|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » वेंगुर्ल्यात मत्स्य अधिकाऱयांना जाब

वेंगुर्ल्यात मत्स्य अधिकाऱयांना जाब 

वेंगुर्ले मासेमारी हंगामाला सुरुवात झाल्याने मच्छीमार नौकांची तपासणी व बेकायदा मासेमारीवर कारवाई करण्यासाठी पोलीस बंदोबस्तात आलेल्या मत्स्य विभागाच्या अधिकाऱयांना नवाबाग येथील मच्छीमारांनी जाब विचारला. आम्ही अद्याप नौकाच समुद्रात ढकललेल्या नाहीत तर आमच्यावर कारवाई करण्यास कसे आला? गेले दोन दिवस गोव्यातील पर्ससीन ट्रॉलर्स सागरी मासेमारी नियमाचे उल्लंघन करत मासेमारी करतात. त्यांच्यावर कारवाई का नाही, असा सवाल यावेळी करण्यात आल. त्यामुळे मालवण येथील वरिष्ठ अधिकाऱयांना वेंगुर्ल्यात बोलवावे लागले. सायंकाळी उशिरा दाखल झालेले अधिकारी कोणत्याही कारवाईविना माघारी परतले.

वेंगुर्ले मांडवी खाडी बंदर जेटीवर मच्छीमारांच्या होडय़ा व जाळी सज्ज करण्याचे काम सुरू आहे. शनिवारी सकाळी 11.30 च्या सुमारास वेंगुर्ले मत्स्य विभागाचे परवाना अधिकारी रमेशकुमार धडील हे बंदूकधारी दोन पोलिसांसह तपासणी व कारवाईसाठी आले होते. यावेळी होडय़ांची तपासणी करतांना मच्छीमारांनी अटकाव केला. त्यावर मासेमारीला कोणत्या नौका गेल्या, याच्या माहितीसाठी आपण आलो आहोत. बेकायदेशीर व नियमांचे उल्लंघन करणाऱया मच्छीमारांवर कारवाई करू, असे सांगताच मच्छीमार संतप्त झाले. आपण परंपरेने व्यवसाय करतो. उलट गोव्यातील मच्छीमार गेले दोन दिवस जिल्हय़ातील किनारपट्टीलगत येऊन मासेमारी करत आहेत. त्यांच्यावर कारवाई करायची सोडून स्थानिक मच्छीमारांवर कारवाई का करता, असा सवालही यावेळी करण्यात आला. त्यावर परवाना अधिकारी धडील यांनी आपल्याकडे पुरेसे कर्मचारी व गस्तीनौका नसल्याने गोव्यातील मच्छीमारांवर कारवाई करताना अडचणी येतात, असे सांगितले.

यावेळी आधुनिक रापण मच्छीमार संघटनेचे अध्यक्ष दादा केळुसकर, राष्ट्रवादी मच्छीमार सेलचे जिल्हाध्यक्ष भाई मालवणकर, वेंगुर्ले तालुका मच्छीमार सोसायटीचे चेअरमन राजेंद्र कुबल, बाबी रेडकर, श्याम सारंग, अशोक सारंग, विजय केळुसकर, बाबा नाईक, सतीश हुले, आनंद वेंगुर्लेकर, मोहन सागवेकर, अशोक खराडे, गणपत केळुसकर उपस्थित होते.

मालवण मस्य विभाग परवाना अधिकारी देसाई व देवगड परवाना अधिकारी बारोजेकर यांनी मच्छीमारांचे प्रश्न ऐकले. त्यानंतर मस्य अधिकारी व वेंगुर्ले तहसीलदार शरद गोसावी यांना मागण्यांचे निवेदन दादा केळुसकर यांच्यासह मच्छीमारांनी दिले.