|Saturday, April 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » प्राथमिक शिक्षक बदल्यांच्या घोळात शैक्षणिक नुकसान?

प्राथमिक शिक्षक बदल्यांच्या घोळात शैक्षणिक नुकसान? 

कणकवली : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांबाबतची प्रक्रिया अजूनही सुरूच आहे. शैक्षणिक वर्ष सुरू होऊन दिड महिना उलटला, तरीही सर्वसाधारण व अवघड क्षेत्रासाठीच्या या बदल्यांबाबत शिक्षकांमध्ये संभ्रम आहे. याद्यांवरील हरकती जुलै अखेरपर्यंत घेऊन आता पुढील प्रक्रिया करण्यात येणार आहे. ही बदली प्रक्रिया मे महिन्यात होण्याची गरज होती. मात्र, आता ती ऑगस्टमध्ये होणार असून गेला दिड महिना प्राथमिक शिक्षक या बदलीच्या गोंधळातच आहे. सर्व शिक्षकांकडून ऑनलाईन व ऑफलाईन फॉर्म भरूनही घेण्यात आले. तरीही या बदल्यांच्या गोंधळात सध्या अध्यापनासाठी शिक्षकांची मानसिकता कितपत असणार हा प्रश्नच आहे. त्यामुळे जि. प.च्या प्राथमिक शिक्षणाचा सध्या खेळखंडोबाच सुरू असून त्याला बदली प्रक्रियेचे शैक्षणिक धोरणच जबाबदार आहे.

दरवर्षी शिक्षकांच्या बदल्या जिल्हा व तालुकास्तरावर होत असत. नंतरच्या टप्प्यात या बदल्या जिल्हापातळीवर विनंत्या व तालुकापातळीवर प्रशासकीय व विनंत्या असे धोरण ठरविण्यात आले. हे धोरण ठरविताना शेकडा बदल्यांचे प्रमाण पाच किंवा 10 टक्के असे निर्धारित करण्यात येत असे. मात्र, यावर्षी शासनाकडून शिक्षक बदल्यांचे हे धोरणच बदलण्यात आले. हे धोरण बदलताना सर्वसाधारण व अवघड असे क्षेत्र निश्चित करून बदली करण्याचे आदेश देण्यात आले.

नव्या धोरणानुसार या शिक्षकांनी पूर्ण सेवेमध्ये 10 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीत सर्वसाधारण क्षेत्रात काम केले असेल, तर त्यांना अवघड क्षेत्रात बदली द्यायची आहे. अवघड क्षेत्रात किमान 3 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक काम केलेल्यांना सर्वसाधारण क्षेत्रात बदली देण्याचे आदेश देऊन तशा शाळा निश्चित करण्यास सांगण्यात आल्या व निकष देण्यात आले. मात्र, सर्वसाधारण व अवघड क्षेत्राच्या निकषानुसार शाळा निश्चित करण्यापासून यादीचा घोळ सुरू झाला. या याद्यांना अनेक आक्षेप आले, याद्यांत बदल झाले. त्यानंतर शिक्षक संघटनांकडून या बदल्यांना न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. मात्र, या बदल्यांना स्थगिती मिळू शकली नाही.

शासन धोरणानुसार ही बदली प्रक्रिया 31 मे पूर्वी म्हणजेच शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी होणे अपेक्षित होते. मात्र, या साऱया घोळात ती प्रक्रिया पूर्ण झालीच नाही. किंबहुना बदलीपात्र व बदली नको असलेल्या विशेष संवर्गात येणाऱया शिक्षकांकडून कधी ऑनलाईन, तर कधी ऑफलाईन अर्ज भरून घेण्यात आले. त्यातही अनेक अडचणी सातत्याने येत गेल्या. त्यानंतर आता जिल्हा परिषदेकडून बदलीपात्र शिक्षकांची यादी हरकतीसाठी लावण्यात आली. ज्यावर 31 जुलै 2017 ही हरकती नोंदविण्याची अंतिम तारीख होती. त्यातच जिल्हय़ात अवघड क्षेत्रात 261 शाळा असून 1 हजार 194 शाळा सर्वसाधारण क्षेत्रात आहेत. त्यामुळे सर्वसाधारण क्षेत्रातील एवढय़ा शाळांमधील शिक्षकांना अवघड क्षेत्रात कसे  समाविष्ठ करणार? हा प्रश्न आहे. त्याबाबतच्या धोरणाबाबतही संभ्रम कायम आहे.

तरीही यावर्षीचे शैक्षणिक वर्ष सुरू होऊन सुमारे दिड महिना झाला आहे. या कालावधीत बहुतांश शिक्षक या बदली प्रक्रियेत किंवा जिल्हापातळीवर आपणाला कोणती शाळा मिळणार? ती जवळ असेल का? मुलांना जवळच्या शाळेत ऍडमिशन घेतलेली असल्याने त्यांच्या शाळेचे काय? अशा अनेक विवंचनेत आहेत. कारण बदली प्रक्रिया अद्याप न झाल्याने शिक्षकांची मुले ते सध्या कार्यरत असलेल्या भागातील शाळांमध्ये प्रवेशकर्ती आहेत. साहजिकच नवीन बदली प्रक्रिया आता झाल्यास त्यांनाही अडचणींचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे या साऱयात गेला दिड महिना त्यांची काय मानसिकता आहे व पुढील कालावधीत आता बदल्या झाल्यानंतर काय असणार? हा प्रश्न आहे. त्यामुळे या बदली प्रक्रियेच्या गोंधळात मुलांचे शैक्षणिक नुकसान झाल्यास त्याला जबाबदार शासनाचे धोरण असणार एवढे निश्चित!

Related posts: