|Saturday, October 20, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » पट्टणकुडी, वाळकीसह 5 गावे निपाणी तालुक्याला जोडा

पट्टणकुडी, वाळकीसह 5 गावे निपाणी तालुक्याला जोडा 

प्रतिनिधी/ चिकोडी

पट्टणकुडी, वाळकी, चिखलव्हाळ, रामपूर व पांगिरे-ए ही गावे नव्याने अस्तित्वात आलेल्या निपाणी तालुक्याला जोडण्यात यावीत, या मागणीसाठी सदर गावच्या ग्रामपंचायत अध्यक्ष, सदस्य विविध संघ-संस्थांचे पदाधिकारी, गावप्रमुख व इतर नागरिकांनी शुक्रवारी चिकोडीच्या प्रांताधिकारी व तहसीलदारांना निवेदन सादर केले.

सदर निवेदनाच्या प्रति जिल्हाधिकारी, आमदार, खासदार, नगरविकास व पंचायतराज खात्याचे मंत्री, महसूल मंत्री, मुख्यमंत्री आदींना देण्यात येणार असल्याचे उपस्थित नागरिकांनी सांगितले. निवेदनात, पट्टणकुडी, वाळकी, चिखलव्हाळ, रामपूर व पांगिरे-ए ही गावे निपाणीपासून केवळ 2 ते 6 कि. मी. अंतरावर आहेत. सदर गावे निपाणी या नव्या तालुक्याला याआधी जोडण्यात आली होती. पण नुकताच नव्या घडामोडीनुसार ही गावे चिकोडी तालुक्याला जोडण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. सर्वसामान्य जनतेच्या अनुकुलतेसाठी नव्या तालुक्यांची निर्मिती करण्यात आली आहे. ही बाब प्रशंसनीय आहे. पण नव्या तालुक्याच्या ठिकाणांना सलग्न असलेली गावे दूरवरच्या तालुका केंद्रास जोडल्याने वेळ व पैसा वाया जातो.

सदर पाच गावातील सर्व विद्यार्थी एलकेजीपासून पदवी, वैद्यकीय, तांत्रिक व अभियांत्रिकी शिक्षणासाठी निपाणीसच पहिली पसंती देतात. याशिवाय नोंदणी अधिकारी कार्यालय, सब ट्रेझरी, न्यायालय, लोकोपयोगी, पाणीपुरवठा, महिला व बालकल्याण, पोलीस, कृषी उत्पन्न खाते, तंबाखू संशोधन केंद्र, जनावरांचा बाजार, सर्व राष्ट्रीयीकृत व खासगी बँकांच्या कामासाठी निपाणी या ठिकाणासच प्राधान्य दिले जाते. त्यामुळे ही गावे निपाणी तालुक्यालाच जोडण्यात यावीत.

2014 मध्ये प्रशासनातर्फे चिकोडी तालुका विभाजनासंदर्भातील माहिती संग्रहात वरील 5 गावांची निपाणीशी सलग्नता असल्याचे तत्कालीन तहसीलदारांनी नमूद केले आहे. याशिवाय 1975 मध्ये एम. वासुदेव समिती, गद्दीगौडर समिती, हुडेकर समिती आदींनी देखील इतर गावे निपाणीच्या व्याप्तीत येत असल्याचा निर्वाळा दिला आहे. इतकेच नव्हे तर निपाणी नगरपालिकेद्वारे पट्टणकुडी गावच्या हद्दीत त्याज्य विल्हेवारी केली जाते. निपाणी शहरातील निराश्रीतांना आश्रय योजनेंतर्गत सरकारने घरकुले देण्यासाठी पालिकेद्वारे पट्टणकुडी हद्दीतील 12 एकर जमीन घेण्यात आली आहे.

निपाणीचे उपनगर वाल्मिकीनगरसुद्धा रामपूर गावच्या हद्दीत येते. या सर्व बाबींची दखल घेऊन प्रशासनाने या सर्व 5 गावांचा निपाणी तालुक्यात समावेश करावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी पप्पू पाटील-रामपूर, किरण पाटील-पट्टणकुडी, संजय वाघ, धनाजी पाटील, माणिक पाटील, आपू नारंदे, सुभाष कानडे, महादेव पाटील, प्रकाश पाटील, बसगौडा खोत, बाबुराव पाटील, आप्पासाहेब जगदाळे, आण्णासो लोहार, वल्लभ देशपांडे, बापू पाटील आदी उपस्थित होते.

Related posts: