|Friday, October 19, 2018
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » रस्ते हस्तांतरण प्रकरणातील सा. बां. अभियंत्याची बदली

रस्ते हस्तांतरण प्रकरणातील सा. बां. अभियंत्याची बदली 

जिल्हाधिकारी चौकशीत अडथळय़ाची शक्यता

राजगोपाल मयेकर /दापोली

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभागाचे मुख्य अभियंता ए. एस. सोनकुचरे यांची बदली झाली आहे. नगरपंचायतीच्या वादग्रस्त रस्ते हस्तांतरण निर्णयप्रक्रियेत त्यांची भूमिका महत्त्वाची ठरली होती. त्यांच्या बदलीने या प्रकरणातील जिल्हाधिकारी चौकशीत आता अडथळे येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यांच्या जागी जी. ए. पटेल यांची नियुक्ती झाली आहे. त्यांनी अद्याप पदभार स्वीकारलेला नाही.

नगरपंचायतीत 2002मध्ये रस्ते हस्तांतरणाचा ठराव झाला होता. तब्बल 15 वर्षानंतर याबाबत तत्कालिन मुख्याधिकारी संजीवनी दळवी यांनी पुढाकार घेत परस्पर रस्ते हस्तांतरणाचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठवला होता. हे हस्तांतरण होताना सार्वजनिक बांधकाम विभागाला पर्यायी महामार्गाची माहिती वरिष्ठ कार्यालयाला देणे आवश्यक होते. त्यानुसार अर्धवट अवस्थेतील पर्यायी रस्ता महामार्ग म्हणून पूर्ण झाल्याचे दाखवून कार्यालयाकडून प्रस्तावाला हिरवा कंदिल दाखवण्यात आला. आता नगरपंचायतीने हे प्रकरण चौकशीसाठी जिल्हाधिकाऱयांकडे सोपवले आहे. मात्र सोनकुचरे यांच्या बदलीने या चौकशीत अडथळे येण्याची शक्यता आहे.

हा वादग्रस्त निर्णय घेतल्यानंतर तत्कालिन मुख्याधिकारी संजीवनी दळवी यांची यापूर्वीच बदली झाली होती. आता या प्रकरणाशी संबंधित सोनकुचरे यांच्या रूपाने आणखी एका शासकीय अधिकाऱयाची बदली झाली आहे. त्यांना भिवंडी येथे नियुक्ती मिळाल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले.

सोनकुचरे हे गेली अडीच वर्षे दापोली उपविभागाचा कार्यभार सांभाळत आहेत. शिवसेनेचे ज्येष्ठे नेते व पर्यावरण मंत्री रामदास कदम, त्यांचे चिरंजीव योगेश कदम आणि राष्ट्रवादीचे आमदार संजय कदम यांच्यातील वाद विकोपाला गेल्याने येथील सार्वजनिक बांधकाम विभाग आधीच अडचणीत सापडला होता. त्यातच रस्ते हस्तांतरण प्रकरणाने विभागाची भूमिका अधिकच संशयाच्या भोवऱयात सापडली. सोनकुचरे यांची बदली याच राजकीय घडामोडींचा परिपाक ठरल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.

Related posts: