|Monday, July 22, 2019
You are here: Home » क्रिडा » नॉकआऊट विजयासाठी विजेंदर सज्ज,

नॉकआऊट विजयासाठी विजेंदर सज्ज, 

दोन किताबासाठी चीनच्या झुल्पिकारशी आज लढत

वृत्तसंस्था/ मुंबई

भारताचा स्टार मुष्टियोद्धा विजेंदर सिंग व चीनचा आतापर्यंत अपराजित राहिलेल्या झुल्पिकार मैमैतियाली यांच्यात आज शनिवारी ‘बॅटलग्राऊंड आशिया’ लढत होणार असून दुसरा किताब मिळवून अपराजित मालिका अखंड राखण्यासाठी विजेंदर सिंग सज्ज झाला आहे. सायंकाळी 6.30 पासून त्याचे प्रक्षेपण सोनी टेन 1, सोनी टेन 1 एचडी व सोनी टेन 3 या वाहिनींवरून केले जाणार आहे.

माजी ऑलिम्पिक कांस्यविजेता असणाऱया 31 वर्षीय विजेंदरची ही नववी व्यावसायिक लढत आहे. त्याने डब्ल्यूबीओ आशिया पॅसिफिक सुपर मिडलवेटचा किताब पटकावलेला आहे तर झुल्पिकार डब्ल्यूबीओ ओरिएंटल सुपर मिडलवेट गटाचा विजेता आहे. या लढतीत विजयी होणारा मुष्टियोद्धा दोन्ही किताबाचा मानकरी होणार आहे.

या लढतीसाठी विजेंदर ट्रेनर ली बियर्ड यांच्यासमवेत इंग्लंडमधील मँचेस्टर येथे सराव करीत होता. या लढतीचे पहिले तिकीट माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरला स्वतः विजेंदरने त्याच्या निवासस्थानी जाऊन दिले आहे. विजेंदरला या लढतीबद्दल पूर्ण विश्वास असून झुल्पिकार अननुभवी असल्याचे त्याला वाटते. ‘भारत विरुद्ध चीन अशी ही लढत असून यापेक्षा मी जास्त काही सांगणार नाही. या लढतीसाठी मी उत्सुक असून पूर्ण देश माझ्या पाठीशी असणार, याची मला जाणीव आहे,’ असे तो म्हणाला. मला पूर्ण आत्मविश्वास असून भारतच या लढतीत विजयी होणार याची मला खात्री वाटते. काल रात्री मी माझे वजन 78 किलो झाले असल्याचे पाहिले. प्रत्यक्षात ते 76.2 किलो असायला हवे होते. त्यामुळे दिवसभरात मी काहीही खाल्लेले नाही. आता माझे वजन 76 किलो झाले असून डाएटवर मी जास्त लक्ष केंद्रित केले आहे,’ असे त्याने शुक्रवारच्या पत्रकार परिषदेत सांगितले.

प्रतिस्पर्ध्याच्या हालचाली पाहून आपले डावपेच ठरविणार असल्याचेही त्याने सांगितले. ‘तो कसा खेळतो त्यावर माझे डावपेच अलवलंबून असतील. त्यानुसारच माझ्या खेळाची आखणी असेल. आम्ही तंत्रामध्ये बराच बदल केला असून त्यावर कठोर मेहनत घेतली आहे,’ असे तो म्हणाला. या लढतीआधी वजन घेण्याची व दोघांचे आमनेसामने येण्याची प्रक्रिया शुक्रवारी दुपारी झाली. ‘मी आता बऱयापैकी अनुभवी बॉक्सर बनलो असून झुल्पिकार अनुभवी असल्याचे मी मानत नाही. तो तरुण पण ताकदवान असून आम्ही त्यासाठी सज्ज आहोत. या लढतीसाठी प्रशिक्षकांसमवेत चर्चा करून योजना तयार केली असून प्रशिक्षकांनी मला घाई न करता संयम राखण्याची सूचना केली आहे,’ असे विजेंदरने स्पष्ट केले.

या प्रमुख लढतीशिवाय अन्य सात लढतीही होणार असून ऑलिम्पिकपटू अखिल कुमार व जितेंदर कुमार व्यावसायिक मुष्टियुद्धातील पदार्पणाची लढत खेळणार आहेत.