|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » विदेशी पर्यटकांना गंडा प्रकरणी गुन्हा नोंद

विदेशी पर्यटकांना गंडा प्रकरणी गुन्हा नोंद 

प्रतिनिधी /पणजी :

सनातन फायनान्स व रिएल इस्टेट कंपनीच्या नावाखाली विदेशी पर्यटकांना कोटय़वधी रुपयांना लुटणाऱया (कंपनीचे मालक) सुनील कुमार, अंकित कुमार व सिन्थिया दुर्भाटकर विरोधात केपे पोलीस स्थानकात तक्रार नोंद झाली आहे. भादंसं 420 कलमाखाली हा गुन्हा नोंद केला आहे. 2016 साली दाखल केलेली ही तक्रार दाबण्याचा प्रयत्न केला जात होता. ‘तरुण भारत’ने या प्रकरणाला वाचा फोडल्याने अखेर संशयिता विरोधात गुन्हा नोंद करणे पोलिसांना भाग पडले. या प्रकरणात काही पोलीस अधिकारीही गुंतले असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.  

गोव्यात घरे देण्याचे खोटी आमिषे दाखवून विदेशी पर्यटकांना गंडा घातल्याचे वृत्त ‘तरुण भारत’ने दि. 21 जून 2017 रोजी प्रसिद्ध करुन या प्रकरणाला वाचा फोडली होती. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी त्याची दखल घेऊन या प्रकरणाबाबत पोलीस महासंचालकांना जाब विचारला होता. त्यानंतर सर्व चक्रे तातडीने फिरली व संशयितांविरोधात गुरुवारी दि. 10 ऑगस्टला गुन्हा नोंद झाला आहे. लवकरच संशयिताला अटक होण्याची शक्यता आहे.

कोटय़वधी रुपयाला लुटले

अनेक विदेशी पर्यटकांना कोटय़वधी रुपयांना संशयितांनी लुटले आहे. 2011 सालापासून फसवणूक झालेल्या पर्यटकांनी केपे पोलीस स्थानकात तक्रारीही दाखल केल्या केल्या होत्या. तक्रारी नोंद करण्याचे सोडून पोलीस उलट तक्रारदारांनाच धमकावत होते. त्यामुळे गेली सात वर्षे हे प्रकरण फाईल बंद होते.