|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » गोव्यात दोघा शार्पशुटरना अटक

गोव्यात दोघा शार्पशुटरना अटक 

प्रतिनिधी/ पणजी

गोव्यात एका व्यावसायिकाची हत्या करण्यासाठी आलेल्या सहापैकी दोन शार्पशुटरना गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी (सीआयडी) अटक  केल्याने एकच खळबळ माजली. त्यांच्याकडून देशी बनावटीची 6 पिस्तुले तसेच 26 काडतुस व मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. सीआयडी अधीक्षक कार्तीक कश्यप यांनी ही माहिती दिली आहे.

संशयितांना आज रिमांडसाठी न्यायालयात हजर करण्यात येणार आहेत. हत्येची सुपारी देणारे, घेणारे आणि ज्याच्यासाठी सुपारी देण्यात आली ते सर्वजण परप्रांतीय असले तरी सुपारी देणाऱयांचा कळंगूट परिसरात बराच दबदबा आहे.

पहिला संशयित सुशिल (विजय) याला हणजूण येथील एका हॉटेलमध्ये अटक करण्यात आली. नंतर त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे अशोक सूत्रा या संशयिताला कळंगूट येथे अटक करण्यात आली. एका व्यावसायिकाचा खून करण्यासाठी सुपारी किलर गोव्यात आल्याची माहिती सीआयडी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली व सुपारी किलरांचा प्लॅन फसला.

कळंगूट भागात व्यवसाय करणारा गजेंद्र सिंग (छोटू) याची हत्या करण्यासाठी   रविकांत यादव व बिपीन सिंग यांनी सहाजणांना सुपारी दिली होती. त्यानुसार उत्तर प्रदेश, हरयाणा व दिल्ली येथून काही दिवसांपूर्वी सदर संशयित गोव्यात आले होते.

पैकी दोघांना अटक करण्यात आली असून, इतर चौघांचा पोलीस शोध घेत आहेत. रविकांत यादव व बिपीन सिंग यांनी गजेंद्र सिंग ऊर्फ छोटू याच्याकडून काही पैसे घेतले होते ते पैसे परत देणे जमत नसल्याने छोटूचा काटा काढण्याचा त्यांनी ठरवून सुशिल व त्याच्या साथीदारांना सुपारी दिली होती.

वाढत्या व्यावसायिक स्पर्धेतून वैरत्व

राज्यातील किनारी भागात बेकायदेशीर व्यवसाय मोठय़ा प्रमाणात फोफावला आहे. शॉटकर्ट पैसा कमविण्यासाठी मोठय़ा प्रमाणात परप्रांतीय गोव्यात येत आहेत. बेकायदेशीर व्यवसायातील स्पर्धा वाढल्यास आपापसांत खुन्नसवृत्ती निर्माण होत असते. त्यातूनच दोन गटात वैरत्व होणे, खुनासाठी सुपारी देणे असे प्रकार घडू लागले आहेत. लाखो रुपयांची सुपारी देऊन खून करण्याचे प्रकार आतापर्यंत दिल्ली मुंबईत होत होते. आता गोव्यातही हा प्रकार होऊ लागला आहे. खून करण्यासाठी ज्याची सुपारी दिली तो परप्रांतीय, ज्याने सुपारी दिली तोही परप्रांतीय व सुपारी घेणारेही परप्रांतीय. त्यामुळे शांतताप्रिय गोव्याला अशा घटनेमुळे धक्का बसत आहे.