|Sunday, July 22, 2018
You are here: Home » क्रिडा » इंग्लंडच्या युवा क्रिकेटपटूची ‘बोल्ड’ कामगिरी

इंग्लंडच्या युवा क्रिकेटपटूची ‘बोल्ड’ कामगिरी 

स्थानिक क्रिकेटमध्ये 13 वर्षीय रॉबिन्सनने सहा चेंडूत सहा फलंदाजांची उडवली दांडी

वृत्तसंस्था/ लंडन

क्रिकेटच्या इतिहासात शनिवारी एका आगळय़ावेगळय़ा विक्रमाची नोंद केली गेली. स्थानिक क्रिकेटमध्ये खेळताना लंडनमधील 13 वर्षीय ल्यूक रॉबिन्सनने आपल्या एका षटकांत सहा चेंडूत सहा बळी घेण्याची किमया केली. विशेष म्हणजे, या सहाही फलंदाजाना त्रिफळाचीत करत नवा विश्वविक्रम केला आहे.

ल्यूक हा फिलाडेल्फिया या स्थानिक क्लबकडून खेळतो. या युवा क्रिकेटपटूने 13 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत सलग सहा चेंडूवर सहा बळी टिपले आहेत. या विक्रमाचे वैशिष्टय़ म्हणजे, त्याने सर्वच सहा फलंदाजांचा त्रिफळा उडवत एकाच षटकांत डबल हॅट्ट्रिक साजरी केली. रॉबिन्सनच्या या कामगिरीच्या जोरावर त्याचा संघ सामना जिंकण्यात यशस्वी ठरला. विशेष म्हणजे तो हा विक्रम रचत असताना त्याचे वडील पंच म्हणून काम पाहत होते, भाऊ क्षेत्ररक्षण करत होता तर आई स्कोअरर म्हणून काम पाहत होत्या. यामुळे आपल्या परिवारातील सदस्याने केलेल्या विक्रमाचे साक्षीदार होण्याचे अनोखे भाग्य रॉबिन्सन परिवाराला मिळाले. ल्यूकने केलेल्या या कामगिरीचे जगभरातून कौतूक होत आहे.

ल्यूकच्या या अनोख्या विक्रमानंतर बोलताना त्याच्या वडिलांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ‘ल्यूकने केलेली कामगिरी खरेच धक्कादायक आहे. मी मागील 30 वर्षापासून क्रिकेट खेळत आहे. मी देखील एकदा हॅट्ट्रिक केली आहे. पण ल्यूकने केलेली डबल हॅट्ट्रिक ही भन्नाट आहे. क्रिकेटमध्ये काहीही शक्य आहे.’ हे पुन्हा एकदा सिध्द झाले आहे.

Related posts: