|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » अल-कायदाच्या 2 संशयितांना अटक

अल-कायदाच्या 2 संशयितांना अटक 

नवी दिल्ली/ वृत्तसंस्था :

नवी दिल्लीत दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये अल-कायदाशी संबंधित दोन संशयित दहशतवाद्यांना अटक करण्यात आली. एका दहशतवाद्याला सौदी अरेबियात पकडून आणण्यात आले, पोलीस सध्या याप्रकरणी तपास करत आहेत.

पहिल्या घटनेत दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने सय्यद मोहम्मद जीशान अली याला अटक केली. जीशान याला सौदी अरेबियातून आणले गेले होते. जीशान विरोधात पोलिसांनी एक वर्ष अगोदरच लुकआउट नोटीस काढली होती. या अगोदर 2015 मध्ये अल-कायदा इन इंडियन सबकॉन्टीनेंटच्या 3 हस्तकांना अटक झाली होती.  जीशान दहशतवादी जाळ्याशी निगडित होता आणि भारतात दहशतवादाचा प्रसार करण्याच्या प्रयत्नात होता असे विशेष शाखेचे डीसीपी प्रमोद कुशवाह म्हणाले.

बंगाल पोलिसांच्या माहितीमुळे अटक

25 वर्षीय संशयित दहशतवादी राजा-उल-अहमद याच्याविषयी पश्चिम बंगाल पोलिसांनी माहिती दिली होती. अहमदला मागील आठवडय़ात अटक करण्यात आल्याचे दिल्ली पोलिसाच्या वरिष्ठ अधिकाऱयांकडून सांगण्यात आले. अहमदला कोठे आणि कोणत्या तारखेला अटक झाली, याविषयी माहिती देण्यात आली नाही. अहमद हा अंसरुल्ला बांग्ला टीमचा संशयित सदस्य आहे.  बांगलादेशात अल-कायदाचे समर्थनप्राप्त गट म्हणून या संघटनेला ओळखले जाते.