|Saturday, April 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » पीकविम्याचा सर्व्हर डाऊन

पीकविम्याचा सर्व्हर डाऊन 

प्रतिनिधी / कवठेमहांकाळ

पीक विमा भरण्याच्या शेवटच्या दिवशी कवठेमहांकाळ तालुक्यातील चारही महा ई सेतू कार्यालयातील संगणकांचे सर्व्हर बंद असल्याने तालुक्यातील शेकडो शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहाणार आहेत.

पंतप्रधान पीक विमा भरण्याची अखेरची मुदत 31 जुलै रोजी होती. त्यानंतर शासनाने पीकविमा भरण्याची मुदत वाढवून चार ऑगस्ट ही शेवटची तारीख दिली. पण शासनाने चलाखी करून महा ई सेतू कार्यालयात ऑनलाईन द्वारे पीक विमा भरण्याचे आदेश दिले. तर जिल्हामध्यवर्ती बँकांना पिक विमा भरून घेण्यासाठी या चार दिवसात कोणताही आदेश काढला नाही. त्यामुळे शेतकऱयांनी महा ई सेतू केंद्रात ऑनलाईन द्वारे पैसे भरण्यासाठी गर्दी केली.

गेली तीन दिवस हळूहळू का होईना पीकविमा भरला गेला. मात्र शुक्रवारी चौथ्यादिवशी कवठेमहांकाळ तालुक्यातील कवठेमहांकाळ, कुची, रांजणी, आणि ढालगाव सेतू केंद्रातील सर्व्हर दिवसभर बंद होते. सायंकाळी सातपर्यंत केंद्राबाहेर शेतकऱयांनी गर्दी केली होती. सेतू चालक सर्व्हर बंद असल्याचे शेतकऱयांना सांगत होते.

शुक्रवारी दिवसभर शेतकरी सकाळपासून संध्याकाळपर्यंत हातात पैसे आणि कागदपत्रे घेऊन सर्व्हर चालू होण्याची वाट पाहत होते. मात्र सर्व्हर चालू होत नव्हते. शेतकऱयांनी तहसीलदार कार्यालयाकडे ही सर्व्हर बंद असल्याच्या तक्रारी केली. त्यांनी याबाबत तालुका कृषि कार्यालयाकडे विचारणा केली. या कार्यालयाने जिह्यातच सर्व्हर बंद असल्याचे सांगितले. कृषि कार्यालयाने शेतकऱयांच्या हितासाठी सर्वत्र सर्व्हर बाबत माहिती घेतली. पण, सर्व्हर कुठेही चालू नसल्याचे उत्तरे मिळाली. सर्व्हर बंदमुळे शेकडो शेतकरी पीकविम्यापासून वंचित रहाणार आहेत. तर पीकविम्याची मुदत वाढवून द्यावी, अशी मागणी शेतकऱयांच्यातून होत आहे.

Related posts: