|Sunday, July 22, 2018
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » ‘अब की बार भाजप सरकार’

‘अब की बार भाजप सरकार’ 

अमित शहा यांची घोषणा : तीन दिवस कर्नाटक दौऱयावर, पक्षातील नेते, कार्यकर्त्यांशी चर्चा

प्रतिनिधी/ बेंगळूर

भाजप पक्ष आगामी विधानसभा निवडणूक प्रदेशाध्यक्ष यांच्या नेतृत्त्वाखालीच लढविणार आहे. त्यामुळे कर्नाटकात पुन्हा एकदा भाजपला सत्ता मिळणार आहे, असा विश्वास व्यक्त करून भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी ‘अब की बार भाजप सरकार’ अशी घोषणा दिली. शनिवारी तीन दिवसांच्या कर्नाटक दौऱयावर आलेल्या शहा यांनी बेंगळूर येथे कर्नाटकातील विधानसभा निवडणूक प्रचाराचे रणशिंग फुंकले.

बेंगळुरातील केंपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाल्यानंतर अमित शहा यांचे भाजप कार्यकर्त्यांनी भव्य स्वागत केले. याप्रसंगी शहा यांनी, पक्षाला राज्यात स्वबळावर सत्तेवर आणण्यासाठी परिश्रम घ्या. पक्षांतर्गत असणारे मतभेद बाजूला ठेवा. येडियुराप्पांना आगामी मुख्यमंत्री बनविणे हेच आपल्यापुढील उद्दिष्ट आहे. त्यासाठी प्रत्येकाने एकत्र येणे आवश्यक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील केंद्र सरकारने राबविलेल्या विकासकामांमुळे देश प्रगतीपथाकडे वाटचाल करीत आहे. केंद्राच्या योजना आणि गत भाजप सरकारने राबविलेल्या योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविल्यास राज्यात भाजपला पुन्हा सत्ता मिळेल. याकरिता कार्यकर्त्यांसह सर्व नेत्यांनी एकत्रपणे पक्षाचा प्रचार करावा, अशी हाक  दिली.

शनिवारी सकाळी 10.45 वाजता विमानतळावर आगमन झाल्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष येडियुराप्पा आणि इतर नेत्यांनी अमित शहा यांना म्हैसूर फेटा, शाल घालून करून सत्कार केला. यावेळी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घोषणा देऊन अमित शहा यांचे स्वागत केले. त्यानंतर ते मल्लेश्वरम येथील प्रदेश भाजप कार्यालयात दाखल झाले. तेथे ग्रंथालयाचे उद्घाटन केल्यानंतर विविध बैठकांमध्ये सहभागी झाले.

पक्षातील कार्यकर्त्यांशी चर्चा करताना शहा यांनी येडियुराप्पा यांच्या नेतृत्त्वाखालीच भाजप पक्ष राज्यात आगामी विधानसभा निवडणूक लढविणार असल्याचा पुनरूच्चार केला. बेंगळुरात तीन दिवस आपण वास्तव करणार असून सर्वांशी चर्चा करणार आहे. पक्षाला पुन्हा एकदा सत्तेवर आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी एकजूट दाखविणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले. भाजपमधील विरोधी गटातील के. एस. ईश्वरप्पा आणि भाजपचे सहसंघटना सचिव संतोष याप्रसंगी उपस्थित नव्हते. विमानतळावरून वाहनाने कार्यालयापर्यंत येण्यास उशीर झाल्याने त्यांना अमित शहा यांची भेट घेणे शक्मय झाले नाही, असे सूत्रांनी सांगितले.

भ्रष्टाचारालाच प्रमुख अस्त्र बनवा!

राज्यातील काँग्रेस सरकारच्या कालावधीत झालेल्या भ्रष्टाचारालाच प्रमुख अस्त्र बनवून पुढील निवडणुकीला सामोरे जाण्याची सूचना अमित शहा यांनी भाजप नेत्यांना दिली आहे. पक्ष कार्यालयात पार पडलेल्या राज्य कार्यकारिणी बैठकीत त्यांनी आगामी निवडणुकीतील रणनीतीविषयी प्रमुख नेत्यांशी चर्चा केली. मुख्यमंत्र्यांचे हॅब्लोट घडय़ाळ प्रकरण, डी. के. शिवकुमार यांच्यावरील प्राप्तीकर छापा यासह विविध भ्रष्टाचार प्रकरणे समोर ठेवून आतापासूनच राज्य सरकारविरुद्ध आंदोलने हाती घ्या, अशी सूचना त्यांनी दिली.

बैठकीप्रसंगी भाजपप्रदेशाध्यक्ष येडियुराप्पा, केंद्रीय मंत्री अनंतकुमार, डी. व्ही. सदानंदगौडा, विधानसभा विरोधी पक्षनेते जगदीश शेट्टर, विधानपरिषद विरोधी नेते ईश्वरप्पा, माजी उपमुख्यमंत्री आर. अशोक, पक्षाचे राष्ट्रीय सहसंघटना सचिव संतोष, तसेच अरुणकुमार, अरविंद लिंबावळी आदी उपस्थित होते.

 

बॉक्स………….

विविध मुद्यांवर चर्चा

राज्य भाजप कार्यकारिणी बैठकीत स्वतंत्र राज्यध्वज, लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माची मान्यता, राज्यातील रा. स्व. सघ कार्यकर्त्यांचे खून, म्दादई प्रश्न यासंबंधी चर्चा करण्यात आली. विधानसभा निवडणुका जवळ येत असल्याने काँग्रेस पक्षातील काही प्रमुख नेते आणि आमदारांना पक्षात आणण्यासंबंधीही चर्चा करण्यात आल्याचे समजते.

Related posts: