|Sunday, July 22, 2018
You are here: Home » क्रिडा » बोल्टचा रिले संघ अंतिम फेरीत

बोल्टचा रिले संघ अंतिम फेरीत 

पोलंडच्या फॅजेकची ‘गोल्डन हॅट्ट्रिक’, स्किपर्सला 200 मीटर्सचे जेतेपद

वृत्तसंस्था/ लंडन

आपल्या कारकिर्दीतील शेवटची व्यावसायिक स्पर्धा ठरलेल्या विश्व ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत युसेन बोल्टने जमैकन संघाला 4ƒ100 रिलेच्या अंतिम फेरीत धडक मारुन दिली. अमेरिकेने या इव्हेंटच्या एका हिटमध्ये वर्षातील सर्वात जलद वेळ नोंदवली. याशिवाय, अन्य इव्हेंट्समध्ये पोलंडच्या गोळाफेक चॅम्पियन पावेल फॅजेकने गोल्डन हॅट्ट्रिक साजरी केली तर महिलांच्या 200 मीटर्स धावण्याच्या शर्यतीत हॉलंडच्या डॅफने स्किपर्सने सुवर्णपदक जिंकले. लांब उडीचे जेतेपद अमेरिकन ब्रिटनी रिजेने पटकावले. महिलांच्या 3 हजार मीटर्स स्टीपलचेस प्रकारात इम्मा कॉबर्न व कर्टनी प्रेरिच्स यांनी अनुक्रमे सुवर्ण व रौप्य जिंकत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. 

हिटमध्येही धावण्याचा निर्णय घेत बोल्टने जमैकन संघाला अंतिम फेरीत सहज स्थान मिळवून दिले. जमैकाने दुसरी हिट 37.95 सेकंद वेळेत जिंकली. फ्रान्स (38.03) व चीन (38.20) अनुक्रमे दुसऱया व तिसऱया स्थानी राहिले. जमैकाचा संघ या इव्हेंटमध्ये सलग पाचव्या जेतेपदासाठी सज्ज आहे. पण, येथे त्यांना पहिल्या हिटमध्ये 37.20 सेकंद अशी महत्त्वाकांक्षी वेळ नोंदवणाऱया अमेरिकेकडून कडवे आव्हान असणार आहे. ख्रिस्तियन कोलमनवर त्यांची सर्वाधिक भिस्त असेल. ख्रिस्तियन 100 मीटर्समधील रौप्यजेता आहे. कॅनडा, जपान व तुर्की या संघांनीही रिलेसाठी पात्रता सिद्ध केली.

अन्य इव्हेंट्समध्ये पोलंडच्या पावेल फॅजेकची गोळाफेक इव्हेंटमधील गोल्डन हॅट्ट्रिक विशेष लक्षवेधी ठरली. 28 वर्षीय फॅजेकने सुवर्ण जिंकले तर रशियाच्या व्हॅलेरी प्रोन्किनने ‘न्यूट्रल ऍथलिट’ या नात्याने सहभागी होताना रौप्यपदकावर मोहोर उमटवली. वोजसेच नोविकीने कांस्यपदक जिंकले. हॉलंडच्या डॅफने स्किपर्सने महिलांच्या 200 मीटर्सचे जेतेपद 22.05 सेकंदात पटकावले. आयव्हरी कोस्टच्या मॅरी-जोसे ता लोऊने 22.05 सेकंदात रौप्य संपादन केले. शॉने मिलेर युबो कांस्यपदकाची मानकरी ठरली.

लांब उडीत अमेरिकेत ब्रिटनी रिजेने सुवर्णपदकावर आपली मोहोर उमटवली. अवघ्या सहा सेंटीमीटर्सच्या अंतरात चार स्पर्धकांचा समावेश राहिला. ‘न्यूट्रल ऍथलिट’ डॅरिना क्लिशिनाने सात मीटर्सची उडी घेत रौप्य जिंकले. ऑलिम्पिक चॅम्पियन व विद्यमान जेती तियाना बार्टोलेटाने कांस्यपदकाची कमाई केली. सर्बियाच्या इव्हाना स्पॅनोव्हिकला पदकाने किंचीत फरकाने हुलकावणी दिली. रिजेने तिसऱया प्रयत्नात 7.02 मीटर्सच्या उडीसह सुवर्णपदकावर कब्जा केला.

महिलांच्या 3 हजार मीटर्स स्टीपलचेस इव्हेंटमध्ये इम्मा कोबर्न व कर्टनी फेरिचस या अमेरिकन ऍथलिटनी अनुक्रमे सुवर्ण व रौप्य जिंकत एकच खळबळ उडवली. या इव्हेंटमध्ये पदक जिंकणाऱया त्या पहिल्याच अमेरिकन ठरल्या. कोबर्नने गतवर्षी ऑलिम्पिकमध्ये कांस्य जिंकले असले तरी या अमेरिकन प्रतिस्पर्ध्याना येथे फेवरीट मानले जात नव्हते. त्यामुळे, त्यांच्या यशाचे महत्त्व खास राहिले. 2015 ची चॅम्पियन जेपकेमोईने जिंकलेले कांस्य मात्र झाकोळले गेले.

Related posts: