|Wednesday, May 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » उरलेल्या बांधकामावर कधी कारवाई होणार

उरलेल्या बांधकामावर कधी कारवाई होणार 

प्रतिनिधी /महाबळेश्वर :

पालिकेने फौजदारी गुन्हा दाखल केला असला, तरी त्याची पर्वा न करता वेण्णानदीच्या पात्रावर अतिक्रमण करून राजरोसपणे सुरू असलेले अनधिकृत बांधकाम पालिकेने बंद पाडले. पालिकेच्या या भूमिकेमुळे या भागातील अनेक अनधिकृत बांधकाम करणारे धनिकांचे चांगलेच धाबे दणाणले असून उरलेल्या बांधकामांवर कधी कारवाई होणार?, असा प्रश्न नागरीक उपस्थित करीत आहेत. 

   वेण्णा धरणापासून ते मेट गुताड या गावापर्यंत वेण्णानदीच्या पात्रावर स्थानिक शेतकरी यांच्यासह अनेक धनिकांनी ढाबा, हॉटेल, लॉज, गेम यासाठी अतिक्रमण करून अनेक बेकायदेशीर बांधकामे उभी केली आहेत. या बांधकामावर पालिका कोणतीही कारवाई करीत नसल्याने आजही या भागात मोठय़ा प्रमाणावर अनधिकृत बांधकामे सुरू आहेत. या बांधकामामध्ये सुरू असलेल्या हॉटेल व्यवसायीकांचे सांडपाणी थेट या नदी पात्रात सोडण्यात येते, त्यामुळे वेण्णानदीचे पात्र प्रदुषित होत आहे. तसेच नदीपात्रावर अतिक्रमण करून मोठी बांधकामे सुरू असलेल्याची तक्रार पालिकेच्या मुख्याधिकारी अमिता दगडे-पाटील यांच्याकडे करण्यात आली असता, या तक्रारीची मुख्याधिकाऱयांनी तातडीने दखल घेत, त्यांनी पालिका कर्मचाऱयांचा ताफा संबंधित बांधकामांवर पाठविला. तेथे बेकायदेशीर इमारतीचे काम सुरू असल्याचे आढळून आले. या इमारतीचे दोन स्लॅब पूर्ण झाले होते, तर तिसरा स्लॅब टाकण्याचे काम सुरू होते. मात्र, पालिका कर्मचाऱयांनी ते बांधकाम बंद पाडले. तसेच बांधकामास वापरण्यात आलेले साहित्यही पालिका कर्मचाऱयांनी जप्त केले. पालिकेने घेतलेल्या या भूमिकेमुळे वेण्णानदी पात्रावर अतिक्रमण करून उभी करण्यात आलेल्या बांधकाम धारकांचे धाबे दणाणले आहेत.  

Related posts: