|Monday, January 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » जीवन त्यांना कळलेच नाही..!

जीवन त्यांना कळलेच नाही..! 

सिंधुदुर्ग काय म्हणावं याला? तरुणाईचा उन्माद म्हणावा की ही नशेची धुंदी म्हणावी? कावळेसादवरील त्या दोघा पर्यटकांच्या मृत्यूपूर्वीचा तो व्हीडिओ पाहिल्यावर त्यांच्या या अपघाती मृत्यूबद्दल दया, भीती अथवा कणव वाटण्याऐवजी प्रचंड संताप येतो.  मद्याच्या नशेत बेधूंद होत आंबोलीतील कावळेसादच्या त्या कडय़ावर जीवघेणे नखरे करणाऱया दोघा पर्यटकांना अखेर जीव गमवावा लागलाच. दोन तरुणांनी जीव गमावला. त्याचबरोबर दोन कुटुंबे उद्धवस्त झाली. तसेच त्यांचे मृतदेह काढण्यासाठी अनेकांना आपले जीव धोक्यात घालावे लागले. मद्य आणि सेल्फीच्या नशेत होणारे हे वाढते अपघात आंबोली व समुद्र किनारपट्टीवर आता नित्याचेच झाले आहेत. प्रश्न आहे तो हे रोखणार कोण व कसे?

   कावळेसादच्या कडय़ावरून कोसळून इम्रान गारदे आणि प्रताप उजगरे या कोल्हापूरहून आलेल्या दोघा पर्यटकांचा झालेला मृत्यू हा अपघात नसून तो मद्याच्या नशेत बेधुंदपणे केलेल्या नखऱयांचा परिपाक होता, हे या घटनेप्रसंगी मोबाईलद्वारे झालेल्या चित्रिकरणावरून उघडकीस आले आहे. चार मिनिटांच्या थरारक क्लिपमध्ये ते दोघे पर्यटक दारुच्या बाटल्या हातात घेऊन कावळेसादच्या त्या अत्यंत धोकादायक ठिकाणी बेधुंद झाले होते. त्यांच्यावर मद्याच्या असर एवढा चढला होता की त्यांना नीट उभंही राहता येत नव्हतं अन् चालताही येत नव्हतं. आणि व्हायचं ते झालंच. दोघांचाही तोल गेला आणि खोल दरीत कोसळून त्यांचा मृत्यू झाला.

इतरांनी जीव धोक्यात का घालावा?

  या घटनेची चित्रफित पाहता दोन बाबींचा संताप येतो, तो म्हणजे मद्याच्या नशेत स्वतःबरोबर दुसऱयांचा जीव धोक्यात घालणाऱया या पर्यटकांचा आणि दुसरा संताप येतो तो मद्याच्या नशेत हे तरुण जीवघेणा धोका पत्करत असताना त्यांना रोखण्याऐवजी त्यांच्या त्या कृतीचे चित्रीकरण करण्यात धन्यता मानणाऱया आणि त्यांना अधिक चेतावणाऱयांचा. ही जीवघेणी कृती करण्यापासून त्यांच्या सोबत असलेल्या सहकाऱयांनी त्यांना रोखले असते, तर कदाचित त्यांचे प्राणही वाचले असते. पण याचे गांभीर्य चित्रीकरण करणाऱया त्या दोघांच्या सहकाऱयांना असल्याचे मुळीच दिसले नाही. या दुर्घटनेत प्राण गेला, त्यांना दारुच्या नशेपुढे आपल्या जीवाची पर्वा नसेलही. आपले मित्र मद्यधुंद अवस्थेत जीवघेणा धोका पत्करत असताना त्यांना त्यापासून रोखण्याएवढे शहाणपण त्यांच्या सहकाऱयांकडे नसेल, तर या पर्यटकांचे मृतदेह त्या जीवघेण्या दरीतून बाहेर काढण्यासाठी इतरांनी स्वतःचा जीव धोक्यात तरी का घालावा? मद्याच्या नशेत धागडधिंगा घालणाऱयांचे मृतदेह बाहेर काढणे हे जरी माणुसकीला धरून असले, तरी त्या मृत्यूच्या दरीत त्या मृतदेहांसाठी स्वतःचा जीव धोक्यात घालणाऱयांच्या जीविताचे काही बरेवाईट झाले असते, तर त्याला जबाबदार कोण?

सेल्फीमुळे फुटले डोके

            आंबोलीच्या कावळेसाद पॉईंटवर एकीकडे या मद्यधुंद पर्यटकांचे मृतदेह काढण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरू असतानाच, त्याच आंबोलीत मुख्य धबधब्यावर धोकादायक पद्धतीने सेल्फी घेताना सोलापूर येथील अशोक फडतरे नावाचा युवक धबधब्यावरून खाली कोसळून गंभीर जखमी झाला. याचाच अर्थ एखाद्या घटनेचे गांभीर्य नसणे हा मूर्खपणा नव्हे का? याही घटनेपूर्वी चार दिवस अगोदर याच आंबोलीत एका धोकादायक कडय़ावर माकडांबरोबर खेळ खेळण्याच्या व फोटो घेण्याच्या नादात गोव्यातील एक पर्यटक खोल दरीत कोसळून गंभीर जखमी झाला होता. स्थानिक बचाव दलाने स्वतःचा जीव धोक्यात घालत त्याला वर काढल्याने त्याचा जीव वाचला होता.

इतर धबधब्यांवरही हाच धिंगाणा

  आंबोलीमध्ये मद्य पिऊन धागडधिंगाणा घालत स्वतःबरोबर इतरांचेही जीव धोक्यात घालण्याचे प्रमाण जसे वाढते आहे तसेच धोकादायक ठिकाणी उभे राहून सेल्फी घेण्याचेही वेड पर्यटकांमध्ये वाढत चालल्याचे दिसून येत आहे. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे यात महिलाही आघाडीवर असल्याचे दिसतात. केवळ आंबोलीतच नव्हे, तर जिल्हय़ातील मांगेली, सावडाव, नापणे, शिवडाव, कासारटाकासह सर्वच धबधब्यांवर सेल्फीचे वेड आणि मद्याच्या नशेत अशाच प्रकारचा धागडधिंगा सुरू असतो आणि यातूनच जीवघेणे अपघात घडत असतात. पर्यटकांच्या या धागडधिंगाण्यामुळे सामान्य नागरिकांना त्रास हा होतोच. त्याचबरोबर संपूर्ण यंत्रणा कामाला लागते.

मालवण समुद्रातील तो अपघात अशाच बेपर्वाईतून

            चार महिन्यांपूर्वी मालवण किनाऱयावर बेळगाव येथील इंजिनिअरींग कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा समुद्रात बुडून झालेला तो अपघात हा अशाचप्रकारे तरुणाईच्या बेपर्वाइतून झाला होता. या अपघातात आठ विद्यार्थ्यांचे बळी गेले होते. स्थानिक मच्छीमारांनी स्वतःचे जीव धोक्यात घालून उर्वरित विद्यार्थ्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला नसता, तर बळीची ही संख्या अधिक वाढली असती. या घटनेच्या वेळी देखील स्थानिक मच्छीमारांनी त्या विद्यार्थ्यांना धोकादायक बनलेल्या त्या समुद्रात उतरण्यास विरोध केला होता. पण तरुणाईच्या जोषात हा विरोध जुगारून देत त्या विद्यार्थ्यांनी समुद्रात उतरण्याची चूक केली आणि त्याचे गंभीर परिणाम त्या सर्वांना भोगावे लागले. या अपघातामुळे त्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांचे नुकसान हे झालेच. त्याचबरोबर मालवणची किनारपट्टी या अपघाताने बदनाम होऊन त्याचा परिणाम पर्यटन व्यवसायावर झाला. सिंधुदुर्गच्या किनारपट्टीवर पर्यटकांच्या अशा प्रकारच्या आतताईपणामुळे अशा प्रकारच्या जीवघेण्या अपघातांचे प्रमाण दिवसागणिक वाढतच चालले आहे.

नेमके करावे तरी काय?

    आंबोली म्हणा वा मालवण किनारपट्टीवर झालेल्या अपघाताबाबत म्हणा, पर्यटकांच्या अशाप्रकारच्या चुकांमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी नेमके करावे तरी काय, असा प्रश्न नागरिकांबरोबरच शासकीय यंत्रणेला पडला नसेल तर नवलच. पर्यटकांना जर सूचना देऊनही आपल्या जीवाची काळजी नसेल, तर स्थानिक नागरिकांनी वा शासकीय यंत्रणेने आपला जीव व वेळ का धोक्यात घालावा, हाही प्रश्न पडतो. याला एकच पर्याय दिसतो तो म्हणजे पोलीस यंत्रणेने अशा पर्यटन स्थळावर करडी नजर ठेवत धोकादायक पद्धतीने वर्तन करणाऱयांवर कडक कारवाई करावी. जेणेकरून असले जीवघेणे धाडस पुन्हा कोणी करणार नाही, असे सूचवावेसे वाटते.

Related posts: