|Thursday, December 13, 2018
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » आंबोलीतील दुसरा मृतदेह बाहेर

आंबोलीतील दुसरा मृतदेह बाहेर 

आंबोली येथील कावळेसाद पॉईंटवरून दरीत कोसळलेल्या पर्यटकांपैकी इम्रान गारदी (25, रा. गडहिंग्लज भडगाव) याचा मृतदेह शनिवारी दुपारी बाहेर काढण्यात आला. लोणावळा व सांगेलीच्या टीमने सकाळी 8.30 वाजता शोधमोहीम हाती घेतली. तब्बल सहा तासाने दुपारी 2 वाजता मृतदेह काढण्यात यश मिळाले. गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनीही शनिवारी घटनास्थळी भेट दिली. तसेच आंबोली ग्रामीण रुग्णालयात इम्रानचे वडील व नातेवाईकांची भेट घेऊन सांत्वन केले.

सोमवारी 31 जुलैला वर्षा पर्यटनासाठी गडहिंग्लजहून आलेल्या युवकांपैकी दोघे कावळेसाद पॉईंटवरून दरीत कोसळले होते. त्यासंबंधी व्हिडिओ व्हायरल झाल्यावर या घटनेमागचे सत्य समोर आले होते. या दोघांना दरीतून बाहेर काढण्यासाठी मंगळवारपासून शोधमोहीम हाती घेतली होती. सांगेलीच्या टीमने शुक्रवारी प्रताप उजगरेचा मृतदेह बाहेर काढला. परंतु इम्रानचा मृतदेह शुक्रवारी सायंकाळी उशिरापर्यंत हाती लागला नव्हता.

लोणावळा येथील टीम दाखल

इम्रानचा मृतदेह काढण्यासाठी शनिवारी एनडीआरएफच्या टीमला पोलिसांनी पाचारण केले होते. परंतु शनिवारी लोणावळा येथील शिवदुर्ग ट्रेकर्स टीमचे सातजण आंबोलीत दाखल झाले. सांगेली व लोणावळा येथील टीमने एकत्रित मोहीम हाती घेण्याचे ठरविले. त्यानुसार सकाळी 8.30 वाजता लोणावळा टीमचे रोहित वर्तक व गणेश गिध या दोघांनी दरीत उतरून मृतदेह शोधण्यास सुरुवात केली. दरीत प्रताप उजगरेचा मृतदेह सापडला, तेथपासून काही अंतरावर खाली पाण्यात दगडाच्या कपारीत इम्रान गारदीचा मृतदेह हाती लागला. त्यानंतर दोरीच्या सहाय्याने हा मृतदेह पाच तासानंतर दुपारी 2 वाजता बाहेर काढण्यात आला.

सांगेली, लोणावळा टीमचे कौतुक

सांगेलीच्या टीमचे किरण नार्वेकर, माजी उपसभापती बाबल आल्मेडा, जि. प. माजी सदस्य पंढरी राऊळ, दाजी नार्वेकर, संतोष नार्वेकर यांनी तब्बल सहा दिवस दोन्ही मृतदेह काढण्यासाठी अथक मेहनत घेतली. आंबोलीचे दीपक मेस्त्राr, अमरेश गावडे यांनीही सहकार्य केले. तसेच लोणावळा टीमचे मुळे, आंबोलीचे रहिवासी आनंद गावडे, सुनील गायकवाड, अजय राऊत, राजेंद्र कडू, प्रवीण देशमुख, रोहित वर्तक, गणेश गिध यांनी मोहिमेत सहभाग घेतला. सहाय्यक पोलीस निरीक्षक अरुण जाधव, हवालदार विश्वास सावंत, गुरुनाथ तेली, प्रकाश कदम, देसाई यांनी मृतदेह काढण्यासाठी मदत केली. पोलीस निरीक्षक सुनील धनावडे, तहसीलदार सतीश कदम यांनीही सहकार्य केले. गेळे सरपंच प्रज्ञा गवस, पोलीस पाटील दशरथ कदम सहा दिवस तळ ठोकून होते.

इम्रानच्या नातेवाईकांचे दुःख अनावर

इम्रानचा मृतदेह दरीतून बाहेर काढल्यानंतर त्याचे वडील व इतर नातेवाईकांना अश्रू अनावर झाले. इम्रानच्या जाण्याने त्याच्या कुटुंबावर मोठे संकट ओढवले आहे. पालकमंत्री दीपक केसरकर यांनी कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. शासनाकडून मदत मिळण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान इम्रानच्या मृतदेहाचे विच्छेदन आंबोली आरोग्य केंद्रात डॉ. वर्षा गायकवाड यांनी केले. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

पालकमंत्र्यांना उशिरा जाग -उपरकर

दुर्घटना घडल्यानंतर पालकमंत्री दीपक केसरकर, जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी, तहसीलदार घटनास्थळी फिरकले नाहीत. मृतदेह काढून झाल्यानंतर झोपी गेलेल्या पालकमंत्री केसरकरना जाग आली. त्यांनी आंबोलीत येण्याचे नाटक केले. कोटय़वधी रुपये पर्यटनस्थळांसाठी आणल्याचे केसरकर सांगतात. मग पर्यटनाची बदनामी होते त्याचे काय? आंबोली पर्यटनस्थळी प्रत्येक पॉईंटवर सुरक्षारक्षक तैनात करावेत, असे माजी आमदार परशुराम उपरकर यांनी स्पष्ट केले. काँग्रेसचे जिल्हा प्रवक्ते डॉ. जयेंद्र परुळेकर यांनीही याबाबत प्रशासनावर टीका केली. सहा दिवसात एकदाही प्रशासनाचा अधिकारी घटनास्थळी पोहोचला नाही, असे त्यांनी सांगितले.

पर्यटकांची गर्दी

कावळेसाद पॉईंटवरील दुर्घटनेनंतर सहा दिवस आंबोली परिसर सुन्न होता. शनिवारी पर्यटकांनी गर्दी केली होती. कावळेसाद पॉईंटवर दुपारपासून पर्यटकांची पावले वळत होती. तेथे पोलीस फौज तैनात करण्यात आली होती.

Related posts: