|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निषेधार्थ व्यापाऱयांचा बंद

प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निषेधार्थ व्यापाऱयांचा बंद 

वार्ताहर/ उगार खुर्द

येथील उगार साखर कारखान्याकडून प्रदूषण होत असल्याचा आरोप करत राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारखान्याला टाळे ठोकले आहेत. त्यामुळे दोन दिवसापासून कारखाना बंद आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या या निर्णयाच्या निषेधार्थ रविवारी येथील व्यापाऱयांनी आपली दुकाने बंद ठेवली. तसेच काळी फित बांधून गावातील प्रमुख रस्त्यावरून मोर्चा काढण्यात आला.

येथील उगार साखर कारखाना 75 वर्षापासून कार्यरत असून राज्यातील विविध प्रकल्प असलेला हा मोठा कारखाना आहे. आजतागायत कारखान्यात अशी समस्या कधीच झाली नाही. मात्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळच्या आरोपामुळे कारखाना बंद असल्याने कामगार, ऊस बागायतदार व ग्रामस्थ यांच्यामधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. दोन दिवसापासून कारखाना बंद असल्याने कामगारांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे कामगारातून संताप व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर गावातील सर्व व्यापाऱयांनी राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळच्या निषेधार्थ आपली दुकाने रविवारी दिवसभर बंद ठेवून कामगारांच्या कृतीस पाठिंबा दिला व निषेध नोंदविला.

रविवारी सकाळी 9 वाजता कारखान्याच्या मुख्य प्रवेशद्वारावर अनेक कामगार जमा झाले. यावेळी अधिकारी व कामगारांनी आपल्या भावना व्यक्त केल्या व कागारांनी आंदोलन शांततेने करावे, असे आवाहन केले. आम्हास न्याय द्या, काम करणाऱया हातास शिक्षा का? आमचे काय चुकले? सत्यमेव जयते, असे फलक घेऊन कामगारांनी काळ्या फिती बांधून मोर्चास सुरुवात केली. यावेळी अनेक महिलांचा सहभाग होता. हा मोर्चा कारखाना प्रवेशद्वारापासून लक्ष्मी मंदिरामार्गे, चन्नम्मा सर्कल जवळून रेल्वेस्थानकापर्यंत गेला. येथून पुन्हा कारखाना गेटपाशी आला. यामध्ये हजारो कामगार, व्यापारी, ग्रामस्थ व महिला सहभागी झाल्या होत्या. कारखाना गेटजवळ जाहीर सभा झाली. यावेळी कामगारांना शेतकरी व ग्रामस्थांनी पाठिंबा जाहीर केला.

व्यापाऱयांनी दुकाने बंद केल्याने बाजारपेठेत शुकशुकाट होता. गावातील सर्व व्यवहार थंडावले आहेत. कारखाना कधी सुरू होणार याकडे सर्वांचे लाक्ष लागले आहे. कारखाना लवकर सुरू व्हावा, अशी मागणी कामगार व ग्रामस्थातून होत आहे.

कॉलनीतील वीजपुरवठा, पाणीपुरवठा बंद

उगार साखर कारखाना दोन दिवसापासून बंद असल्याने विनायक स्मृती, न्यू कॉलनी इत्यादी कामगार वसाहतीमधील वीजपुरवठा व पाणीपुरवठा बंद आहे. यामुळे कामगारांची गैरसोय झाली आहे. यावेळी वसाहतीमधील महिला पत्रकाराशी संतप्त प्रतिक्रीया व्यक्त करताना म्हणाल्या, रात्रीच्यावेळी वीजपुरवठा नसल्याने व घरी रॉकेलचे दिवे नसल्याने अंधारातच स्वयंपाक करण्याची वेळ आली आहे. राज्य प्रदूषण मंडळाच्या या आरोपामुळे शासनाने आम्हास पाणी व विजेची सोय करावयास पाहिजे. शासनाचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. कारखाना लवकर न सुरू झाल्यास आम्ही गृहिणीही रस्त्यावर उतरू, असे ही त्यांनी सांगितले.

या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज दि. 7 (सोमवार) सकाळी दहा वाजल्यापासून रास्तारोको करण्यात येणार आहे, असा निर्णय कामगार ग्रामस्थांनी घेतला आहे. या संबंधीचे निवेदन मुख्यमंत्री सिद्धरामय्या व शासनाच्या विविध विभागांना पाठविण्यात आले आहे.