|Sunday, July 22, 2018
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » मोबाईल दुकानाला आग, साडेसात लाखांचे नुकसान

मोबाईल दुकानाला आग, साडेसात लाखांचे नुकसान 

साखरी आगर येथील दुर्घटना

शॉर्टसर्किटमुळे लागली आग

प्रतिनिधी /गुहागर

साखरी आगर एस. टी. थांबा येथील मोबाईल तसेच जनरल स्टोअर्सच्या दुकानाला शुक्रवारी रात्री 8.15 वाजता शॉर्टसर्किटमुळे आग लागून या आगीमध्ये दुकानातील सर्व वस्तू जळून खाक झाल्या. यामध्ये 7 लाख 55 हजार रूपयांचे नुकसान झाले आहे.

साखरीआगर-कातळवाडी येथील दीपक शंकर कांबळे यांचे साखरी आगर एस. टी. थांबा येथे मोबाईल दुरूस्ती व विक्री तसेच जनरल स्टोअर्सचे दुकान आहे. शुक्रवारी रात्री 8.15 वाजता दुकानात धूर येत असल्याचे तेथील आजूबाजूच्या ग्रामस्थांना समजले. त्यांनी तातडीने दुकानाचे मालक दीपक कांबळे यांना कातळवाडी येथून बोलावून आणले. दुकानातून धूर येत असल्याने दुकानाचे शटर उघडण्यात आले. मात्र शटर उघडताच ही आग अधिक भडकली आणि यामध्ये दुकानातील सर्व माल जळून खाक झाला.

आगीमध्ये जळालेल्या वस्तूंमध्ये फ्रिझर, लाकडी कपाटे, झेरॉक्स मशीन, संगणक संच, कुलर, छोटा कॅमेरा, फोटो कलर प्रिंटर, मोबाईल पीस 30 नग, रिचार्ज कुपन, स्टेशनरी, पेपर, शोपीस छोटे-मोठे पीस, दप्तर, मोबाईल साहित्य, गोळय़ा, बिस्कीटे, गणपती हार, सिमेंट पत्रे, चप्पल, रोख रक्कम 40 हजार, फर्निचर असे मिळून तब्बल 7 लाख 55 हजार रूपयाचे नुकसान झाले आहे.

ऐन गणेशात्सव काही दिवसांवर येऊन ठेपला असतानाच हे दुकानच जळून खाक झाल्याने कांबळे यांचे मोठे नुकसान झाले आहे. रात्री आग आटोक्यात आणण्यासाठी व नुकसान झालेल्या वस्तूंचा पंचनामा करण्यासाठी साखरी आगर तंटामुक्त समितीचे अध्यक्ष नीलेश पाटील, उपसरपंच सुरेश कदम, काळभैरव देवस्थानचे ट्रस्टी रवींद्र पवार व ग्रामस्थांनी सहकार्य केले. तलाठी मधुरा कदम यांनी नुकसानीचा पंचनामा केला आहे. दरम्यान, या प्रकरणी येथील पोलीस स्थानकात कोणतीही नोंद नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

Related posts: