|Sunday, June 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » प्रा.शिक्षक बदल्या संदर्भात डॉ. येळगांवकर यांच्या नेतृत्वाखाली मंत्री मुंडे यांना भेटले शिष्टमंडळ

प्रा.शिक्षक बदल्या संदर्भात डॉ. येळगांवकर यांच्या नेतृत्वाखाली मंत्री मुंडे यांना भेटले शिष्टमंडळ 

प्रतिनिधी/ सातारा

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागात शिक्षक म्हणून सेवा करण्याची संधी मिळावी, यासाठी जिह्याबाहेरील मूळ सातारकरांनी बदली करुन घेतली; पण सातारा जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने दुर्गम भागात बदलीचे आदेश काढल्यामुळे अनेक शिक्षकांना मानसिक धक्का बसला, तर अपंग शिक्षकांना राजीनामा देवून खासगी क्लास सुरु करण्याशिवाय पर्याय राहिला नाही, अशी स्थिती निर्माण झाल्याने शिक्षकांनी भाजपचे नेते डॉ. दिलीप येळगांवकर यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांची शिष्टमंडळाने भेट घेतली. यावेळी सकारात्मक चर्चा झाली.

  जिल्हा परिषदेने दुर्गम भागातील जावली, पाटण, महाबळेश्वर या तालुक्यांत ग्रामस्थांच्या मागणीनुसार शिक्षक नेमण्याच्या आदेशाचे पालन म्हणून सुमारे 165 शिक्षकांना त्या-त्या तालुक्यातील शाळांमध्ये हजर राहण्यासाठी आदेश दिले. हा आदेश हाती येताच अनेक शिक्षकांना रडू कोसळले. काहींनी जिल्हा परिषदेचे वरिष्ठ अधिकारी, पदाधिकारी, शिक्षक संघटना व राजकीय नेत्यांची भेट घेतली. योगायोगाने साताऱयात एका मेळाव्यासाठी आलेले शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांचीसुद्धा शिक्षकांनी भेट घेवून आपली गाऱहाणी मांडली होती. परंतू, त्याचा फारसा उपयोग होणार नाही, याची कल्पना आल्यामुळे रडकुंडीला आलेल्या शिक्षक व त्यांच्या नातेवाईकांनी भाजप नेते डॉ. दिलीप येळगांवकर यांची साताऱयात भेट घेतली. त्यानंतर त्यांच्या सूचनेवरुन मुंबई मंत्रालय येथे ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांच्याकडे अक्षरश: शिक्षकांनी रडत रडत आपल्या भावना व्यक्त केल्या. ज्याठिकाणी ग्रामस्थ महिनोंमहिने दळणवळणाचे साधन नसल्यामुळे वाडय़ा-वस्तीतून बाहेर निघत नाहीत. अशा शाळांमध्ये काही महिला व अपंग शिक्षकांची बदली जिल्हा परिषदेने केली आहे. ही बाब 290 शिक्षकांना समजल्यामुळे ते या बदलीप्रक्रियेमध्ये हजर झाले नाहीत. जिल्हा परिषदेने रोष्टरचे काम पूर्ण न केल्याने अनेक ठिकाणी मुख्याध्यापक, केंद्र प्रमुख, विस्तार अधिकारी यांची पदे भरली नाहीत, त्यामुळे काहींना सेवानिवृत्त होण्याशिवाय गत्यंतर राहिले नाही. ही वस्तुस्थिती मंत्री महोदय़ांपुढे मांडण्यात आली.

   सध्या केंद्रात व राज्यात भाजपचे सरकार असताना सर्वच स्तरातील लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. ही सरकारच्या चांगल्या कामाची पोचपावती आहे. सातारा जिह्यात भाजप नेते डॉ. येळगांवकर, दीपक पवार, अमित कदम यांच्यासारखे जागरुकतेने काम करणारे कार्यकर्ते आहेत. त्यामुळे शिक्षकांच्या समस्या शासनाला समजल्या आहेत. त्यातून सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन मंत्री मुंडे यांनी दिल्याची माहिती शिक्षकांनी दिली. यावेळी रमेश जाधव, रोहिणी वंजारी, प्रियंका कर्णे, भोईटे, गायकवाड, मोरे, खुडे व शिक्षक उपस्थित होते.