|Tuesday, March 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » स्वातंत्र्यसैनिकाची प्रशासनाकडून उपेक्षा

स्वातंत्र्यसैनिकाची प्रशासनाकडून उपेक्षा 

प्रतिनिधी/ बेळगाव

ज्ये÷ स्वातंत्र्यसैनिक कै. मुरलीधर घाटे (गुरुजी) यांच्या बेळगुंदी येथील स्मारकाचा मुद्दा मागील 17 वर्षांपासून दुर्लक्षित राहिला आहे. त्यामुळे बेळगुंदी ग्रामस्थांमधून तीव्र नाराजी उमटली आहे. दि. 5 ऑगस्ट या त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त स्मारक उभारणीसाठी आग्रही मागणी करण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे.

स्वातंत्र्यसैनिक कै. मुरलीधर घाटे गुरुजी यांनी दि. 5 ऑगस्ट 2000 रोजी आपल्या वयाच्या 92 व्या वर्षी प्राण सोडला. तब्बल सव्वीस दिवस अन्नपाणी वर्ज्य करून त्यांनी स्वेच्छामरणाचा मार्ग पत्करला. त्यांनी संपूर्ण समाजाच्या हितासाठी केलेले व्यापक कार्य लक्षात घेऊन त्यांचे स्मारक उभारावे, अशी मागणी त्यावेळी करण्यात आली होती.

त्यावेळी तत्कालीन जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांकडून सदर स्मारक उभारणीसाठी दहा एकर जागा उपलब्ध करून देण्याची घोषणाही करण्यात आली होती. मात्र त्यांच्या जाण्यानंतर या घोषणेचा विसर प्रशासनाला पडला आहे.

बेळगुंदी गावामधील अनेक ग्रामस्थांनी या स्मारकासाठी पाठपुरावा करण्याची मोहीम काही वर्षे राबविली. मात्र प्रशासनाची उदासीनता आणि टोलवाटोलवीमुळे सदर स्मारक उभारणीचा प्रस्तावच विस्मृतीत गेल्याची खंत ग्रामस्थांतून व्यक्त होत आहे. बेळगुंदी गावाने स्वातंत्र्य संग्रामासाठी दिलेले योगदानही महत्त्वपूर्ण असे आहे. घाटे गुरुजींनी बेळगुंदी गावामध्ये कै. काकासाहेब कालेलकर ट्रस्टची स्थापना करून तळागाळातील समाजासाठी, गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी व्यापक कार्य केले होते.

ग्रामस्थांनी पुढाकार घ्यावा

मुरलीधर घाटे गुरुजींनी स्वातंत्र्यलढय़ात सहभाग घेऊन गांधीवादी विचारधारा रुजविण्याची कामगिरी केली होती. मीठाच्या सत्याग्रहात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता. विनोबा भावे यांच्या ‘अंत्योदय ते सर्वोदय’ या कार्यक्रमात त्यांचा मोठा वाटा होता. खेडय़ापाडय़ात जाऊन शिक्षण प्रसार तसेच आदिवासीवर्गासाठी केलेल्या कार्याचीही कामगिरी अतुलनीय अशी होती. त्यांची ही कामगिरी प्रशासनाच्या विस्मृतीत गेली असली तर ग्रामस्थांनी या स्मारकासाठी पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

Related posts: