|Thursday, July 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » पोलीस बंदोबस्तात बाबुराव ठाणेकरांनी केली अंबाबाईची पूजा

पोलीस बंदोबस्तात बाबुराव ठाणेकरांनी केली अंबाबाईची पूजा 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

पोलीस अधीक्षकांच्या सुचनेनुसार पुजारी बाबूराव ठाणेकरांना शुक्रवारी अंबाबाई मंदिर सोडून बाहेर जाण्यास भाग पडले होते. मात्र शनिवारी उलटी परिस्थिती घडली. पोलीसांच्या बंदोबस्तातच ठाणेकर यांनी मंदिरात पुन्हा प्रवेश करून अंबाबाईची विधीवत पूजा केली. तसेच त्यांनी अंबाबाईची नित्यनियमाची आरती केली. यानंतर अंबाबाईच्या गाभाऱयातील पायरीवर बसून ठाणेकरांनी मंत्रोपचार केले. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास सर्व धार्मिक विधी करून ठाणेकर हे पुन्हा पोलीस बंदोबस्तात कपिलतीर्थ मार्केटमधील आपल्या घरी निघून गेले.

  दोन महिन्यांपूर्वी पुजारी अजित ठाणेकर यांनी अंबाबाईची घागरा-चोळीत बांधलेली पूजा आणि अंबाबाईच्या पूजेसंदर्भातील राजर्षी शाहू महाराजांच्या वटहुकूमाला तथाकथित, गैरलागू ठरविल्याच्या कारणांवरून ठाणेकर कुटुंबीय व अंबाबाई मंदिर पुजारी हटाव संघर्ष समितीतील वाद टोकाला गेला आहे. संघर्ष समितीने मंदिरात पगारी पुजारी नेमण्याची तसेच ठाणेकर कुटुंबीयांना मंदिरात येण्यास मनाई करावी, अशी मागणी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांच्याकडे केली होती. जिल्हाधिकाऱयांनी ही सध्या सुरू असलेला वाद मिटून शहरात कायदा व सुव्यवस्था स्थिर होईपर्यंत मंदिर प्रवेश करु नये, असे ठाणेकर कुटुंबीयांना तेंडी सांगितले होते.

  दरम्यान, तब्बल दोन महिन्यांच्या कालावधीनंतर काल (शुक्रवारी) आलेल्या वारानुसार अजित ठाणेकर यांचे वडील बाबुराव ठाणेकर हे अंबाबाईच्या पुजेसाठी मंदिरात आले होते. मात्र त्यांच्या मंदिर प्रवेशावरून नव्या वादाला तोंडू फुटू नये यासाठी जिल्हाधिकारी सुभेदार यांच्या सांगण्यावरून पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांनी ठाणेकर यांना मंदिर सोडून आपल्या घरी जाण्यास सांगितले होते. त्यांनीही परिस्थितीचे भान राखून घरी जाणे पसंत केले होते. मात्र शनिवारी पुजेच्या सर्व तयारीनिशी पोलीस बंदोबस्तात ठाणेकर हे पुन्हा सकाळी मंदिरात आले. त्यांनी नित्यनियमाने अंबाबाईची पूजा केली. काही काळ गाभाऱयातील पायऱयांवर बसून मंत्रोपचार केले. यानंतर आरती केली. आरतीनंतर ही त्यांनी पुन्हा काही काळ गाभाऱया पायऱयांवर बसणे पसंत केले. या दरम्यान, ठाणेकर हे मंदिरात गेल्याची माहिती समजल्यानंतर संघर्ष समितीकडून ठाणेकरांना मंदिरातून बाहेर काढण्याचा प्रकार घडू नये यासाठी मंदिर आवार आणि मंदिराच्या पितळी उंबऱयाच्या आत काही पोलीस थांबून होते. ठाणेकरांनी मनसोक्त मंत्रोपचार केल्यानंतर आपल्या घरी जाणे पसंत केले. यानंतर त्यांना पोलीस बंदोबस्तातच दुपारी दोनच्या सुमारास कपिलतीर्थ मार्केटपरिसरातील त्यांच्या घरी सोडण्यात आले.