|Sunday, July 22, 2018
You are here: Home » क्रिडा » तुर्कीच्या रॅमिलला 200 मीटर्सचे सुवर्ण

तुर्कीच्या रॅमिलला 200 मीटर्सचे सुवर्ण 

विश्व ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप :  जागतिक स्पर्धेत प्रथमच यश,

वृत्तसंस्था/ लंडन

तुर्कीच्या 27 वर्षीय रॅमिल गुलिएव्हने विश्व ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये 200 मीटर्सची शर्यत 20.09 सेकंदात जिंकत सुवर्णपदकावर आपली मोहोर उमटवली. रॅमिलचे एखाद्या जागतिक स्पर्धेतील हे पहिलेच सुवर्ण असून दक्षिण आफ्रिकेच्या वेड व्हान निएकेर्क या इव्हेंटमध्ये दुसऱया स्थानी फेकला गेला. त्रिनिदाद अँड टोबॅगोच्या जेरीम रिचर्ड्सला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. बोट्सवानाचा इसाक मॅकवाला सहाव्या स्थानी फेकला गेला.

आश्चर्याची बाब म्हणजे रॅमिलला 2011 मध्ये तुर्की नागरिकत्व लाभले असून 2013 पासून त्याला देशाचे प्रतिनिधीत्व करण्याची संमती मिळाली. या इव्हेंटमधील उपांत्य फेरीतच त्याने वेब व व्हान निएकेर्कसारख्या दिग्गजांना पिछाडीवर टाकत खळबळ उडवून दिली. त्याचीच पुनरावृत्ती त्याने अंतिम फेरीत केली आहे.

याशिवाय, 400 मीटर्स अडथळय़ाच्या शर्यतीत अमेरिकेच्या कोरी कार्टरने धक्कादायक सुवर्ण पटकावले. ऑलिम्पिक चॅम्पियन डॅलिलाह मोहम्मदला या इव्हेंटसाठी फेवरीट मानले जात होते. पण, कोरीने अनपेक्षित बाजी मारली. तिने 53.07 सेकंद वेळेसह सुवर्णपदकावर कब्जा केला. या वर्षात जागतिक स्तरावरील सर्वात वेगवान महिला ठरलेल्या डॅलिलाहला 53.50 सेकंद वेळ नोंदवल्यानंतर रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

झेक प्रजासत्ताकची झुझाना हेजनोव्हा 54.20 सेकंद या हंगामातील वैयक्तिक सर्वोत्तम वेळ नोंदवल्यानंतर कांस्यपदकाची मानकरी ठरली. अन्य इव्हेंट्समध्ये 1500 मीटर्स धावण्याच्या शर्यतीत तिहेरी विद्यमान जेत्या ऍबेल किप्रोपने अंतिम फेरीत धडक मारली. तेथे केनियाच्या इलिजॅह मोटोनेई मॅनांगोईशी मुख्य स्पर्धा असेल. पुरुषांच्या तिहेरी उडीत अमेरिकेच्या ख्रिस्तियन टेलरने सुवर्ण जिंकले.

अन्य इव्हेंट्समध्ये लांब उडीत तियाना बार्टोलेटा जेतेपद कायम राखण्यासाठी प्रयत्नशील असेल. अलीकडेच ‘व्हाय यू आर नॉट अ ट्रक स्टार’ हे इ-बूक प्रकाशित करणारी तियाना सध्या फॉर्ममध्ये असून यापूर्वी 2015 चॅम्पियनशिप व रिओ ऑलिम्पिकमध्ये तिने सुवर्ण जिंकले आहे. आश्चर्य म्हणजे ब्राझीलला 4ƒ100 मीटर्स रिलेत सुवर्ण जिंकून देण्यातही तिचा मोलाचा वाटा राहिला होता.

या चॅम्पियनशिपमध्ये आणखी दोन दिवसांचे इव्हेंट्स बाकी असताना महिलांच्या 200 मीटर्स फायनलमध्ये बहमासच्या शॉने मिलेर-युबोने आपले स्थान निश्चित केले. या इव्हेंटमध्ये तिला सलग विश्व जेतेपदे संपादन करणारी पहिली डच ऍथलिट ठरु पाहणाऱया डॅफने स्किपर्सचे कडवे आव्हान असणार आहे.

देविंदर अंतिम फेरीत पोहोचणारा पहिला भारतीय

देविंदर सिंग कांग हा या स्पर्धेतील भालाफेक इव्हेंटमध्ये अंतिम फेरीत पोहोचणारा एकमेव भारतीय ठरला. मात्र, त्याच्यापेक्षा अधिक चर्चेत राहिलेला नीरज चोप्राचे आव्हान मात्र पात्रता फेरीतच संपुष्टात आले. त्याला 82.26 मीटर्सची फेक करता आली. कांग सध्या खांद्याच्या दुखापतीमुळे त्रस्त आहे. मात्र, तिसऱया व शेवटच्या फेकीत 84.22 मीटर्स अंतराची फेक करत त्याने अंतिम फेरीतील आपले स्थान निश्चित केले. 83 मीटर्सची फेक पात्रतेसाठी पुरेशी असताना त्याची ही कामगिरी विशेष लक्षवेधी ठरली.

मूळ पंजाबचा असणारा 26 वर्षीय देविंदर सिंगवर शेवटच्या प्रयत्नात बरेच दडपण होते. तो पात्रता फेरीतील शेवटचा स्पर्धक असल्याने त्याच्या कामगिरीवरच जर-तरची समीकरणे अवलंबून होती. मात्र, त्याची फेक उत्तम झाल्यानंतर भारतीय पथकासाठी देखील हा मोठा दिलासा ठरला. पात्रता फेरीत अ गटातून 5 व ब गटातून 7 असे 12 स्पर्धक अंतिम फेरीत पोहोचले. या इव्हेंटमधील अंतिम फेरी आज (दि. 12) होत आहे.

Related posts: