|Friday, October 19, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » गॅस भरण्यासाठी रिक्षांच्या रांगाच रांगा

गॅस भरण्यासाठी रिक्षांच्या रांगाच रांगा 

प्रतिनिधी / बेळगाव

शहरातील तीन एलपीजी गॅस केंद्रांपैकी एकच गॅस केंद्र सुरु असल्याने रिक्षा चालकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. सुरू असलेल्या या एकाच केंद्रावर लांबच्यालांब रांगा लागल्या होत्या. अनेकांना तासनतास उभे राहून गॅस भरुन घ्यावा लागत होता. काहीवेळा मध्ये चारचाकी वाहनांमध्ये गॅस भरुन दिला जात असल्याने रिक्षा चालक व गॅस वितरण करणाऱयांमध्ये वादावादीचे प्रसंगही घडत होते.

शहरात एकूण तीन एलपीजी गॅस केंद्रे आहेत. शहराच्या एकूण रिक्षा चालकांच्या मानाने ते अत्यंत अपुरे असल्याने नेहमीच वाहन चालकांच्या रांगा लागतात. शहरातील 75 ते 80 टक्के ऑटोरिक्षा एलपीजीवर चालणाऱया आहेत. गुरुवारी रात्री 9 नंतर शहरातील सर्वच केंद्रांवरील गॅस संपल्याने गॅस कोठून भरायचा? असा प्रश्न रिक्षा चालकांसमोर उपस्थित झाला. त्यामुळे गुरुवारी रात्री तुरळक रिक्षा फिरताना दिसत होत्या.

शिवाजीनगर येथील मिना गॅस केंद्रासमोर शुक्रवारी सकाळपासूनच रिक्षा चालकांच्या रांगा लागल्या होत्या. शहरातील सर्व रिक्षा चालक या ठिकाणी गॅस भरण्यासाठी आल्याने प्रत्येकाला तीन ते चार तासाचा कालावधी लागत होता. यामुळे शिवाजीनगर भागातून वीरभद्रनगरपर्यंत या रांगा लागल्या होत्या. यामुळे काही प्रवासीही रिक्षांमध्ये अडकून पडले होते.

वाहनांमध्ये गॅस भरल्याने गोंधळ

शिवाजीनगर येथील गॅस केंद्रावर तीन ठिकाणी गॅस भरला जातो. परंतु काहीवेळा इतर गॅसवर चालणारी वाहने आल्यावर त्यांना कर्मचारी प्राधान्य देत होते. आम्ही तासनतास रांगेत आहोत. परंतु इतर वाहनांमध्ये लगेचच गॅस भरुन दिले जात आहे. असे सांगत रिक्षा चालक व कर्मचाऱयांमध्ये वादावादीचे प्रकार घडले. गॅस मर्यादितच का मागविला जाते? यावरही रिक्षा चालकांनी व्यवस्थापकाला धारेवर धरले.

टिळकवाडी भागात नवीन गॅसकेंद्र सुरु करा

शहरातील विविध भागात अशा गॅस केंद्रांची उभारणी करण्यात यावी. महत्त्वाचे म्हणजे सध्या टिळकवाडी येथे तातडीने अशा प्रकारचे केंद्र सुरु करावे, अशी मागणी रिक्षा चालक व मालक संघटनेच्यावतीने करण्यात आली.

Related posts: