणली आहे. त्यामुळे यावेळी पणजीवासीय  त्यांना घरी पाठवणार आहेत, असे यावेळी आंनद शिरोडकर यांनी सांगितले.

गोव्यात राजकीय दहशत

गोव्यात सध्या राजकीय दशहत सुरु असून मंत्री, आमदारांना पैशांनी विकत घेतले जात आहे. पण यावेळी गोवा सुरक्षा मंच पणजीतून पर्रीकरांविरोधात निवडणूक लढवून व जिंकून ही दहशत संपवणार आहे. गोवा सुरक्षामंचकडे मोठय़ा प्रमाणात युवा शक्ती असून ही युवा शक्ती यावेळी गोवा सुरक्षा मंचचे उमेदवार निवडून देणार आहे. सध्या होणाऱया पेटनिवडणुकीसाठी भाजपने मोठय़ा प्रमाणात पैसे ओतले आहे. असा आरोप यावेळी ऍड. हृदयनाथ शिरोडकर यांनी केला. यावेळी गोवा सुरक्षा मंचचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.