|Sunday, July 22, 2018
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » गुहागर-विजापूर महामार्ग रूंदीकरणावरून वाद

गुहागर-विजापूर महामार्ग रूंदीकरणावरून वाद 

भूसंपादन नसताना सुरू होणाऱया कामावर आक्षेप

17 रोजी रामपूरमध्ये जागा मालकांची बैठक -आंदोलन उभारण्याची तयारी

राजेंद्र शिंदे /चिपळूण

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा गुहागर-विजापूर राज्यमार्ग राष्ट्रीय महामार्ग म्हणून अस्तित्वात आल्यानंतर रस्ता रूंदीकरणासाठी भूसंपादन झालेले नसताना आणि लगतच्या जागा मालकांना विश्वासात घेतले गेलेले नसताना सुरू झालेल्या प्रक्रियेवरून स्थानिकात खदखद निर्माण झाली आहे. या संदर्भात एकत्र येऊन आवाज उठवण्यासाठी माजी सभापती जितेंद्र चव्हाण यांनी 17 ऑगस्ट रोजी रामपूर येथील केदारनाथ मंदिरात सकाळी 10. 30 वाजता जागा मालकांची बैठक आयोजित केली आहे.

केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने एन. एच 166-गुहागर-विजापूर महामार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा दिल्यानंतर या मार्गाची देखभाल दुरुस्ती राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून होणार आहे. यासाठी चिपळूण ते गुहागर मार्गासाठी 350 कोटीची निविदा काढून ठेकेदार कंपनीही नियुक्त करण्यात आलेली आहें. त्यानुसार रस्ता रूंदीकरणाच्या हालचाली सुरू झाल्या असून प्रत्यक्षात कामालाही लवकरच प्रारंभ होत आहे. यामध्ये रस्ता धावपट्टी ही साधारणपणे 10 मीटरची राहणार असून बाजूपट्टी दुतर्फा प्रत्येकी दोन मीटरच्या राहणार आहेत. मात्र रूंदीकरणाची कार्यवाही होत असली तरी या राष्ट्रीय महामार्ग विभागाने या संदर्भात रूंदीकरणात जाणाऱया जागा मालकांना अथवा संबंधित ग्रामपंचायतीकडे कुठलाही पत्रव्यवहार केलेला नाही.

यापूर्वीही गुहागर येथील एन्रॉन कंपनीसाठी रस्ता रूंदीकरण करण्यात आले. त्यावेळीही जागा मालकाना विश्वासात घेतले गेलेले नाही आणि नुकसान भरपाईही दिली गेलेली नाही. या रूंदीकरणात मिरजोळी, कोंढे, पाचाड, मालघर, रामपूर, उमरोली, मार्गताम्हाणे, देवघर, चिखली, शृंगारतळी, पाटपन्हाळे आणि गुहागर येथील अनेकांची दुकानेही या रस्त्याला लागून आहेत. रूंदीकरणात त्यांचे नुकसान होणार आहे. भूसंपादन आणि नुकसान भरपाई या संदर्भात कोणतीच माहिती दिली गेली नसताना सुरू होणाऱया कामाला प्रखर विरोध करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे येथील पंचायत समितीचे माजी सभापती चव्हाण यांनी पुढाकार घेऊन जागा मालकांना एकत्र आणून प्रशासनाच्या दडपशाहीविरोधात पावले टाकण्यासाठी रामपूर येथे बैठकीचे आयोजन केले आहे.

एकत्र न आल्यास नुकसानः चव्हाण

यापूर्वी या रस्ता रूंदीकरणात अनेकांच्या जमिनी गेल्या. त्यावेळीही नुकसान भरपाई मिळालेली नाही. आताही जागा मालकांना कोणीही न विचारता रस्ता रूंदीकरण केले जात आहे. प्रशासन शेतकऱयांना गृहीत धरत नसून या विरोधात एकत्र येऊन रणनीती ठरवणे गरजेचे आहे. तसे न झाल्यास पदरात काहीच पडणार नाही. त्यामुळे रामपूर येथे माजी सभापती आणि कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकत मुकादम यांच्या उपस्थितीत होणाऱया या बैठकीला जागा मालकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन माजी सभापती चव्हाण यांनी केले आहे.

Related posts: