|Sunday, July 22, 2018
You are here: Home » आवृत्ती » सांगली » 50 हजाराची लाच : लाचलुचपत प्रतिबंधक डीवायएसपी शेटकारवर गुन्हा

50 हजाराची लाच : लाचलुचपत प्रतिबंधक डीवायएसपी शेटकारवर गुन्हा 

प्रतिनिधी / लातूर :-

 आलेल्या तक्रार अर्जावर चौकशी न करता, अर्ज निकाली काढण्यासाठी 50 हजार रुपयांची लाचेची मागणी करुन ती एका खासगी व्यक्तीकडून स्वीकारल्याप्रकरणी लातूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधिक्षक एस. एस. शेटकार यांच्याच विरोधात लाच घेतल्याप्रकरणी लातूरच्या शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई मुख्यालयातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शुक्रवारी छापा टाकून गुन्हा दाखल केला आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागामध्ये लाच घेतली म्हणून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उपअधिक्षकावर लाचलुचपत विभागाने कारवाई करण्याचा हा पहिलाच प्रकार आहे. लातूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागात एस. एस. शेटकार नावाचे उपअधिक्षक आहेत. त्यांच्याकडे लातूर येथील आरटीओ कार्यालयातील निरीक्षकाच्या विरोधात एक तक्रार अर्ज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे आला. ज्या अर्जाची चौकशी न करता अर्ज निकाली काढण्यासाठी पोलीस उपधिक्षक एस. एस. शेटकार यांनी लाचेची मागणी केली.

50 हजार रुपयांची मागणी केल्यानंतर ही रक्कम आरटीओ कार्यालयात वाहनाच्या कंपनीचे एजंट म्हणून काम करणारे छोटू गडकर यांचे दत्त मंदीर औसा रोड लातूर येथील खासगी कार्यालयात 50 हजार रुपये मोजून घेत असताना मुंबईच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गडकरी यांना रंगेहात पकडले, लातूरचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधिक्षक एस. एस. शेटकार यांनी पैसे मागितले. कुंपणच शेत खात आहे हे पाहून तक्रारकर्त्या इन्स्पेक्टरने थेट एससीबीच्या मुंबई कार्यालयाकडे तक्रार केली. काल मुंबईचे विशेष पथक लातुरात दाखल झाले. त्यांनी छोटू गडकर यांच्या दत्तकृपा कार्यालयात छापा मारला व लाचेचे 50 हजार रुपये डीवायएसपीसाठी स्वीकारत असल्याने गडकर यांना काल सायंकाळी ताब्यात घेतले.

रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी कारवाई करण्यात आली. शेटकार यांच्या घराचीही झडती घेण्यात आली. शनिवार रोजी लाचेची मागणी केली व स्वीकारली म्हणून लातूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधिक्षक एस. एस. शेटकार, खासगी व्यक्ती छोटू गडकर यांच्या विरोधात लाचलूचपत प्रतिबंधक कलम 7, 12,13, 1 ड, 13 (2) प्रमाणे शिवाजी नगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती लाचलूचपत प्रतिबंधक विभाग नांदेड परिक्षेत्राचे पोलीस अधिक्षक संजय लाटकर यांनी लातूर येथील कार्यालयात पत्रकारांना दिली.

शेटकार गायब-

काल सायंकाळी 50 हजार रुपयांची एजंटामार्फत लाच स्वीकारल्याचे व मुंबईच्या पथकाने कारवाई केल्याचे लक्षात येताच शेटकार गायब झाले आहेत. काल काही व्यक्तींनी त्यांच्याशी संपर्क साधला असता कोण नातेवाईकांच्या अंत्यविधीसाठी बाहेर असल्याचे सांगितले. पण, त्यानंतर त्यांचा मोबाईल बंदच आहे. हा प्रकार घडताच शेटकार बेपत्ता झाले आहेत. याबाबत पोलीस अधिक्षक संजय लाटकर यांना शेटकार बेपत्ता म्हणायचे काय ? असे विचारता ते काल रेकॉर्डवर डयूटीवर होते. आज नाहीत. या प्रकरणी छोटू गडकर यांना अटक केली आहे. शेटकार अद्याप गायब असल्याचे सांगितले.

डीवायएसपीवर गुन्हा-

लाच मागितल्याप्रकरणी खुद्द लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या उपअधिक्षकासवरच गुन्हा दाखल होण्याचा प्रकार महाराष्ट्रात पहिल्यांदाच घडला आहे. लाच देऊ नका, घेऊ नका आदेशावरुन पोलीस उपअधिक्षक लातूर असे वेगवेगळया ऑफीसमध्ये फलक लावून स्वतःच लाच स्वीकारल्या प्रकरणी सरकारची बदनामी होत आहे.

Related posts: