|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » उद्योग » इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये विक्रमी गुंतवणूक

इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये विक्रमी गुंतवणूक 

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

जुलै महिन्यात इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये विक्रमी 12,727 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली. भांडवली बाजारातील तेजी आणि आरबीआयकडून रेपोदरात कपात होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती, त्यामुळे या प्रकारातील गुंतवणुक वाढलेली आहे. इक्विटी योजनांमध्ये गुंतवणूक करण्याच्या प्रमाणात वाढ होण्याचा हा सलग 16वा महिना आहे. यापूर्वी मार्च 2016 मध्ये अशा फंडमध्ये 1,370 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली होती.

इक्विटी म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत वाढ होत असल्याने एकूण गुंतवणुकीचा आकडा गेल्या महिन्याच्या 5.91 लाख कोटी रुपयांवरून 6.3 लाख कोटी रुपयांवर पोहोचला आहे. जून महिन्यात 8,164 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली होती. सरकारकडून पारंपरिक ठेवींवरील व्याजदरात कपात करण्यात येत असल्याने गुंतवणूकदार आता इक्विटी म्युच्युअल फंडकडे वळत आहेत. गेल्या काही वर्षांपासून सोने आणि स्थावर मालमत्ता क्षेत्रातून अपेक्षेप्रमाणे परतावा मिळत नाही.

म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यासाठी सामान्य गुंतवणूकदारांकडून सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेन्ट प्लॅन्स एसआयपी चा वापर करण्यात येत आहे. यानुसार दर महिन्यात ठराविक गुंतवणूक करण्यात येते. यानुसार साप्ताहिक, मासिक आणि तिमाही पद्धतीने गुंतवणूक करता येते.