|Saturday, December 15, 2018
You are here: Home » आवृत्ती » गोवा » अंजुणे धरणाने गाठली 90 मीटर्सची पातळी

अंजुणे धरणाने गाठली 90 मीटर्सची पातळी 

प्रतिनिधी/ डिचोली

डिचोली व सत्तरी तालुक्याबरोबर संपूर्ण गोव्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असलेले केरी-सत्तरीतील अंजुणे धरणाने 5 ऑगस्टपर्यंत 90.16 मीटर्स इतकी पाण्याची पातळी गाठली आहे. येत्या आठ दिवसांत हे धरण फुल्ल होणार असून अतिरिक्त पाणी समोरील नदीत सोडण्यासाठी धरणाने दरवाजे खुले करावे लागणार आहेत, अशी माहिती देण्यात आली.

एकूण 93.2 मीटर्स इतकी क्षमता असलेल्या या धरणात आजपर्यंत 90.16 मीटर्स इतके पाणी साठवले आहे. पावसाचा मारा धरणक्षेत्रात व चोर्ला घाटमाथ्यावर जास्त प्रमाणात राहिल्यास 90 मीटर्सनंतर सांखळीतील वाळवंटी नदीला भरती व ओहोटीचा अंदाज घेऊन ओहोटीच्यावेळी धरणातील पाणी समोरील कष्टी नदीत सोडले जाते. मात्र सध्याच्या परिस्थितीत पावसाचा जोर मोठा नाही. समाधानकारक पाऊस होत असल्याने धरणातील पाणी आताच सोडण्याचे नियोजन नाही.

येत्या आठ दिवसांत धरणक्षेत्रात पडणाऱया पावसामुळे तसेच डोंगर कपारीतून वाहून येणाऱया प्रचंड पाण्यामुळे धरण पूर्णपणे भरण्याची शक्यता आहे. मात्र आत्ताच ऑगस्ट महिन्याच्या मध्यवर्तीच धरण पूर्णपणे म्हणजे 93.2 मीटर्स इतके भरून न घेता पुढील पावसाचा अंदाज घेऊन 90 किंवा 91 मीटर्सनंतर धरणात भरणारे अतिरिक्त पाणी सोडण्यात येणार आहे. 5 ऑगस्टपर्यंत धरणक्षेत्रात 86 इंचे इतका पाऊस झालेला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत 4 इंचाने कमी आहे. गेल्यावर्षी 2016 मध्ये 5 ऑगस्टपर्यंत 82 इंच पावसाची नोंद झाली होती. आता 90 मीटर्स पाण्याची पातळी झालेली आहे. अजून पावसाचे दोन महिने बाकी आहेत. 91 मीटर्सपर्यंत पोहोचल्यानंतर हळूहळू धरणातील पाणी सोडण्यात येणार आहे. त्याची सूचना यापूर्वीही लोकांना देण्यात आलेली आहे, असे धरणाचे साहाय्यक अभियंता जी. एस. पोवाडी यांनी सांगितले.

Related posts: