|Saturday, May 26, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » ‘पीओपी’ संदर्भात पोलिसांतर्फे बैठका नाहीच

‘पीओपी’ संदर्भात पोलिसांतर्फे बैठका नाहीच 

प्रतिनिधी/ चिकोडी

गणेशोत्सवाला केवळ 3 आठवडे शिल्लक असूनदेखील चिकोडी पोलीस खात्यातर्फे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती प्रतिष्ठापनेविषयी कोणत्याच प्रकारच्या सूचना मिळाल्या नाहीत. पण सुज्ञ मंडळांच्या कार्यकर्त्यांद्वारे पीओपी मूर्तीविषयी पोलीस अधिकाऱयांना विचारले असता पीओपी बंदीचा आदेश असून त्याचे पालन करावे, अशा सूचना मिळत आहेत. पोलीस खात्याच्या या धोरणाबाबत सार्वजनिकांत उलटसुलट चर्चा सुरू आहेत.

पीओपी बंदीच्या काटेकोर अंमलबजावणीसाठी चिकोडी शहरातील सर्व सार्वजनिक मंडळांच्या प्रमुखांना बोलावून पोलीस खात्याद्वारे सभा घेऊन मार्गदर्शन करणे आवश्यक आहे. पण अजूनदेखील पोलीस खात्याने अशी कोणत्याच प्रकारची सभा घेतलेली नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांना मूर्तीविषयक कोणता निर्णय घ्यायचा हे अवघड बनले आहे. काही मंडळांनी पोलिसांचा गणेशोत्सवादरम्यान नाहक त्रास होऊ नये म्हणून शाडूच्या मूर्तींनाच ऑर्डर दिली आहे.

तर शहरी व ग्रामीण भागातील ज्यांना पीओपी बंदीविषयी माहिती नाही अशांना एक-दोन महिन्यापूर्वीच महाराष्ट्रातील गडहिंग्लज, कोल्हापूर, सांगाव, हुपरी, इचलकरंजी, कागल आदी ठिकाणी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींना ऑर्डर दिली आहे. ऐनवेळी अशा मंडळांना पोलीस खात्यातर्फे अडचणी करण्यात आल्या तर यंदाचा गणेशोत्सव एका वेगळ्य़ा वळणावर जाऊन पोहोचण्याची शक्यता सध्या चिकोडीत ऐकावयास मिळत आहे.

केवळ मूर्तीकारांनाच सूचना

उपलब्ध माहितीनुसार चिकोडी पोलिसांनी नगरपालिकेच्या साहाय्याने शहरातील मूर्तीकारांना पीओपीच्या मूर्ती न बनविण्याचे आदेश बजावले आहेत. पण सार्वजनिक मंडळांच्या श्रींच्या मूर्ती महाराष्ट्रातून प्रतिवर्षी आणल्या जातात. त्यामुळे मूर्तीकारांप्रमाणेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ प्रमुखांना देखील पोलीस खात्यातर्फे आदेश देणे आवश्यक होते. पण ते न दिल्याने चिकोडी शहरात जर पीओपीच्या मूर्ती आल्या तर पोलीस खाते बुचकळ्य़ात सापडणार त्यात तीळमात्र शंका नाही.

रंगकामात मग्न

सध्या चिकोडी शहरातील व गडहिंग्लजहून आलेले मूर्तीकार शाडूपासून बनविलेल्या मूर्तींना रंग देण्यात मग्न असून मोठय़ा व उंच मूर्तींच्याऐवजी 4 ते 5 फुटापर्यंत उंचीच्या शाडूच्या मूर्ती बनविल्या आहेत. घरगुती गणेश मूर्तींचे रंगकाम आटोपले असून सध्या मूर्तीकार उंच व मोठय़ा मूर्तीच्या रंगकामात व्यस्त आहेत. एकंदरीत पीओपी बंदीमुळे सार्वजनिक तसेच घरगुती श्रींच्या मूर्तींचा खर्च वाढणार असल्याने श्रींच्या भक्तांनी तितक्याच उत्साहाने खर्चाची तरतूद केल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

Related posts: