|Sunday, July 22, 2018
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » बांद्यात लवकरच खत निर्मिती प्रकल्प

बांद्यात लवकरच खत निर्मिती प्रकल्प 

प्रतिनिधी/ बांदा

 येथील बांदा शहरातील कचरा डेपाचे पुढे काय?, दुर्गंधी किती दिवस सहन करायची?, शहरातील प्लास्टिकचे पुढे काय करायचे?, कचऱयाची विल्हेवाट कशी लावायची, या सर्व प्रश्नांना आता लवकरच पूर्णविराम मिळणार असून बांदा
ग्रामपंचायत लवकरच खत प्रकल्पाची निर्मिती करणार आहे. महिनाभरात जागेची निश्चिती करण्यात येणार असून कचरा व प्लास्टिकच्या वापरातून खतनिर्मिती करण्यात येणार असल्याची माहिती बांदा सरपंच बाळा आकेरकर यांनी दिली.

 बांदा ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱयांनी वेंगुर्ले नगरपालिकेच्या खत प्रकल्पाची पाहणी नुकतीच केली. वेंगुर्ल्यातील प्रकल्पाच्या धर्तीवर प्लास्टिकच्या वापरातून खतनिर्मिती करण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून कचरा व प्लास्टिकला मुक्ती मिळण्याबरोबरच ग्रामपंचायतीच्या उत्पन्नातही भर पडणार आहे. या उत्पन्नाच्या माध्यमातून शहरात अधिक नागरी सुविधा देण्यास मदत मिळणार असल्याचे आकेरकर यांनी सांगितले. वेंगुर्ले पालिकेच्या कचरा प्रकल्पाची पाहणी करण्यास गेलेल्या पथकात जि. प. सदस्या श्वेता कोरगावकर, पं. स. सदस्य शीतल राऊळ, सरपंच बाळा आकेरकर, माजी सरपंच मंदार कल्याणकर यांचा समावेश होता.

 या पदाधिकाऱयांनी वेंगुर्ले नगराध्यक्ष गिरप, मुख्याधिकारी कोकरे यांच्याशी
प्रकल्पाबाबत चर्चा केली. नगराध्यक्ष गिरप यांनी प्रकल्प सुरू करताना प्रारंभी निर्माण झालेल्या अडचणी, प्रकल्पासाठी करण्यात आलेली निधीची तरतूद व प्रकल्पाचा वेंगुर्ले पालिकेला झालेला फायदा याची विस्तृत माहिती दिली. बांद्यातील नियोजित
प्रकल्पासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. या पदाधिकाऱयांनी प्रकल्पाचीही पाहणी केली. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आम्ही नेहमीच वेगवेगळे उपक्रम राबविले आहे. या सर्व उपक्रमांना बांदावासीयांनी चांगले सहकार्य केले आहे. या प्रकल्पालाही ग्रामस्थांचे सहकार्य मिळेल, असा आशावाद सरपंच आकेरकर यांनी व्यक्त केला.  

 सद्यस्थितीत बांदा ग्रामपंचायतीच्या स्मशानभूमी आवारात कचरा डेपो आहे. या लगतच महामार्ग व वसतिस्थाने आहेत. या कचरा डेपोमुळे ग्रामस्थांना दुर्गंधी सहन करावी लागत आहे. याबाबत पंधरा दिवसांपूर्वी सुशांत पांगम, श्रीकृष्ण काणेकर यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी सरपंच आकेरकर यांना घेराव घालत कचरा समस्या तात्काळ सोडविण्याची मागणी केली होती. आता लवकरच या समस्येला कायमस्वरुपी पूर्णविराम मिळणार आहे.

Related posts: