|Sunday, July 22, 2018
You are here: Home » क्रिडा » शतकवीर धवनसह केएल राहुलची फटकेबाजी, भारत 6 बाद 329

शतकवीर धवनसह केएल राहुलची फटकेबाजी, भारत 6 बाद 329 

सलामीवीरांची दीडशतकी भागीदारी, मधली फळी मात्र गडगडली,

वृत्तसंस्था / पल्लेकेले

डावखुऱया शिखर धवनने (119) कारकिर्दीतील सहावे शतक झळकावत केएल राहुलसमवेत 188 धावांची दणकेबाज सलामी दिल्यानंतर भारताने यजमान लंकेविरुद्ध तिसऱया व शेवटच्या कसोटीतील पहिल्या दिवसअखेर 6 बाद 329 धावांपर्यंत मजल मारली. केएल राहुल (85) शतकाच्या उंबरठय़ावर बाद झाला. कर्णधार विराट कोहलीने 42 धावांचे योगदान दिले. मात्र, अजिंक्य रहाणे (17) व चेतेश्वर पुजारा (8) स्वस्तात परतल्याने मधली फळी गडगडली. दिवसअखेरीस साहा 13 तर हार्दिक पंडय़ा एका धावेवर खेळत होते.

यजमान संघातर्फे डावखुरा फिरकीपटू मलिंदा पुष्पकुमारा (18 षटकात 3/40) व चायनामन लक्शन संदकन (25 षटकात 2/84) यांनी थोडेफार यश मिळवत भारतीय संघाला रोखण्याचा प्रयत्न केला. 42 धावा जमवणाऱया विराटने फिरकीपटूंना प्रंटफूटवर येत फटकावण्याचा सातत्याने प्रयत्न केला व याच प्रयत्नात एकदा स्लीपकडे झेल देत त्याला तंबूत परतावे लागले. केएल राहुलने सलग सातवे कसोटी अर्धशतक झळकावत गुंडाप्पा विश्वनाथ व राहुल द्रविड यांचा प्रत्येकी सलग 6 अर्धशतकांचा विक्रम मोडीत काढला.

रविचंद्रन अश्विन (31) संयमी खेळी साकारत होता. पण, डावखुरा मध्यमगती गोलंदाज विश्वा फर्नांडोच्या एका चेंडूवर एकाग्रता भंगल्यानंतर त्याने डिकवेलाकडे झेल दिला. बाद होण्यापूर्वी, अश्विनने साहाच्या साथीने संघाचे त्रिशतक फलकावर लावले. सहाव्या गडय़ासाठी या जोडीने 26 धावा जोडल्या व नव्या चेंडूचा प्रभाव कमी करण्याचा प्रयत्न केला.

धवन-राहुलची धमाकेदार सलामी

तत्पूर्वी, विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर शिखर धवन व केएल राहुल यांनी लंकेविरुद्ध त्यांच्या भूमीत सर्वोच्च सलामीचा विक्रम नोंदवला. या जोडीने 39.3 षटकात 188 धावांची सलामी देत मनोज प्रभाकर व नवज्योत सिंग सिद्धू यांचा 1993 मधील 173 धावांचा विक्रम मोडीत काढला. केएल राहुल डावातील 40 व्या षटकात डावखुरा फिरकीपटू पुष्पकुमाराच्या गोलंदाजीवर मिडऑफवरील करुणारत्नेकडे झेल देत तंबूत परतला. त्याच्या 135 चेंडूतील शतकी खेळीत 8 चौकारांचा समावेश राहिला.

धवनने मात्र एक बाजू लावून धरताना या मालिकेतील वैयक्तिक दुसरे शतकही साजरे केले. त्याने चेतेश्वर पुजारासमवेत 31 धावा जोडल्या. पण, या जोडीला फारसा सूर सापडला नाही. धवन नंतर स्क्वेअर लेगवर कर्णधार दिनेश चंडिमलकडे झेल देत बाद झाला. धवनच्या 123 चेंडूतील खेळीत 17 चौकारांचा समावेश होता. लंकेतर्फे मध्यमगती गोलंदाज लहिरु कुमारा पहिल्या 6 षटकात 41 धावा मोजाव्या लागल्याने महागडा ठरला. अगदी फर्नांडो देखील प्रारंभी भारतीय गोलंदाजांवर अंकुश ठेवू शकला नव्हता. त्याचमुळे, करुणारत्नेला लवकर पाचारण करावे लागले आणि सकाळच्या सत्रात त्याने 5 षटकात 23 धावा दिल्या.

एकाचवेळी दोन चायनामन गोलंदाज खेळण्याची दुसरी वेळ

या लढतीत कुलदीप यादव व संदकन असे दोन चायनामन गोलंदाज खेळत असून एखाद्या कसोटीत दोन चायनामन गोलंदाज एकाच वेळी खेळण्याची ही कसोटी इतिहासातील केवळ दुसरी वेळ ठरली आहे. यापूर्वी 2004 मध्ये केपटाऊन कसोटीत डेव्ह मोहम्मद (वेस्ट इंडीज) व पॉल ऍडम्स (द. आफ्रिका) असे दोन चायनामन गोलंदाज एकाच वेळी खेळले होते.

धावफलक

भारत पहिला डाव : शिखर धवन झे. चंडिमल, गो. पुष्पकुमारा 119 (123 चेंडूत 17 चौकार), केएल राहुल झे. करुणारत्ने, गो. पुष्पकुमारा 85 (135 चेंडूत 8 चौकार), चेतेश्वर पुजारा झे. मॅथ्यूज, गो. संदकन 8 (33 चेंडू), विराट कोहली झे. करुणारत्ने, गो. संदकन 42 (84 चेंडूत 3 चौकार), अजिंक्य रहाणे त्रि. गो. पुष्पकुमारा 17 (48 चेंडूत 1 चौकार), रविचंद्रन अश्विन झे. डिकवेला, गो. फर्नांडो 31 (75 चेंडूत 1 चौकार), साहा खेळत आहे 13 (38 चेंडू), हार्दिक पंडय़ा खेळत आहे 1 (6 चेंडू). अवांतर 13. एकूण 90 षटकात 6/329.

गडी बाद होण्याचा क्रम

1-188 (केएल राहुल, 39.3), 2-219 (धवन, 47.1), 3-229 (पुजारा, 50.1), 4-264 (रहाणे, 65.4), 5-296 (विराट, 78.2), 6-322 (अश्विन, 87.6).

गोलंदाजी

फर्नांडो 19-2-68-1, कुमारा 15-1-67-0, करुणारत्ने 5-0-23-0, परेरा 8-1-36-0, संदकन 25-2-84-2, पुष्पकुमारा 18-2-40-3.

Related posts: