|Saturday, January 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » खानापूर येथील धनलक्ष्मी ज्वेलरीच्या मालकाची आत्महत्या

खानापूर येथील धनलक्ष्मी ज्वेलरीच्या मालकाची आत्महत्या 

व्यवसायात त्रास दिलेल्या चौघांची चिठ्ठीत नावे, दोघांना अटक, अन्य दोघे वडगाव येथील

प्रतिनिधी/ खानापूर

 व्यवसाय करत असताना चौघा जणांनी त्रास दिल्याने खानापूर स्टेशन रोड येथील धनलक्ष्मी ज्वेलरीच्या मालकाने प्रभूनगरनजीक आपल्या कारमध्ये आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली. चंद्रशेखर नागाप्पा अणवेकर (वय 47) असे ज्वेलरी मालकाचे नाव आहे. त्यांनी चिठ्ठीत लिहिलेल्या नावांपैकी दोघांना अटक करण्यात आली असून अन्य दोघांचा शोध सुरू आहे.

पोलिसांनी दिनकर मरगाळे व विनायक भुतकी (दोघेही रा. खानापूर) यांना अटक करून त्यांच्यावर कलम 306 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तसेच या चिठ्ठीमध्ये सुधा व विठ्ठल (रा. वडगाव-बेळगाव) यांचीही नावे असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

चंद्रशेखर हे गुरुवारी सायंकाळी 6 वाजता पारिश्वाड येथे आपल्या मित्राच्या घरी जाऊन येतो असून सांगून बाहेर पडले होते. पण रात्री उशिरापर्यंत घरी परतलेच नाहीत. त्यामुळे त्यांच्या पत्नीने पारिश्वाड येथील त्यांच्या मित्राकडे चौकशी केली मात्र, चंद्रशेखर आपल्याकडे आले नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर त्यांच्या पत्नीने फोनवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण प्रतिसाद मिळाला नाही. काही वेळानंतर त्यांचा मोबाईलही बंद झाला. त्यामुळे त्यांनी खानापूर पोलिसांत चंद्रशेखर बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली.

शुक्रवारी सकाळी अणवेकर यांची कार प्रभूनगरजवळ थांबली असल्याचे पाहून काहींनी याची माहिती नंदगड येथील अणवेकर यांच्या भावाला दिली. त्यानंतर त्यांचा भाऊ व इतरांनी कारमध्ये पाहिले असता चंद्रशेखर मृतावस्थेत आढळले. लागलीच त्यांनी याची माहिती खानापूर पोलिसांना दिली. खानापूरचे पोलीस निरीक्षक गुरुनाथ, उपनिरीक्षक परशराम पुजेर व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी कारचे दरवाजे उघडून अणवेकर यांचा मृतदेह बाहेर काढला. यावेळी कारमध्ये दारुची बाटली, सोने पॉलिश करण्यासाठी वापरण्यात येणारे केमिकल, पाण्याची बाटली व चिठ्ठी आढळून आली. या चिठ्ठीमध्ये त्यांनी चौघांची नावे लिहिली असून या चौघांच्या त्रासामधून आपण आत्महत्या करीत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

त्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी खानापूर शासकीय दवाखान्यात दाखल करण्यात आला. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यानंतर अंत्यविधीसाठी त्यांचा मृतदेह शिमोगा जिल्हय़ातील शिकारपूर या त्यांच्या मूळगावी नेण्यात आला.

दरम्यान चंद्रशेखर यांचा मुलगा दर्शन याने खानापूर पोलीस स्थानकात फिर्याद दाखल केली आहे. चिठ्ठीत लिहिलेल्या नावानुसार त्या चौघांनी आपल्या वडिलांना व्यवसाय करीत असताना बराच त्रास दिला असून यातूनच वडीलांनी आत्महत्या केल्याचा आरोप केले आहे.

Related posts: