|Thursday, October 18, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » तंबाखू उत्पादकांसमोरील संकटसत्र सुरू

तंबाखू उत्पादकांसमोरील संकटसत्र सुरू 

वार्ताहर/ निपाणी

निपाणीसह ग्रामीण भागात सध्या शेतकऱयांची तंबाखू लावणीपूर्व कामाची लगबग सुरू आहे. पारंपरिक पद्धतीने तंबाखू उत्पादन घेणारा येथील शेतकरी नेहमीच संकटात सापडल्याचे दिसून येते. येथील शेतकरी तंबाखूला पर्याय शोधण्याचा प्रयत्न करत असला तरी शासन याला पुरेसे पाठबळ देताना दिसत नाही. यंदा तर तंबाखू उत्पादक शेतकरी लावणीपासूनच संकटात सापडत आहे. वाफ्यावर घातलेल्या तरूचे झालेले नुकसान हे संकटसत्र सुरू करण्याला कारण ठरत असल्याचे दिसत आहे.

निपाणी परिसरात साधारणपणे 1 ऑगस्टपासून तंबाखू लावणीची कामे सुरू होताच 15 ऑगस्टनंतर तंबाखू लावणीची कामे गतीने केली जातात. तर खरीप उत्पादन घेणारे शेतकरी सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला तंबाखू लावण करतात. लावणीचे नियोजन करून शेतकरी वाफ्यावर तंबाखू तरू घालतात. काही शेतकरी तरू विक्रीचा उद्देश डोळय़ासमोर ठेवून वाफे तयार करतात.

सध्या तंबाखूचे वाफे तयार होऊन तरूची उगवणही झाली आहे. काही ठिकाणी तरू लावणी योग्यही झाल्याने तंबाखू लावणी सुरू झाल्या आहेत. येत्या दिवसात तंबाखू लावणी वेळेत पूर्ण करण्याची सर्वांचीच लगबग सुरू होणार आहे. पण वाफ्यावरील तरू उन्ह-पावसाच्या खेळातून लागट होऊन नुकसान होत आहे. काही ठिकाणी तर तरूची वाढच खुंटली आहे. यामुळे शेतकऱयांसमोरील चिंता वाढीस लागली असून सुरू झाले संकटसत्र अशी भीती व्यक्त होत आहे.

बंदीच्या नावाखाली शेतकऱयांकडून कमी भावाने खरेदी

केंद्र व राज्यशासन तंबाखू उत्पादनाला विरोध करत असले तरी मिळणारा महसूल लक्षात घेऊन बंदीचे धाडस करताना दिसत नाही. तंबाखू उत्पादनामुळे अनेकांच्या हाताला मिळणारा रोजगारही शासन लक्षात घेते. पण बंदीच्या नावाखाली शेतकऱयांची कमी भावातून व्यापारी लूट करत आहेत. निसर्गाच्या लहरीपणाशी स्पर्धा करत तंबाखू उत्पादन घ्यायचे व व्यापाऱयांना कवडीमोल भावाने ते विकायचे असा प्रकार सर्रास सुरू आहे. यंदा तर तंबाखू तरूच्या नुकसानीमुळे संकटसत्र लवकरच सुरू झाल्याने पुढे काय? असा प्रश्न शेतकऱयांसमोर पडला आहे.

महागडय़ा दराने तरू विक्री

निपाणी परिसरात सुमारे 10 ते 12 हजार एकर क्षेत्रावर तंबाखू उत्पादन घेतले जाते. पण या क्षेत्राला लागणारे तंबाखू तरू उपलब्ध होण्यास अडचणी निर्माण होत आहेत. या संधीचा फायदा उठवत तरू उपलब्ध असणारे शेतकरी 600 ते 700 रुपये दराने प्रतिहजार तरूची विक्री करत आहेत. इतक्या दराने तरू घ्यायचे, उत्पादनासाठी रासायनिक खते, औषधे वापरायची, उत्पादन हाती आल्यानंतर मात्र कवडीमोल भावाने तंबाखू विक्री करून नुकसानीत यायचे, यापेक्षा पर्यायी पिकांकडे वळलेले बरे, असे मत शेतकरी व्यक्त करत आहेत.

Related posts: