|Thursday, April 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » आम्ही येतोय मुंबईला सरकारला जागं करायला

आम्ही येतोय मुंबईला सरकारला जागं करायला 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

आम्ही येतोय मुंबईला सरकारला जागं करायला अशी  शाहिरी कवनं गात हजारो मावळे मंगळवारी रात्री महालक्ष्मी एक्सप्रेस आणि सहय़ाद्री एक्सप्रेसने मुंबईला रवाना झाले. रेल्वेसह एस.टी. आराम बस आणि खासगी वाहनानेही शेकडो कार्यकर्ते गेले. आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे अशा घोषणांनी छत्रपती राजर्षि शाहू महाराज टर्मिनस दणाणले.

मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे यासह अन्य मागण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने मुंबईत आज मराठा क्रांती मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर गेले आठवडाभर जनजागृतीसाठी संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला. मोर्चासाठी कोल्हापूरातून दोन दिवसापासून मावळे रवाना होत आहेत. मोर्चाला जाणाऱया मावळयासाठी महालक्ष्मी आणि सहय़ाद्री एक्सप्रेसला जादा डब्ब्यांची सोय करण्यात आली होती. महालक्ष्मी एक्सपेसला तीन तर सहय़ाद्री एक्सप्रेसला सहा डब्यांची सोय करण्यात आली आहे.

सायंकाळी सहा वाजल्यापासून छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजाऊंचा जयघोष  करत हजारो कार्यकर्ते  रेल्वे स्टेशनवर दाखल झाले. साडेसात वाजण्याच्या सुमारास मावळे आणि भगव्या झेंडय़ांनी रेल्वे स्टेशन फुलून गेले. आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे अशा घोषणांनी रेल्वे स्टेशन दणाणून गेले. सर्व मावळे स्टेशनवर दाखल झाल्यावर मावळयांनी एकमेकांशी संवाद साधला. तसेच स्टेशन अधीक्षक सुग्रीव मीना आणि रेल्वे पोलिसांशी संपर्क साधला. यावेळी मावळे शिस्त पाळत रेल्वेच्या डब्यात आसनस्थ झाले. मोर्चाला जाणाऱया मावळयांच्या चेहऱयांवर प्रचंड उत्साह दिसत होता. रात्री 8. 45 वाजता महालक्ष्मी एक्सप्रेस निघाली आणि पुन्हा एकदा जय जिजाऊ जय शिवाजीचा निनाद झाला.

खासगी बसने रवाना

रेल्वेबरोबरच खासगी बसने शेकडो मावळे मुंबईला रवाना झाले. मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक, अवधूत पाटील, शशिकांत पाटील यांच्यासह कार्यकर्ते आरामबसमधून रात्री रवाना झाले.

ग्रामीण भागातून एस.टी. आणि खासगी वाहनाने मोर्चाला हजेरी

मुंबईत आज होणाऱया मोर्चासाठी ग्रामीण भागातही उत्साह होता. यामुळे एस.टी. खासगी वाहनाने हजारो कार्यकर्ते मुंबईला रवाना झाले. दिवसभरात पुणे – बेंगलोर महामार्गावर मराठा क्रांती मोर्चाचे स्टीकर आणि भगवे झेंडे लावलेली शेकडो वाहने दिसत होती.

रेल्वेत स्वच्छता राखण्यासाठी मावळे

रेल्वेतून जात असताना रेल्वेत  आणि रेल्वे स्टेशनवर कचरा होऊ नये याची काळजी मावळयांनी घेतली होती. यासाठी मावळयांनीच स्वयंसेवकांची नेमणुक केली  होती. पाण्याच्या बाटल्या,  रिकामे फूट पॅकेटस, खाद्यपदार्थांचे वेस्टन असा कचरा कुठेही बाहेर न टाकता तो एकत्र करण्याठी मोठया प्लॅस्टिकच्या पिशव्या ठेवण्यात आल्या होत्या.

 रेल्वे प्रशासनाचे  मोर्चेकऱयांना सहकार्य

मोर्चाला जाणाऱया मावळयांची कोणतीही गैरसोय होऊ नये याची दखल रेल्वे प्रशासनाने घेतली होती. स्टेशन अधीक्षक सुग्रीव मीना मावळयांना जादा डब्बा कुठे जोडला आहे, कोणत्या डब्यात जागा आहे याबाबत मार्गदर्शन करत होते. रेल्वे पोलीस आणि रेल्वे सुरक्षा बलानेही सुरक्षिततेच्या दृष्टीने  काळजी  घेतली.

पाण्याच्या बाटल्या, फूड पॅकेटस आणि निलगिरी तेलाचे वाटप

माजी आमदार मालोजीराजे यांच्या वतीने  रेल्वेने जाणाऱया मावळयांना फूड पॅकेटस वाटण्यात आली. आमदार राजेश क्षीरसागर यांच्यावतीने पाण्याच्या बाटल्या आणि निलगिरी तेल देण्यात आले. तर आजरेकर फाऊंडेशनच्या वतीने गणी आजरेकर यांनी पाण्याच्या बाटल्या वाटल्या.

 

 

 

 

 

Related posts: