|Sunday, July 22, 2018
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्थानक बनले ‘आयएसओ’!

रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्थानक बनले ‘आयएसओ’! 

जिल्हा पोलीस अधीक्षक प्रणय अशोक यांनी केले जाहीर

मानांकन मिळवणारे जिल्हय़ातील पहिले पोलीस स्थानक

एका महिन्याच्या कालावधीत साधली मानांकन कामगिरी

प्रतिनिधी /रत्नागिरी

‘आयएसओ’ प्रणाली अनुसरणे आणि तसे केल्याचे प्रमाणपत्र मिळवणे, ही आता केवळ ऐच्छिक किंवा वैकल्पिक बाब राहिलेली नाही. तर ती काळाची गरज झाली आहे. त्या मानांकनासाठी लागणाऱया सर्व बाबींची पात्रता रत्नागिरीच्या ग्रामीण पोलीस स्थानकाने अवघ्या एका महिन्यात सिध्द करून दाखवली. त्यामुळेच हे पोलीस स्थानक गुणवत्ता व्यवस्थापन प्रणालीचा (आयएसओ) स्वीकार करणारे जिल्हय़ातील पहिले पोलीस स्थानक ठरले असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक प्रणय अशोक यांनी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या जिल्हय़ांमध्येही या मानांकनाची कामगिरी पहिली असावी, असेही सांगितले जात आहे.

रत्नागिरी जिल्हय़ातील सर्व पोलीस स्थानकाचा कारभार ‘आयएसओ’ करण्याकडे लक्ष वेधण्यात आले आहे. कारभारात गतिमानता व पारदर्शकता आणण्यासाठी येथील सर्व पोलीस स्थानकांना ‘आयएसओ’ करण्याचे आवाहन सर्व पोलीस स्थानकाच्या प्रभारी अधिकाऱयांना करण्यात आल्याचे पोलीस अधीक्षक प्रणय अशोक यांनी सांगितले. 15 ऑगस्टची त्या कार्यवाहीसाठी मुदत देण्यात आली आहे. त्यानुसार ग्रामीण पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक अनिल विभुते यांनी हे मानांकन प्राप्त करण्यासाठी पोलीस अधीक्षकांच्याहस्ते कामाचा शुभारंभ केला. प्रणय अशोक व अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, उपविभागीय पोलीस अधिकारी मारूती जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्थानकाचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी ही जबाबदारी पेलली.

जुलै 2017 मध्ये या मानांकनासाठी यश कन्सुलेटींग सर्व्हीसच्या अधिकाऱयांनी पोलीस स्थानकाला भेट देत येथील परिसराची पाहणी केली. या मानांकनासाठी लागणाऱया सर्व बाबींची माहिती देत तशा सूचना केल्या. त्याप्रमाणे विभुते यांनी आपल्या कर्मचाऱयांच्या मदतीने या पोलीस स्थानक व परिसराचाही कायापालट केला. पूर्वी या स्थानकाला नसलेला कंपाऊंड वॉल विभुते व कर्मचारी यांनी स्वतः अंग मेहनत करून उभारला. महिला अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी स्वतंत्र नवीन कक्ष बांधण्यात आला. येथील सर्व अभिलेखांची सालाप्रमाणे व्यवस्था लावण्यात आली. अभिलेखांची यादी लावण्यात आली असून ते शोधण्यासाठीही सुलभ कार्यवाही झाली आहे.

मार्गदर्शक फलक व सुशोभिकरण आकर्षक

पोलीस स्थानकातील मुद्देमालासाठी स्वतंत्र खोली व क्रमवार, सालाप्रमाणे व्यवस्था, सर्व विभागाचे फाईलिंग व त्याल कलर कोड, सर्व फायलिंगची मास्टर कॉपी प्रभारी अधिकारी यांच्याकडे ठेवण्यात आली आहे. पोलीस स्थानकातील रचनेचा आराखडा स्थानकाच्या दर्शनी भागात सर्वाना दिसेल, अशा प्रकारे लावण्यात आला आहे. जेणेकरून या ठिकाणी भेट देणाऱया प्रत्येकाला त्याची माहिती घेणे सोपे जाणार आहे. सूचना पेटी व प्रथमोपचार पेटीही ठेवण्यात आली आहे. पोलीस स्थानकाच्या मुख्य गेटवर कमान, गेट वॉलवर कायदे व त्या योजनांबाबत लावण्यात आलेले मार्गदर्शक फलक व सुशोभिकरण आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले आहे.

गतिमान कामगिरीनंतर अहवाल सादर

या झालेल्या कामाबाबत येथील अपर जिल्हाधिकारी बेलदार, प्रांताधिकारी अमित शेडगे, तहसीलदार मच्छिंद्र सुकटे यांनीही भेट देऊन पाहणी केली. पोलीस स्थानकाने एका महिन्याच्या कालावधीत केलेल्या गतिमान कामगिरी पाहून यश कन्सुलेटींगचे अधिकारी ओंकार पत्की यांनीही आश्चर्य व्यक्त केले. त्यांनी ही कार्यवाही पाहून पोलीस ठाण्याचे ऑडीट केले व आयएसओ’ मानांकित करण्याचा अहवाल सादर केला. त्या बद्दल कोकण परीक्षेत्र विशेष पोलीस महानिरीक्षक नवल बजाज यांनीही भेट देत विभुते व सर्व येथील सर्व अधिकारी, कर्मचारी यांचे कौतुक केले. विभुते यांचा ‘आयएसओ’ प्रमाणपत्र देऊन पोलीस अधीक्षकांनी गौरव केला आहे. हे पोलीस स्थानक ‘आयएसओ’ मानांकित झाल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक प्रणय अशोक यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत जाहीर केले. त्यावेळी अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, पोलीस निरीक्षक शिरीष सासणे, पोलीस निरीक्षक सुरेश कदम हे देखील उपस्थित होते.

ग्रामीणच्या सर्व पोलिसांना मिळणार ‘रिवॉर्ड’

‘आयएसओ’ मानांकन मिळवण्यासाठी सर्व पोलीस स्थानकांना सूचना करण्यात आल्या आहेत. पण ग्रामीण पोलिसांनी एका महिन्यात केलेली कामगिरी कौतुकास्पद आहे. त्या कार्यवाहीबाबत पोलीस निरीक्षक विभुते व येथील सर्व अधकारी, कर्मचारी यांना ‘रिवॉर्ड’ दिले जाणार असल्याचे पोलीस अधीक्षक प्रणय अशोक यांनी सांगितले. या पोलीस स्थानकाच्या कार्यवाहीचा जिल्हय़ातील इतर पोलीस स्थानकांनीही अनुकरण करावे व ‘आयएसओ’ मिळवावे, असे आवाहन त्यांनी केले.

Related posts: