|Sunday, July 22, 2018
You are here: Home » आवृत्ती » सांगली » सोलापुरात कृत्रिम पावसाचा प्रयोग होणार

सोलापुरात कृत्रिम पावसाचा प्रयोग होणार 

सोलापूर / प्रशांत माने

पावसाळा सुरू होऊन अडीच महिन्यांचा कालावधी लोटल्यानंतरही समाधानकारक पाऊस न पडल्याने सोलापूर जिल्हा यंदा दुष्काळाच्या छायेत आला आहे. खरीप हातून गेल्यानंतर आता रब्बीही धोक्यात येण्याची चिन्हे असून नुसतेच असणारे ढगाळ वातावरण कृत्रिम पावसासाठी पोषक असल्याने जिह्यात कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी प्रयत्नाची गरज चिंताग्रस्त बळीराजाकडून व्यक्त होत आहे.

यंदाचा पावसाळा सुरू झाल्यानंतर जून महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात सलग सहा दिवस पाऊस पडल्याने सुखावलेल्या बळीराजाने खरिपाची उत्साहात पेरणी केली. परंतु पावसाने अशी दडी मारली की जिह्यातील खरिपाची पेरणी पूर्णपणे वाया गेली आहे. विशेष म्हणजे रब्बी अशी ओळख असलेल्या सोलापूर जिह्यात खरिपाचे क्षेत्र अलिकडच्या काळात वाढत असताना पावसाने यंदा खरिपाला ब्रेक दिला आहे. परतीचा पाऊस तरी सोलापुरात चांगला पडेल आणि रब्बीचा हंगाम तर चांगला जाईल, या अपेक्षेने बळीराजा आभाळाकडे डोळे लावून बसला आहे.

जून व जुलै महिन्यात पावसाने सरासरीही गाठलेली नाही. सोलापुरात राखी पौर्णिमेनंतर पावसाला सुरुवात होते. ऑगस्ट महिना निम्मा लोटला तरी अद्याप पावसाला सुरुवात झालेली नाही. अशीच परिस्थिती असताना 2015 मध्ये शासनाकडून जिह्यात कृत्रिम पावसाचा प्रयोग झाला होवून काही प्रमाणात लाभही झाला होता.

गेल्या कित्येक दिवसापासून आकाशात ढगाळ वातावरण तयार होते पण प्रत्यक्षात पाऊस पडत नाही. या ढगाळ वातावरणाचा लाभ उठविण्यासाठी कृत्रिम पावसाचा प्रयोग झाल्यास नक्कीच काही लाभ होईल, असे मत हवामान शास्त्राचे जाणकार माजी प्राचार्य डॉ. श्रीनिवास वडगबाळकर यांनी व्यक्त केले आहे.

उजनीतील पाणीसाठा कमी झाल्याने चिंता

सोलापूर जिह्यासाठी वरदायिनी असलेले उजनी धरण भरण्यासाठी पुणे जिह्यातील पावसावर अवलंबून रहावे लागते. पुण्यात पडलेल्या पावसामुळे वजा 30 टक्क्यांवर आलेले धरण प्लस 53 टक्के इतके भरले होते. परंतु नुकतेच उजनी धरणातून शहराला पिण्यासाठी व जिह्यातील पिकांसाठी पाणी सोडण्यात आले. त्यामुळे उजनी धरणातील पाणीसाठा रिव्हर्समध्ये म्हणजेच 46 टक्क्यांवर आला आहे. चिंतेची बाब म्हणजे पुणे जिह्यातही पावसाने ओढ दिल्याने भीमानदीद्वारे उजनीत येणारा विसर्ग मंदावला आहे. दौंड येथील विसर्ग एक हजार क्युसेस तर पुणे बंडगार्डन येथून 7 हजार क्युसेसचा विसर्ग आहे. जर का उजनी यंदा नाही भरले आणि जिह्यात पाऊसही नाही पडल्यास सोलापूर जिल्हा दुष्काळाच्या खाईत लोटला जाण्याची भिती व्यक्त होत आहे.

कृत्रिम पावसासाठी प्रयत्न करणार : पालकमंत्री देशमुख

पावसाळा सुरु होवून अडीच महिने झाले तरी जिह्यात पाऊस नाही. पाऊस नसल्याने सोलापूर जिह्यावर दुष्काळाचे सावट आहे. कृत्रिम पावसाचा प्रयोग कितपत यशस्वी होईल हे सांगता येत नाही, पण शासनाच्या माध्यमातून कृत्रिम पावसासाठी नक्कीच प्रयत्न करु. नुकतेच अधिवेशन संपले असून पुढील आठवडय़ात याबाबत मुख्यमंत्री व महसूलमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करु, असे जिह्याचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी सांगितले.

जिह्यातील आमदारांनीही जोर लावण्याची गरज

जिह्यावर सध्या दुष्काळाचे सावट असून पावसाने पूर्णपणे पाठ फिरवलेली आहे. जिह्यात कृत्रिम पावसासाठी पालकमंत्री प्रयत्न करणार आहेत. यासाठी सहकारमंत्री व सोलापूरचे सुभाष देशमुख आणि इतर सर्व आमदारांनीही कृत्रिम पावसासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. सध्या पडत असलेल्या ढगाळ वातावरणात कृत्रिम पावसाचा प्रयोग झाल्यास नक्कीच पाऊस पडेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Related posts: