|Friday, July 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » पोलिसांना कळवूनही दारूविक्रीकडे डोळेझाक

पोलिसांना कळवूनही दारूविक्रीकडे डोळेझाक 

पोलिस पाटील व तंटामुक्ती अध्यक्षांची माहिती

निवेबुद्रुकच्या ग्रामस्थांकडून तरूण भारतचे आभार

प्रतिनिधी /देवरुख

गेली अनेक वर्षे निवेबुद्रुक येथील शाळेच्या संरक्षण भिंतीला लागून असलेल्या हॉटेलमधून सुरू असलेल्या दारु विक्रीबाबत ‘तरुण भारत’ ने आवाज उठवल्यानंतर यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या आहेत. या प्रकाराबाबत पोलीसांना कळवूनही त्यांनी डोळेझाक केल्याचे सांगत गावचे पोलीस पाटील आणि तंटामुक्ती समिती अध्यक्षांनी आपली सुटका करून घेतली आहे. दरम्यान, या गैरकृत्याला वाचा फोडल्याबद्दल ग्रामस्थांनी तरूण भारतचे आभार मानले आहेत.

शाळेच्या संरक्षण भिंतीला लागून असलेल्या एका हॉटेलमध्ये विनापरवाना अगदी राजरोसपणे दारु विक्री होत आहे. विशेष म्हणजे तळीरामांनी शाळेच्या इमारतीतच दारुचा अड्डा बनवला आहे. रात्रभर दारू पिऊन शाळेच्या आवारातच बाटल्या टाकल्या जात असल्याने शाळा सुरू होण्यापुर्वी गोणीभरुन दारुच्या बाटल्या जमा करण्याची वेळ शाळा प्रशासनावर आली आहे. याबाबत ‘तरुण भारत’ने शुक्रवारी पहिल्या पानावर वृत्त प्रसिद्ध केले होते.

या वृत्तानंतर संबधीत हॉटेल चालक व त्याला पाठबळ देणाऱयांचे धाबे दणाणले आहेत. तंटामुक्त समिती अध्यक्ष व पोलीस पाटलांनीही याप्रकाराचा निषेध केला आहे. गावात सुरु असलेला हा प्रकार चुकीचाच आहे. याबाबत आपण वारंवार पोलिसांशी संपर्क साधून याची कल्पना दिली होती, अशी प्रतिक्रीया तंटामुक्ती अध्यक्ष विकास गुडेकर यांनी दिली. तर 6 महिन्यापुर्वीच पोलीस विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱयांना याची कल्पना देण्यात आली होती, असे पोलीस पाटील शांताराम इप्ते यांनी स्पष्ट केले आहे. गावातील या दोन जबाबदार व्यक्तींनी दिलेल्या प्रतिक्रयेमुळे तक्रारी होऊनही पोलीसांनी दारूविक्रीकडे दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट होत आहे. कोणाच्या सांगण्यावरून व कोणाला लाभ पोहचवण्यासाठी हा प्रकार सुरू होता अशी चर्चा आता सुरू आहे.

या प्रकाराचा आम्हाला खूप त्रास होत असून आम्ही स्थलांतरित होण्याच्या विचारात होता. मात्र, ‘तरुण भारत’ने या गैरप्रकाराविरोधात आवाज उठवल्याने आता न्याय मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. अशी प्रतिक्रिया निवेबुद्रूक येथील एका कुटूंबाने व्यक्त केली आहे.

या गैरप्रकाराचा शाळेला तसेच विद्यार्थ्यांना व परिसरातील अनेक कुटूंबांना त्रास होत आहे. दररोज रात्री उशीरापर्यंत तळीरामांचा गोंधळ सुरु असल्याने येथे राहणे नकोसे झाले आहे. गेली अनेक वर्ष या हॉटेलमध्ये दारुची विनापरवाना विक्री होत आहे. वारंवार याबाबत आपण स्वतः संबंधित विभागाशी संपर्क साधला होता. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. आता तर हे प्रमाण खूप वाढल्याने याचा आपल्याला नाहक त्रास होत आहे. अशी कैफियतही एका कुटुंबाने व्यक्त केली आहे.

सकाळीच दारू साठा हलवला

या गैरप्रकाराबाबत ‘तरुण भारत’मध्ये वृत्त प्रसिध्द होताच, त्या हॉटेलमालकाचे धाबे दणाणले. सकाळी 7 वाजता या हॉटेल मालकाने एका टँम्पोत (एपी) दारुच्या बाटल्या भरुन दारु गायब केली, अशी चर्चा नागरिकांमधून सुरु आहे.