|Thursday, January 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » मंगळसूत्र महोत्सव प्रदर्शनाचे उद्घाटन

मंगळसूत्र महोत्सव प्रदर्शनाचे उद्घाटन 

प्रतिनिधी/ बेळगाव

महिलांना दागिन्यांची हौस असतेच. परंतु केवळ हौस म्हणून नक्हे तर काही दागिन्यांमध्ये त्यांच्या भावना गुंतलेल्या असतात. यामध्ये मंगळसूत्र या दागिन्याला सौभाग्याचे लेणे म्हणून त्या विशेष महत्त्व देतात. सण-वार आले की दागिने परिधान करायची हौसही त्या पूर्ण करतात. नेमके हेच लक्षात घेवून श्रावणमासाचे औचित्य साधून चन्नम्मानगर येथील शुभांगी जिनगौडा यांनी मंगळसूत्र महोत्सव भरविला आहे. वरेरकर नाटय़संघ येथे शुक्रवारी सकाळी या महोत्सवाचे उद्घाटन ‘तरुण भारत’च्या प्रतिनिधी मनीषा सुभेदार यांच्या हस्ते झाले.

यावेळी बोलताना मनीषा सुभेदार म्हणाल्या, महिलांची दागिन्यांची हौस समजून घेता येईल. परंतु शुभांगी यांनी त्यातून उद्योग सुरू केला आहे, हे महत्त्वाचे. मंगळसूत्रामधील काळे मणी हे स्थितप्रज्ञतेचे प्रतीक आहेत. आपल्या प्रत्येक दागिन्यात ते का वापरावेत, याचा एक संकेत आहे. ते समजून घेणे आवश्यक आहे. तथापि आपल्या दिसण्यापेक्षा आपण कसे असतो हे महत्त्वाचे आहे. हे लक्षात घ्यायला हवे.

शुभांगी जिनगौडा म्हणाल्या, मी मूळची हुपरीची आहे. हुपरीचे दागिने जगप्रसिद्ध आहेत. या दागिन्यांची ओळख बेळगावकरांना व्हावी शिवाय श्रावणामध्ये महिलांना वेगवेगळय़ा नमुन्यांचे मंगळसूत्र पाहता यावे, या हेतूने हे प्रदर्शन भरविले आहे. या शिवाय टेम्पल ज्युवेलरीशी निगडीत विविध आभूषणे, गणपती पूजनासाठी लागणारी सर्व आभूषणे, चांदीचा नारळ, चांदीची पर्स हे या प्रदर्शनाचे वैशिष्टय़ आहे.

या प्रदर्शनासाठी ज्यांचे सहकार्य लाभले त्या ज्युवेलरी डिझाईनर सुचेता इनामदार यांच्यासह शिल्पा मदली, प्रेरणा मुचंडी, निकिता कुलकर्णी, छाया साबोजी, मधुरा सामंत, संगीता हलभावी यावेळी उपस्थित होत्या. शनिवारी सकाळी 10 ते रात्री 8 या वेळेत प्रदर्शन सर्वांना खुले आहे.

Related posts: