|Tuesday, July 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » वारणानगर चोरीतील दीपक पाटीलाच्या घरावर छापा

वारणानगर चोरीतील दीपक पाटीलाच्या घरावर छापा 

प्रतिनिधी/ सांगली

वारणानगर चोरीतील संशयित आरोपी निलंबित पोलीस हवालदार दीपक उत्तमराव पाटील याच्या मिरज तालुक्यातील कवलापूर येथील घरावर शनिवारी सीआयडीच्या अधिकाऱयांनी छापा टाकला. अधिकाऱयांनी पाटील यालाही तपासणीसाठी आणले होते. यावेळी त्याच्या घराची झाडाझडती घेण्यात आली. या छाप्यात काही कागदपत्रे हाती लागल्याचे सांगण्यात आले.

वारणानगर येथे 12 मार्च 2016 रोजी झालेल्या नऊ कोटी 18 लाखाच्या चोरीचा छडा सांगली पोलिसांनी लावला. यातील मुख्य संशयित मैनुद्दीन मुल्लाकडून यावेळी तीन कोटी सात लाखाची रोकड जप्त करण्यात आली. त्यानंतर कोडोली पोलिसांनी आणखी दीड कोटी जप्त केले. परंतु चोरीला गेलेल्या रकमेबाबत शंका आल्याने विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी याचा फेरतपास करण्याची सूचना अप्पर पोलीस अधीक्षक सोहेल शर्मा यांना दिले.

 या प्रकरणात येथील स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक विश्वनाथ घनवट, सहाय्यक पोलीस निरीक्षक सूरज चंदनशिवे यांच्यासह सात जणांचा सहभाग असल्याने त्यांच्यावर कोडोली पोलिसांत गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास सीआयडीमार्फत सुरू असून संशयित आरोपी दीपक पाटील हा दोनच दिवसापूर्वी न्यायालयात हजर झाला आहे. याप्रकरणी सीआयडीने त्याला अटक करून चौकशी सुरू केली आहे. याप्रकरणी शनिवारी सीआयडीच्या अधिकाऱयांनी पाटील याच्या कवलापूर येथील घरावर छापा टाकला. काही कागदपत्रे त्यांच्या हाताला लागल्याचे सांगण्यात आले.