|Tuesday, August 20, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » बोल्टला ‘गोल्डन’ निरोप घेण्याची संधी

बोल्टला ‘गोल्डन’ निरोप घेण्याची संधी 

वृत्तसंस्था /लंडन :

विश्व ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपला शुक्रवारपासून येथे सुरुवात होणार असून तीनवेळा स्प्रिंटचे ऑलिम्पिक सुवर्ण मिळविणारा कॅनडाचा आंदे डी ग्रासेने या स्पर्धेतून दुखापतीमुळे माघार घेतली आहे. यामुळे कारकिर्दीतील शेवटची स्पर्धा खेळणाऱया जमैकाच्या युसेन बोल्टला ‘गोल्डन’ निरोप घेण्याची संधी मिळाली आहे. डी ग्रासे हा बोल्टचा कट्टर प्रतिस्पर्धी मानला जातो.

बोल्टची ही निरोपाची स्पर्धा असून डी ग्रासेकडून त्याला 100 मी. शर्यतीत कडवा प्रतिकार होण्याची अपेक्षा केली जात होती. पण सोमवारी सराव करताना त्याची धोंडशिर दुखावल्याने या स्पर्धेसह त्याला उर्वरित मोसमातूनही बाहेर पडावे लागले आहे. ‘या संपूर्ण वर्षात लंडनमधील 100 मी. शर्यतीवर पूर्ण लक्ष केंद्रित केले होते आणि त्यासाठी मी जोरदार तयारीही केली होती. जगातील सर्वोत्तम खेळाडूंविरुद्ध स्पर्धा करण्याची संधी मिळणार म्हणून मी या स्पर्धेची आतुरतेने वाट पाहत होतो. पण दुखापतीमुळे ही संधी हुकली याचे मला खरोखरच खूप वाईट वाटत आहे. वास्तव स्वीकारण्याशिवाय माझ्यापुढे दुसरा पर्याय नाही. मात्र मी तरुण असल्याने उपचार व पुनर्वसन प्रक्रियेनंतर मी पुन्हा जोरदार पुनरागमन करू शकतो,’ असे निराश झालेला डी ग्रासे म्हणाला. त्याच्या उजव्या पायाला झालेली दुखापत दुसऱया दर्जाची असल्याचे त्याचे व्यवस्थापक पॉल डॉईल यांनी सांगितले. या दुखापतीतून बरे होण्यास त्याला किमान चार ते सहा आठवडे लागतील, असे तपासणीत दिसून आल्याचेही त्यांनी सांगितले.

डी ग्रासेने ऑलिम्पिकमध्ये 200 मी. सुवर्ण, 100 मी. व 4ƒ100 मी. रिलेमध्ये कांस्यपदके मिळविली आहेत. गेल्या जूनमध्ये स्टॉकहोममधील स्पर्धेत त्याने 9.69 सेकंदाची वर्षातील सर्वात वेगवान वेळ नोंदवली होती. त्यामुळे येथील शर्यतीत तो 100 मी. मध्ये बोल्टला आव्हान देणारा प्रमुख स्पर्धक असल्याचे मानले जात होते.  पण त्याच्या गैरहजेरीमुळे बोल्टला वर्ल्ड चॅम्पियनशिपमधील वैयक्तिक आठवे सुवर्ण मिळवित निरोप घेण्याची उत्तम संधी मिळाली आहे. 100 मे शर्यत शनिवारी होणार आहे.